संपादकीय : ‘रिक्लेमिंग भारत’ अत्यावश्यक !

साधारण २ शतकांआधीपर्यंत ‘सोने की चिडियाँ’ या नावाने भारताचा गुणगौरव केला जाई. जगातील एकूण ‘जीडीपी’पैकी (सकल देशांतर्गत उत्पादनापैकी) तब्बल ३५ टक्के भाग केवळ भारताचा होता. ‘धर्माधारित भारता’चा आर्थिक क्षेत्रातील सिंहाचा वाटा यातून लक्षात येतो. दुर्दैवाने आज मनुष्याच्या चार पुरुषार्थांपैकी ‘अर्था’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक क्षेत्र मग ते राजकारण असो कि क्रीडा, कला असो अथवा शिक्षण सर्वजण अर्थार्जनाच्या भोवती घुटमळत आहेत. धर्माला विसरल्याने स्वत्वाचा र्‍हास होऊन मनुष्य या मायावी अवडंबरात गुरफटला, हे त्यामागील कारण ! त्यामुळे येनकेन प्रकारेण स्वत:चे आर्थिक हित कसे साधता येईल ? हे पहाण्यात केवळ राजकारणीच नाही, तर बहुतांश जनता मग्न आहे. सर्वत्र अनाचार बोकाळला आहे, त्यामागेही हेच कारण ! त्यामुळे पाश्चात्त्यांची दु:स्थिती पहाण्याची आवश्यकता नाही, कारण तीच गत आपल्या भारताची झाली आहे. प्राचीन भारताचे महत्त्व येथे लक्षात येते. प्राचीन भारताने जगात व्यावहारिक क्षेत्रातील उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली, ती धर्म आणि अध्यात्म यांच्या आचरणाच्या बळावर ! हेच ध्येय समोर ठेवून ‘द जयपूर डायलॉग्ज’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने यंदा ‘रिक्लेमिंग भारत’ (भारतीयत्व परत आणणे) हा विषय घेऊन ३ दिवसांची परिषद आयोजित केली होती. यामुळे या संघटनेचे अभिनंदन करणे प्रत्येक धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी भारतियाचे कर्तव्य ठरते.

ज्ञान आणि संघटन !

‘द जयपूर डायलॉग्ज’ने असा आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंदूंचा वैचारिक मेळावा आयोजित करण्याचे तसे हे नववे वर्ष ! कार्यक्रमाचा आरंभ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ते म्हणाले, ‘‘भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा, इतिहास आणि संस्कृती ही समृद्ध राहिली आहे. भारतीय ज्ञानार्जनासाठी सदैव तत्पर राहिले आहेत आणि आपणही यासाठी निरंतर पुढे गेले पाहिजे.’’ येथे ‘विद्या राजसु पूज्यते न हि धनं विद्याविहीनः पशुः ।।’ या प्रसिद्ध संस्कृत श्लोकाचे स्मरण होते, ज्याचा अर्थ आहे, राजदरबारात ज्ञान हे नेहमीच पूजनीय राहिले आहे – एवढे की, ज्ञानरूपी पशूच्या तुलनेत धनालाही महत्त्व नाही. कार्यक्रमात महाराष्ट्राचे लाडके वरिष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे विशेष अतिथी म्हणून उद्घाटन सत्रात व्यासपिठावर उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रनिष्ठांना हिंदु ‘इकोसिस्टम’ बनवण्यासाठी सशक्त होण्याचे आवाहन केले. आज आपला देश ‘डीप स्टेट’, ‘वोकिजम्च्या रूपातील साम्यवाद’, इस्लाम, ख्रिस्ती पंथ आदींनी घेरलेला असतांना जागतिक ‘हिंदु इकोसिस्टम’साठी भगीरथ प्रयत्न करण्याची काळ मागणी करत आहे. भाऊ तोरसेकर यांच्या अनुभवांचा लाभ त्यामुळेच हिंदु समाजाने घेतला पाहिजे. ‘द जयपूर डायलॉग्ज’चे अध्यक्ष संजय दीक्षित यांनी लिहिलेल्या ‘कृष्ण गोपेश्वर’ आणि ‘सर्व पंथ एक समान नाहीत’, या पुस्तकांचे उद्घाटन या वेळी करण्यात आले.

‘फेक नॅरेटिव्ह’शी दोन हात !

‘फेक नॅरेटिव्ह’ म्हणजेच खोटे कथानक रचून हिंदूंचे जगभरात हसे करण्यात येत आहे. याच्याशी दोन हात करण्यासाठी हिंदुजागृती आवश्यक आहे. हिंदूंचे ‘अनलर्न’ (चुकीच्या गोष्टी विसरणे) आणि ‘री-लर्न’ (योग्य ज्ञान शिकवणे) झाले पाहिजे. जगभरात हिंदुविरोधी वातावरण निर्माण करणार्‍या बीबीसीचा बुरखा फाडणारी बहुप्रतिक्षित डॉक्युमेंट्री ‘बीबीसी ऑन ट्रायल’च्या माध्यमातून हेच साध्य होईल. तिचे प्रसारण प्रथम या कार्यक्रमाच्या व्यासपिठावरून करण्यात आले. यासाठी ‘ग्लोबल हिंदु फेडरेशन’चे अध्यक्ष पंडित सतीश शर्मा हे लंडनहून भारतात आले आहेत. त्यांच्यासह भारतविरोधी आंतरराष्ट्रीय षड्यंत्रांना ‘व्हिडिओज’च्या माध्यमातून उघडे पाडणारे किंबहुना ‘राष्ट्रनिष्ठांचे ध्रुव राठी’ असा गौरव करता येऊ शकतील असे ‘स्ट्रिंग जिओ’चे विनोद कुमारही उपस्थित होते. हिंदु धर्मासाठी नेमकेपणाने नि प्रभावी कार्य करण्यासाठी ज्या भगीरथ प्रयत्नांची आवश्यकता आहे, त्याचे ही डॉक्युमेंट्री एक चांगले उदाहरण आहे.

‘काशी मथुरा हिंदू नॅरेटिव्ह’ सत्रात सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले, ‘‘मंदिर पाडल्याने मूर्तीचे अस्तित्व संपत नाही. देव तेथे अप्रत्यक्षपणे रहातो. मशीद स्थलांतरित केली जाऊ शकते, परंतु मंदिर नाही.’’ यातून मंदिरे ही हिंदूंसाठी सर्वस्व असल्याचेच जैन यांना सुचवायचे आहे. हिंदुरक्षण व्हायचे असेल, तर त्यांना चैतन्याच्या महाशक्तीचे कवच देणारी मंदिरे जपली गेली पाहिजेत. या मंदिरांवर आक्रमण करणार्‍यांचे सत्य उघड करतांना डॉ. कुलदीप दत्ता म्हणाले, ‘‘बहुतांश मुसलमानांना उर्दू किंवा अरबी येत नाही, कुराणही वाचता येत नाही. ते केवळ मौलवीचेच म्हणणे बरोबर मानतात.’’

सरकारसुधारणा

कार्यक्रमातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण सत्र होते ‘डिकोलोनायझिंग इंडिया माईंड’, म्हणजेच भारतीय मनाला वसाहतवादी विचारसरणीतून बाहेर काढण्याचे ! यामध्ये संक्रांत सानू यांनी अत्यंत मार्मिकपणे सांगितले, ‘‘आपण गेली दीडशे वर्षे आपलाच समाज सुधारण्याच्या मागे लागलो आहोत. खरेतर आपला समाज पाश्चात्त्यांच्या पुष्कळ पुढे आहे. आपल्याला समाजसुधारणा नाही, तर सरकारसुधारणा करण्याची आवश्यकता आहे.’’ धर्मनिरपेक्षतेच्या नावावर हिंदूंच्या विरुद्ध सर्वच स्तरांवर जो उच्छाद मांडण्यात आला आहे, त्याचा नायनाट होणे आवश्यक आहे. यासाठी हिंदूंनी सरकारी कायद्यांत हिंदुहितरक्षक सुधारणा करून घेतल्या पाहिजेत.

कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात राज्य सरकारांची वेगवेगळी मते असू शकतात; पण देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी केंद्र सरकारला हस्तक्षेप करावाच लागेल. हिंदूंची शहामृगी मानसिकतेतून बाहेर पडून शत्रूबोधाद्वारे देशद्रोही आणि घुसखोर यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल, असे महत्त्वपूर्ण विचार शेवटच्या दिवशी हिंदुत्वनिष्ठ विचारवंतांनी व्यक्त केले.

मूलत: ‘जयपूर डायलॉग्ज’सारख्या कार्यक्रमांतील उद्बोधक विचार हिंदू ऐकून सोडून देत नाहीत ना, हे पहाणे आवश्यक आहे. या विचारांना कृतीत आणले गेले, तरच या कार्यक्रमांचे इप्सित साध्य होऊ शकते. प्रत्येक हिंदूने त्याची क्षमता, प्रकृती आणि आवड यांनुसार धर्मरक्षणार्थ सिद्ध झाले पाहिजे. सर्वसामान्य हिंदूंनी प्रयत्न करण्यासह हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही या कार्यक्रमांच्या आयोजनापुरते मर्यादित न रहाता संघटित होऊन हिंदुरक्षणार्थ सार्वत्रिक अशा ‘हिंदु इकोसिस्टम’च्या दिशेने निर्णायक पाऊल उचलावे, हीसुद्धा अपेक्षा !

हिंदु धर्मरक्षणार्थ हिंदुत्वनिष्ठ विचारवंतांच्या वैचारिक उद्बोधनाला सर्वत्रच्या हिंदूंनी कृतीत आणणे, ही काळाची आवश्यकता !