नांदेड – मुखेड तालुक्यातील अंबुलगा बुद्रुक आणि परिसरात २५ ऑक्टोबरला दुपारी २.४३ आणि ३.१३ वाजता २ वेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. २ वेळा भूगर्भातून आवाज येऊन सौम्य हादरे जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राने दिली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे १.५ आणि ०.७ अशी नोंदवण्यात आलेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मुखेड शहरापासून १२ कि.मी. दूर दक्षिणपूर्व दिशेला आहे. या धक्क्यांमुळे कुठलीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही. नांदेड जिल्ह्यात २२ ऑक्टोबरलाही सकाळी ६.५२ वाजता ३.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता.