ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे नवे मुख्यमंत्री !
नवी देहली – देशात हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांच्या झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांची मतमोजणी ८ ऑक्टोबरला करण्यात आली. यात हरियाणामध्ये भाजपला बहुमत मिळत असल्याचे, तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स अन् काँग्रेस यांच्या युतीला बहुमत मिळत असल्याचे समोर आले आहे.
BJP retains its stronghold with a hat-trick win in #Haryana
Jammu and Kashmir chooses National Conference – Rejects the PDP
Omar Abdullah to be the new Chief Minister of Jammu and Kashmir.
जम्मू कश्मीर I हरियाणा#HaryanaElectionResult #JammuKashmirResults pic.twitter.com/aTi13ZTise
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 8, 2024
अद्याप संपूर्ण जागांचे निकाल निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आलेले नाहीत. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून ओमर अब्दुल्ला यांचे नाव त्यांचे वडील आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनी घोषित केले.
जम्मू-काश्मीरच्या जनतेने पीडीपीला नाकारले !
१. काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच येथे विधानसभेची निवडणूक झाली.
२. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या युतीला ४८ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर भाजपला २९ जागांवर आघाडी मिळाली. भाजपला मागील निवडणुकीत ३० जागा मिळाल्या होत्या.
३. मागच्या वेळी भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) या मेहबूबा मुफ्ती यांच्या पक्षाने सरकार स्थापन केले होते. या वेळी मात्र दोघेही बहुमताचा आकडा गाठू शकले नाहीत. पीडीपीला यंदा केवळ ४ जागांवरच आघाडी मिळाली. त्यामुळे काश्मीरच्या जनतेने पीडीपीला नाकारल्याचे दिसून येते.
४. जम्मू-काश्मीरमध्ये आम आदमी पक्षाचे पहिल्यांदाच खाते उघडले आहे. डोडा विधानसभा मतदारसंघात आपचे उमेदवार मेहराज मलिक यांचा विजय झाला आहे.
हरियाणामध्ये अटीतटीच्या लढतीत भाजपचा विजय !
१. विविध मतदानोत्तर चाचण्यांमध्ये हरियाणामध्ये काँग्रेसचा विजय होणार असे अंदाज वर्तवण्यात आले होते. त्याच अनुमानांनुसार हरियाणामध्ये सकाळी मतमोजणी चालू झाल्यावर काँग्रेस बहुमताच्या दिशेने आघाडीवर असल्याचेही दिसून आले. सकाळी १० वाजेपर्यंत हीच स्थिती होती. त्यानंतर मात्र अचानक यात पालट होऊन भाजपला ४८ जागांवर आघाडी मिळून तो बहुमतात असल्याचे दिसून आले. ही संख्या सायंकाळपर्यंत कायम होती.
२. यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (स्वत:च्या क्षमतेवर ज्याला आत्मविश्वास नसतो, तोच अशा प्रकारे बेताल आरोप करत सुटतो ! – संपादक)
३. ८ ऑक्टोबरच्या सकाळपासून काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष करत होते; मात्र प्राथमिक फेर्यातच भाजपने आघाडी घेतल्यामुळे काँग्रेसच्या आनंदावर विरजण पडले.
४. यानंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार जयराम रमेश हे निवडणूक आयोगाकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) करणार आहेत. जयराम रमेश म्हणाले, मतमोजणीच्या १० ते १२ फेर्यांचे निकाल समोर आले आहेत; पण संकेतस्थळावर ४-५ फेर्यांचेच आकडे दाखवले जात आहेत. त्यामुळे माध्यमांनीही चुकीच्या बातम्या दाखवल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. याप्रकारे त्यांनी स्थानिक प्रशासनावर दबाव टाकणे योग्य नाही.
महिला कुस्तीपटू विनेश फोगाट विजयी !
महिला कुस्तीपटू विनेश फोगाट काँग्रेसकडून जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. त्यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार योगेश बैरागी यांचा पराभव केला.
(म्हणे) ‘तुरुंगात असणार्या निर्दोष लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू !’ – फारुख अब्दुल्ला यांचे हिरवे फुत्कारफारुख अब्दुल्ला मतमोजणीच्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, १० वर्षांनंतर लोकांनी आम्हाला बहुमताचा कौल दिला आहे. आमची अल्लाकडे प्रार्थना आहे की, आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकू. जम्मू-काश्मीरमध्ये आमचे सरकार म्हणजे ‘पोलीस राज’ नसून लोकांचे राज्य असेल. आम्ही तुरुंगात असणार्या निर्दोष लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. माध्यमांना स्वातंत्र्य असेल. हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये विश्वास निर्माण करावा लागेल. मला आशा आहे की, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देण्यासाठी इंडी आघाडीतील मित्रपक्ष आमच्यासमवेत उभे रहातील.
अंतर्गत वादामुळे हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव !फारुख अब्दुल्ला यांनी हरियाणात काँग्रेसच्या पराभवावर म्हटले की, हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्याने मला वाईट वाटत आहे. मला वाटते की, त्यांच्या अंतर्गत वादामुळे हे सगळे घडले. संपादकीय भूमिकाकोण निर्दोष आणि कोण आतंकवादी, हे अब्दुल्ला कसे ठरवणार आहेत ? निर्दोषत्वाच्या नावाखाली आतंकवाद्यांना ते बाहेर काढणार आहेत का ? |
भाजपच्या २९ वर्षीय शगुन परिहार किश्तवाड मतदारसंघातून विजयी !
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी चालू असून किश्तवाड मतदारसंघातून भाजपच्या २९ वर्षीय शगुन परिहार अवघ्या ५२१ मतांनी विजयी झाल्या आहेत. शगुन यांनी त्यांचा जवळचा प्रतिस्पर्धी सज्जाद अहमद किचलू यांचा पराभव केला. शगुन यांचे वडील अजित परिहार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले त्यांचे काका अनिल परिहार यांची १ नोव्हेंबर २०१८ या दिवशी आतंकवाद्यांनी हत्या केली होती.
निवडणूक प्रचाराच्या वेळी शगुन परिहार म्हणाल्या होत्या की, त्यांना मिळणारे प्रत्येक मत हे त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या प्राणांमुळे नाही, तर जिहादी आतंकवाद्यांच्या हाती जम्मू-काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या सर्व कुटुंबांच्या प्राणार्पणासाठी असेल.