संपादकीय : पुन्हा एकदा ‘सर तन से जुदा’च्या घोषणा ?

धर्मांधांचा उद्रेक

उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील डासनादेवी पिठाचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप धर्मांधांनी केला आहे. त्यांनी ४ दिवसांपूर्वी विधान केले आणि ४ ऑक्टोबर या दिवशी अनेक भागांत विशेषत: महाराष्ट्रात अमरावती, उत्तरप्रदेशातील कानपूर येथे त्याचे हिंसक पडसाद उमटले. अगदी आखाती देशांमध्ये याचे पडसाद उमटून तेथूनही निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे धर्मांधांची ‘सर तन से जुदा’ (डोके शरिरापासून वेगळे करणे) ही आवडती (?) घोषणा प्रत्येक ठिकाणी देण्यात येत आहे. अमरावती येथे तर पोलिसांच्या अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली, पोलिसांवर आक्रमण करत त्यांना पळवून लावण्यात आले. अशी भयंकर स्थिती निर्माण झाली. महंत यति नरसिंहानंद यांनी नेमके काय वक्तव्य केले ? ते तरी धर्मांधांना ठाऊक आहे का ? त्यानंतर धर्मांधांकडून जो उद्रेक आणि आकांडतांडव करण्यात येत आहे, ते मात्र गंभीर आहे.

पोलिसांना दंगल हाताळता न येणे ?

पोलिसांना दंगलीची परिस्थिती हाताळता न येणे, हे त्याहून गंभीर आहे. धर्मांधांच्या हिंसक वृत्तीची, त्यांच्या मानसिकतेची जाण अद्याप पोलिसांना कशी येत नाही ? अमरावती येथे धर्मांधांकडून यापूर्वीही दंगली घडवून हिंदूंच्या मालमत्तेची हानी करण्यात आली आहे आणि हिंदूंमध्ये भीती निर्माण केली आहे. अमरावतीमधील पोलीस ठाण्याजवळ एवढ्या मोठ्या संख्येने धर्मांध गोळा होत असतांना पोलिसांना सुगावा का लागत नाही ? आधी घटना घडूनही पोलीस मार खातात, याला उत्तरदायी कोण ? कि पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश लवकर दिले जात नाहीत ?

महमूद मदनी

यति नरसिंहानंद यांनी डासनापीठ येथील एका कार्यक्रमात पैगंबर यांच्याविषयी वक्तव्य केले. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर धर्मांधांचा उद्रेक झाला आहे. मूळ वक्तव्याचा विचार करतांना नरसिंहानंद यांनी रावणाचे अत्याचार आणि सध्या होणारे अत्याचार यांचा दाखला दिला. सध्याच्या जगभरातील अत्याचारांना एका धार्मिक विचारसरणीच्या प्रमुखाला उत्तरदायी ठरवले असून ते सध्याचे रावण असल्याने त्यांच्या पुतळ्याचे दहन केले पाहिजे, अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे कथित भावना दुखावणार्‍या वक्तव्यांविषयी त्यांच्याविरुद्ध आकांडतांडव केले जात आहे. ‘जमियत-उलेमा-हिंद’चे महमूद मदनी यांनी यति नरसिंहानंदांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्याच्या समवेत ‘महंत यति नरसिंहानंद हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत’, असे सांगितले आहे. एका महंतांनी केलेल्या कथित भावना दुखावणार्‍या वक्त्यव्यावर मदनी यांना राग येत असेल, तर इस्लामी विचारवंत म्हणवला जाणारा डॉ. झाकीर नाईक हिंदु देवतांच्या संदर्भात अवमानकारक टिपण्या करतो, हिंदूंच्या धर्मांतराविषयी आणि सामाजिक माध्यमांवर हिंदु देवतांविषयी अश्लील विधाने करतो, तेव्हा त्याला विरोध का केला जात नाही ? त्या वेळी इस्लामी विचारवंत, मौलाना यांच्याकडून मौन का बाळगले जाते ? म्हणजे हिंदु देवतांचा अवमान त्यांना मान्य असतो. एकीकडे हिंदु देवतांवर टीका करण्याची स्वत:च्या धर्मबांधवांना मूकसंमती द्यायची आणि स्वत:च्या पंथाच्या प्रमुखावर टीका केल्याचा संशय जरी आला, तरी ऊर बडवून घ्यायचे, हे आता बहुसंख्य हिंदूंना लक्षात आले आहे. मदनी यांच्यासारखे इस्लामी विद्वान एकीकडे कायदेशीर प्रक्रियेचा मार्ग अवलंबतात आणि दुसर्‍या बाजूला त्यांच्या अनुयायांना तोडफोड वा हिंसा करण्यापासून रोखत नाहीत, ही त्यांची दुहेरी खेळी असते.

झुंडशाहीच्या बळावर दबाव !

केवळ झुंडशाहीच्या बळावर वास्तव काय आहे, ते लक्षात न घेता हिंसक कृती करून पोलीस, प्रशासन यांना कारवाईसाठी दबाव आणायचा, ही धर्मांधांची नीतीच आहे. याला काँग्रेसने मान्य केल्यामुळे तिच्या राजवटीत धर्मांधांनी गुन्हे करूनही कारागृहात मात्र हिंदूच जायचे आणि नंतर पोलिसी अत्याचार सहन करायचे. धर्मांधांच्या आक्रमकतेला कशा प्रकारे हाताळायचे ? हे आपल्या इतिहासात केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांनाच समजले आणि ते धर्मांधांचे राज्य उलथवून सुरक्षित, शांतता अन् सहिष्णुता जोपासणारे हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकले.

नंद किशोर गुर्जर

सध्या कोणतेही कारण उकरून काढून हिंदूंच्या हत्या करण्याचे, त्यांच्यात दहशत निर्माण करण्याचे धर्मांध निमित्तच शोधत असतात आणि आक्रमणे करतात. डासना येथील मंदिराबाहेर २ सहस्रांहून अधिक धर्मांध जमले आणि ते मंदिराला चहूबाजूंनी घेरून मंदिरावर चाल करून गेले. या वेळी त्यांनी हिंसक घोषणा दिल्या. भाजपचे स्थानिक आमदार नंद किशोर गुर्जर यांनी सांगितले, ‘‘धर्मांध मंदिर तोडण्यासाठी आणि मंदिरातील पुजार्‍यांची हत्या करण्यासाठीच आले होते. त्या वेळी मोठ्या संख्येने पोलीस आले म्हणून मंदिर वाचले. पोलिसांनी तेव्हा खरेतर थेट कारवाई करून धर्मांधांवर गोळीबार करायला हवा होता.’’ नंद किशोर गुर्जर यांनी धर्मांधांना चेतावणी देतांना म्हटले आहे, ‘‘हे प्राचीन मंदिर आहे. मंदिरावर आक्रमण झाल्यास धर्मांधांच्या ७ पिढ्या लक्षात ठेवतील, अशी कारवाई करू !’’ मंदिराच्या रक्षणासाठी स्वत:हून पुढे येणारे असे आमदार हे स्थानिक हिंदूंसाठी आधारस्तंभाप्रमाणे असतात; कारण धर्मांधांच्या आक्रमक पावित्र्यापुढे जेथे पोलीसही हतबल होतात, मोठे राजकीय पक्षही हात झटकतात आणि काही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनाही लांब रहातात, तिथे स्थानिक हिंदु नेत्यांची हिंदूंना अत्यंत आवश्यकता असते. खरे काय आणि खोटे काय ? हे समजून घेण्याची मानसिकता धर्मांधांची नसते आणि थेट कायदा-सुव्यवस्था हातात घेतल्यामुळे बहुसंख्यांकांना दहशतीखाली रहावे लागते. उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारत आहे. या प्रकरणीही पोलीस कणखर भूमिका घेत आहेत.

प्रश्न केवळ झुंडशाहीने रस्त्यावर उतरणार्‍यांच्या मानसिकतेचा आहे. माजी संपादक ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीरामाचा अवमान केल्याच्या प्रकरणी हिंदूंनी संयत निषेध व्यक्त करत पोलीस ठाण्यात तक्रारी, निदर्शने केली. कुणीही कायदा हातात घेतला नाही. हिंदूंनी ‘संबंधितांवर कारवाई होणे’, हा मुख्य उद्देश ठेवला, तर याउलट धर्मांधांनी मात्र ‘इस्लामचा अवमान’ या सूत्राच्या आड हिंदूंवर दहशत बसवणे, हा उद्देश ठेवल्याचे लक्षात येते. त्यासाठी ते कोणत्याही थराला जातील. यामुळे धर्मांधांवर त्यांची हिंदुविरोधी आणि देशविरोधी मानसिकता पालटण्यासाठी जरब बसणे आवश्यक आहे !

काहीतरी निमित्त करून दहशत निर्माण करण्याची धर्मांधांची मानसिकता पालटण्यासाठी कणखर नेतृत्वच हवे !