Pakistan : पाकिस्तान आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी एकमेकांसमवेत आहे ! – ख्वाजा आसिफ, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री

कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या सूत्रावर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे विधान

जम्मू – काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम ३७० हे कळीचे सूत्र बनले आहे. यात आता पाकिस्ताननेही नाक खुपसले आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ए पुन्हा लागू करण्याच्या सूत्रावर पाकिस्तान, तसेच काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांची आघाडी, आम्ही एकमेकांसमवेत आहोत, असा विधान पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले.

भाजपकडून टीका !

यानंतर भाजपकडून आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानसारखा एक आतंकवादी देश काश्मीरच्या सूत्रावर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्स यांच्या भूमिकेला पाठिंबा देतो, अशी टीका भाजपचे नेते अमित मालवीय यांनी केली आहे. जो पाकिस्तानचे जे सूत्र आहे, तेच सूत्र काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांचेही आहे, हे आता स्पष्ट  झाले आहे, असे भाजपचे नेते शहजाद पूनावाला यांनी म्हटले आहे.

काँग्रेस आणि पाकिस्तान यांचे एकच धोरण ! – अमित शहा

अमित शहा

गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी देशवासियांच्या भावना दुखावत सर्व भारतविरोधी शक्तींसमवेत उभे आहेत. एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक यांचे पुरावे मागणे असो किंवा भारतीय सैन्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे असो, राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष अन् पाकिस्तान यांचे धोरण नेहमी समान असते, तसेच काँग्रेसचा हात नेहमीच देशविरोधी शक्तींसमवेत असतो. तथापि काँग्रेस पक्ष आणि पाकिस्तान हे विसरतात की, केंद्रात मोदी सरकार आहे, त्यामुळे काश्मीरमध्ये कलम ३७० किंवा आतंकवाद परत येणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स वर पोस्ट लिहून आसिफ यांच्या विधानावर व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका  

पाकिस्तान कुणाकुणा समवेत आहे ? आणि कोणकोण पाकिस्तानसमवेत आहे ?, हे पाकिस्तानेच सांगितले ते बरे झाले ! त्यामुळे आता तरी भारतियांना काँग्रेसचे खरे स्वरूप कळेल !