१७.९.२०२४ या दिवशी या लेखाचा पहिला भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/834839.html
३ उ. मनुष्याचा जन्म प्रारब्धभोग भोगण्यासह ईश्वरप्राप्ती करण्यासाठी होणे : मनुष्याने गत जन्मांत किमान ५० टक्के पुण्यकर्म केले, तरच त्याला पुन्हा मनुष्यजन्म मिळतो आणि ७० टक्के पुण्य केले, तर मृत्यूनंतर स्वर्गलोक अन् ७० टक्के पापकर्म केले, तर त्याला नरकात जावे लागते. अन्य प्राणीमात्रांच्या तुलनेत मनुष्याची बुद्धी अधिक सूक्ष्म आणि तीव्र असल्यामुळे त्याला कर्माचे संपूर्ण ज्ञान असते. त्यामुळे मनुष्य त्याचे कर्म करून एक प्रकारे स्वतःचे प्रारब्ध ठरवत असतो. त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांपैकी केवळ मनुष्याला धर्माचरण आणि साधना करण्याची बुद्धी असल्याने तो पुण्यकर्म करण्यासह अकर्म कर्म करून मोक्षप्राप्ती किंवा ईश्वरप्राप्ती करू शकतो. त्यामुळे जेव्हा जिवाला मनुष्याचा जन्म मिळतो, तेव्हा तो केवळ प्रारब्धभोग भोगण्यासाठी नसून ईश्वरप्राप्ती करण्यासाठीही मिळालेला असतो. त्यामुळे मनुष्याने धर्माचरण केल्यास त्याच्या जीवनात देहधारी गुरु किंवा धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांच्यावर आधारित ग्रंथरूपी गुरु अवतरून त्याच्यावर कृपा करून त्याची सद्सद्विवेकबुद्धी जागृत करतात. तेव्हा त्याला ‘ईश्वरप्राप्तीसाठी धर्माचरण आणि साधना करण्याचे महत्त्व उमजते. त्यानंतर श्री गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे साधना केल्यावर मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीच्या गतीनुसार त्याला मोक्षप्राप्ती होते, उदा. मंद गतीने आध्यात्मिक उन्नती करणार्या मनुष्याला किमान १० ते १५ जन्म, मध्यम गतीने आध्यात्मिक उन्नती करणार्या मनुष्याला किमान ६ ते ९ जन्म आणि तीव्र गतीने आध्यात्मिक उन्नती करणार्या मनुष्याला किमान १ ते ५ जन्म मोक्षप्राप्ती करण्यासाठी घ्यावे लागतात. त्यामुळे मनुष्यजन्म अनमोल आहे.
३ ऊ. सारांश : जिवाचे प्रारब्ध निर्माण होण्यामध्ये किंवा जिवाने ते भोगण्यामध्ये ईश्वराची, म्हणजे विश्वविधात्याची कोणतीही इच्छा कार्य करत नसते. व्यक्तीच्या बुद्धीच्या प्रकारानुसार तो चांगले किंवा वाईट कर्म करत असतो अन् तसे प्रारब्धभोग भोगत असतो.
४. ईश्वराच्या इच्छेने विश्वातील भक्तांसाठी निर्माण झालेली विधाने किंवा नियम
विश्वनिर्मात्याने सामान्य जिवांसाठी विधाने किंवा नियम केलेले आहेत. हा विश्वनिर्माता कुणाच्याच अधीन नसतो. तो केवळ त्याच्या खर्या भक्तांच्या अधीन असतो. भगवंत सर्व बंधनांच्या पलीकडे असतो. त्याला केवळ भक्तीचेच बंध बांधून ठेवू शकतात. त्यामुळे भगवंताने सर्वसामान्य जीव किंवा मनुष्य यांच्यासाठी बनवलेले नियम त्याच्या भक्तांना लागू होत नाहीत. त्याच्या भक्तांसाठी पुढील प्रकारचे निराळेच नियम लागू असतात.
४ अ. भक्तांच्या भक्तीनुसार त्यांना भगवंताची प्रीती आणि कृपा अनुभवता येणे : भक्त आणि भगवंत यांचे नाते सर्व प्रकारच्या मायाबंधनांना ओलांडून जाणारे असते. त्यामुळे भक्ताच्या भक्तीचा प्रकार आणि प्रमाण यांनुसार भक्ताला थेट भगवंत किंवा भगवंताचे सगुण रूप असणारे श्रीगुरु यांची प्रीती अन् कृपा अनुभवता येते. त्यामुळे सामान्य जिवाप्रमाणे किंवा मनुष्याप्रमाणे भक्त सुख-दुःखामध्ये गटांगळ्या न खाता थेट आध्यात्मिक स्तरावरील आनंद अनुभवू शकतो.
४ आ. भक्तांच्या मंद आणि मध्यम सुख-दुःखात भगवंत ढवळाढवळ न करता साक्षीभावाने पहात असणे; मात्र तीव्र प्रारब्धात भगवंताने हस्तक्षेप करणे : भक्ताने गत जन्मांत किंवा चालू जन्मात केलेल्या कर्मानुसार त्याला मंद किंवा मध्यम स्वरूपाचे सुख-दुःखरूपी प्रारब्ध भोगावे लागते. यात भगवंत शक्यतो हस्तक्षेप न करता साक्षीभावाने पहात रहातो. काही वेळा भक्ताने केलेले धर्माचरण आणि साधना यांच्यामुळे त्याचे मंद प्रारब्ध जळून जाते, मध्यम स्वरूपाच्या प्रारब्धाची तीव्रता उणावते आणि तीव्र प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी त्याला भगवंत किंवा गुरु आध्यात्मिक बळ देतात. काही वेळा भगवंत किंवा गुरु यांच्या कनवाळू वृत्तीमुळे त्यांनी भक्ताला तीव्र प्रारब्धभोग भोगतांना पाहिले किंवा भक्ताने भगवंताला कळवळून प्रार्थना केली, तर भगवंत किंवा गुरु यांचे मन द्रवते आणि ते साक्षीभाव सोडून भक्ताच्या जीवनात हस्तक्षेप करतात. त्यामुळे भक्ताचे तीव्र प्रारब्धभोग मंद होतात किंवा ते पूर्णपणे जळून नष्ट होतात किंवा भगवंत स्वतः भक्ताचे प्रारब्ध भोगतो.
४ आ १. प्रारब्धभोग उणावल्याची उदाहरणे
४ आ १ अ. श्रीजगन्नाथाने भक्त माधवदासाचे प्रारब्धभोग १५ दिवस स्वतः भोगणे : कलियुगात श्रीजगन्नाथपुरीमध्ये श्री जगन्नाथाचे एक थोर भक्त माधवदास रहात असत. एकदा त्यांना ताप येऊन त्यांचे पोट बिघडले. हे १५ दिवसांचे शारीरिक प्रारब्ध भोगल्यावर भक्त माधवदासांनी हे प्रारब्धभोग नष्ट होण्यासाठी श्रीजगन्नाथाला प्रार्थना केली. तेव्हा भक्तवत्सल श्रीजगन्नाथाने मनोमन सांगितले की, भक्त माधवदासाचे आणखी १५ दिवसांचे शारीरिक प्रारब्धभोग भोगणे शिल्लक आहे; परंतु भक्त माधवदासांची स्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे मीच हे प्रारब्धभोग भोगतो. त्यानंतर श्रीजगन्नाथपुरीत एक आकाशवाणी झाली की, प्रभु श्रीजगन्नाथाची प्रकृती बिघडल्याने ते रुग्णाईत आहेत. त्यामुळे पुढील १५ दिवस श्रीजगन्नाथाचे मंदिर बंद राहील. त्याप्रमाणे अजूनही प्रत्येक वर्षी आषाढ मासात श्रीजगन्नाथाचे मंदिर १५ दिवस बंद ठेवण्याची परंपरा चालू आहे.
४ आ १ आ. भक्त द्रौपदीचे शील हरण होण्यापासून रक्षण करणे : द्वापरयुगात हस्तिनापुरात जेव्हा कौरव आणि पांडव द्युत क्रीडा खेळत असतांना पांडवांचा पराभव होतो, तेव्हा दुर्याेधन दुःशासनाला द्रौपदीला केसाने ओढून राजदरबारात आणण्याची आज्ञा देतो. दुःशासन द्रौपदीचे केस पकडून तिला फरफटत राजदरबारात घेऊन येतो आणि दुर्याेधनाच्या सांगण्यावरून तिचे वस्त्रहरण करू लागतो. तेव्हा द्रौपदी दरबारातील प्रत्येक विराला विनंती करते; पण कुणीच तिच्या साहाय्याला येत नाही. तेव्हा ती तिच्या दाताने साडीचा पदर घट्ट धरून ठेवते; परंतु दु:शासनाने जोर लावल्यामुळे तिच्या दातांतून साडी निसटून जाते. ‘आता आपले काही खरे नाही’, हे लक्षात आल्यावर ती श्रीकृष्णाला संपूर्ण शरण जाऊन आर्ततेने प्रार्थना करते. तेव्हा श्रीकृष्ण हस्तिनापुरापासून दूर द्वारकेत असतो. द्रौपदीची करुण प्रार्थना ऐकल्यावर श्रीकृष्ण हस्तिनापुराच्या राजदरबारात सूक्ष्मातून प्रगट होतो आणि तो द्रौपदीला अक्षय्य वस्त्र पुरवतो. त्यामुळे द्रौपदीचे शीलरक्षण होते. अशा प्रकारे श्रीकृष्णाने त्याची भक्त आणि प्रिय बहीण द्रौपदी हिच्या तीव्र प्रारब्धात हस्तक्षेप करून तिचे रक्षण केले.
४ आ १ इ. श्रीहरि विष्णूने भक्त प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूच्या प्राणघातक अत्याचारांपासून रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण करणे : हिरण्यकश्यपु हा विष्णुद्रोही त्रिलोक विजेता पराक्रमी असुर होता. त्याचा पुत्र ‘प्रल्हाद’ हा परम विष्णुभक्त होता. हिरण्यकश्यपूने सांगूनही प्रल्हादाने श्रीविष्णूची भक्ती सोडली नाही. त्यामुळे हिरण्यकश्यपूने त्याच्या सैनिकांना भक्त प्रल्हादाला अनेक वेळा मृत्यूदंड देण्याचा आदेश दिला; परंतु भक्त प्रल्हादाच्या परम भक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीविष्णूच्या कृपेने त्याचे प्रत्येक प्राणघातक संकटातून रक्षण झाले. अखेरीस भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी स्वतः हिरण्यकश्यपूने गदेने प्रहार करण्याचे ठरवल्यावर त्याच्या राजमहालातील खांबातून श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार ‘श्रीनरसिंह अवतार’ प्रगट झाला आणि त्याने हिरण्यकश्यपूचा अंत केला. अशा प्रकारे श्रीविष्णूने भक्त प्रल्हादाच्या जीवनात अनेक वेळा उद्भवलेल्या मरणांतक तीव्र प्रारब्धातून त्याचे रक्षण केले.
त्यामुळे विश्वाच्या आध्यात्मिक इतिहासात भगवंताची विविध रूपे आणि त्याचे अवतार यांच्या समवेत त्याच्या परम प्रिय भक्तांचीही नावे सुवर्ण अक्षरांत कोरली जाऊन ती वैश्विक इतिहासात अजरामर झाली आहेत.
४ इ. तात्पर्य : भगवंत तंतोतंत धर्माचरण आणि तीव्र साधना करणार्या त्याच्या परम प्रिय भक्तांच्या तीव्र प्रारब्धात हस्तक्षेप करून त्यांचे रक्षण करतो. त्यामुळेच तर श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतांना सांगतो,
‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१) म्हणजे ‘माझ्या भक्तांचा कधीही नाश किंवा अधःपतन होत नाही.’
५. सर्व घटना ईश्वरेच्छेनेच घडतात !
५ अ. ईश्वरेच्छेचे प्रकार आणि स्तर : अशा प्रकारे भगवंताच्या विश्वाशी संबंधित असणार्या इच्छा या निर्गुण, अप्रत्यक्ष आणि अप्रगट स्वरूपातील असतात, तर भगवंताच्या भक्तासाठीच्या इच्छा सगुण-निर्गुण, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आणि प्रगट-अप्रगट स्वरूपातील असतात, तसेच भगवंताच्या सामान्य जिवाशी संबंधित असणार्या इच्छा या सगुण, प्रत्यक्ष आणि प्रगट स्वरूपातील असतात.
५ आ. ईश्वरेच्छेचे जीव आणि सामान्य मनुष्य, भक्त आणि विश्व यांच्याशी संबंधित इच्छांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, प्रकार आणि स्तर
५ इ. विश्वातील प्रत्येक घटना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या ईश्वरेच्छेनेच घडणे : अशा प्रकारे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्यापासून प्रत्येक जिवाचा जन्म आणि भोग, मनुष्याचा जन्म आणि त्याचे प्रारब्ध हे भगवंताची भक्तांवरील कृपा आणि त्यांच्या तीव्र प्रारब्धात भगवंताने हस्तक्षेप करून केलेले भक्तांचे रक्षण’, या सर्व घटना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या ईश्वरेच्छेने घडतात’, हेच प्रकर्षाने दिसून येते.
६. कृतज्ञता
‘श्री गुरूंच्या कृपेमुळे भगवंताच्या विविध इच्छांचे प्रकार आणि भक्त अन् भगवंत यांचे अलौकिक नाते यांचे वरील ज्ञानातून सूक्ष्म पैलू उमजले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक आणि वेळ २२.८.२०२४ दुपारी २.१० ते ३.५०)
|