१. परमेश्वर, ईश्वर, अवतार आणि त्रिदेव यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !
२. त्रिदेवांची विश्वाच्या कार्याशी संबंधित असणारी शक्ती आणि इच्छा
ईश्वर हा निर्गुण आणि निराकार आहे. त्याच्या ३ प्रकारच्या इच्छांमधून त्रिदेवांची निर्मिती झाली. त्रिदेवांच्या विश्वाच्या कार्याशी संबंधित असणार्या शक्ती आणि इच्छा पुढीलप्रमाणे आहेत.
२ अ. ब्रह्मदेवाची विश्वाच्या निर्मितीशी संबंधित शक्ती आणि इच्छा : ईश्वराला स्वतःचे विराट आणि विशाल स्वरूप पहायचे होते. त्यामुळे ईश्वरापासून ब्रह्मदेव आणि सरस्वतीदेवी यांची निर्मिती झाली. यानंतर ब्रह्मदेवाने संकल्प करून संपूर्ण सृष्टीची आणि अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून असणार्या जीवित आणि निर्जीव जगताची, म्हणजे ‘अखिल विश्वाची’ निर्मिती केली. तेव्हा ब्रह्मदेवाच्या विश्वाच्या उत्पत्तीशी संबंधित असलेल्या इच्छापूर्तीसाठी ‘सृजनशक्ती आणि इच्छाशक्ती’, या दोन प्रकारच्या शक्ती कार्यरत झाल्या.
२ आ. श्रीविष्णूची विश्वाच्या संचालनाशी संबंधित शक्ती आणि इच्छा : ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीचे पालन आणि पोषण करण्यासाठी ईश्वराने श्रीविष्णूची निर्मिती केली. तेव्हा श्रीविष्णूच्या विश्वाच्या ‘स्थिती’ या कार्याशी निगडित ‘विश्वाचे पालन करणारी तारक शक्ती आणि विश्वाला गतीमान ठेवणारी क्रियाशक्ती’, या दोन प्रकारच्या शक्ती कार्यरत झाल्या.
२ इ. शिवाची विश्वाच्या विनाशाशी संबंधित शक्ती आणि इच्छा : निर्मिलेले विश्व हे काळाच्या अधीन असल्यामुळे या विश्वात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे तीन प्रकारचे काळ कार्यरत असतात. या तिन्ही काळांचा अधिपती ‘महाकाळ’ म्हणजे ‘शिव’ आहे. ‘शिव’ विश्वाच्या लयाशी संबंधित असतो. त्यामुळे प्रत्येक मन्वंतरात महाप्रलय येऊन विश्वाचा लय होतो. तेव्हा शिवाच्या विश्वाच्या लयाशी संबंधित असणारी लयकारीशक्ती किंवा मारक शक्ती या दोन प्रकारच्या शक्ती कार्यरत असतात.
२ ई. त्रिदेवांमध्ये तीन प्रकारच्या वैश्विक कार्यांशी संबंधित असणारी इच्छा जागृत होऊन कार्यरत असणे : अशा प्रकारे विश्वाचा (१४ भुवने आणि जीव यांची) ठराविक काळानंतर उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो अन् ही प्रक्रिया सतत चालू असते. या कार्याला अनुसरून ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्यामध्ये अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती अन् लय यांच्याशी संबंधित इच्छा जागृत होऊन कार्यरत असतात. या सर्व इच्छा संपूर्ण विश्वाशी संबंधित आणि सूक्ष्मतम स्तरावरील असल्यामुळे या इच्छा ‘निर्गुण स्तरावरील इच्छा’ आहेत.
२ उ. सारांश : अशा प्रकारे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित असणार्या सर्व घटना या ईश्वरेच्छेनेच होतात.
३. ईश्वराच्या इच्छेने विश्वातील जिवांसाठी निर्माण झालेली विधाने किंवा नियम
ईश्वराने सर्वसामान्य जीव आणि मनुष्य यांच्यासाठी खालील विधाने किंवा नियम बनवले आहेत. त्यामुळे त्याला ‘विश्वविधाता’, असे संबोधले आहे.
३ अ. प्रत्येक जिवाला न्यून-अधिक बुद्धी देणे : ईश्वराच्या इच्छेने प्रत्येक जिवाला थोडी बुद्धी असते. मनुष्य सोडून अन्य जिवांना केवळ ठराविक क्रिया करण्यासाठी अत्यल्प प्रमाणात बुद्धी दिलेली आहे, उदा. कुत्र्याला भूक लागल्यावर खाणे, मल-मूत्र विसर्जन करणे, लैंगिक क्रिया करणे आणि धोका असेल, तर भुंकणे किंवा चावणे.
३ आ. बुद्धीच्या प्रकारानुसार जिवाकडून चांगले किंवा वाईट कर्म घडणे : केवळ मनुष्याला कर्म करण्यासाठी भगवंत सात्त्विक, राजसिक किंवा तामसिक अशी तीन प्रकारची बुद्धी देतो.
१. तामसिक बुद्धी : मनुष्य धर्माचरण आणि साधना करणारा नसेल, तर त्याची तामसिक बुद्धी कार्यरत होऊन त्याच्या मनात इतरांचे वाईट करण्याची इच्छा निर्माण होते अन् त्याच्याकडून वाईट कर्म होते, उदा. इतरांना जाच देऊन त्यांच्याकडून पैसे उकळणे, इतरांना मारहाण करणे, भ्रष्टाचार करणे, बलात्कार करणे इत्यादी.
२. राजसिक बुद्धी : जेव्हा मनुष्याची राजसिक बुद्धी कार्यरत असते, तेव्हा त्याच्या मनात स्वतःविषयी किंवा केवळ स्वतःच्या कुटुंबापुरते विचार येऊन त्याच्याकडून काही वेळा थोडेफार वाईट किंवा थोडेफार चांगले कर्म घडते, उदा. स्वतःच्या कुटुंबाला सुख देण्यासाठी विविध प्रकारच्या सुखासीन वस्तू विकत घेणे; मात्र स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी दुकानदाराशी खोटे बोलणे किंवा त्याला खोटे पैसे देणे.
३. सात्त्विक बुद्धी : जेव्हा मनुष्याची सात्त्विक बुद्धी कार्यरत असते, तेव्हा त्याच्या मनात इतरांच्या कल्याणाचे विचार येऊन त्याच्याकडून चांगले कर्म घडते.
३ इ. कर्मातून प्रारब्धाची निर्मिती होणे आणि प्रत्येक जिवाला कर्माचे फळ भोगावेच लागल्याने त्याला सुख किंवा दुःख यांची प्राप्ती होणे : प्रत्येक कर्म हे बीजरूपात असते. जसे बीज अंकुरण्यास ठराविक वेळ लागतो, तसेच कर्मबीज फलित होण्यासाठीही ठराविक कालावधी लागतो. त्यामुळे प्रत्येक कर्मरूपी बीज फलित झाल्यावर त्याचे एक निश्चित फळ असते. त्यानुसार जिवाच्या एका जन्मातील सर्व कर्मांचे फळ एकित्रितरित्या ‘संचित’ म्हणून निर्माण होते. जीव त्याच्या पुढील जन्मात किंवा मृत्यूनंतर एकूण संचितातील थोडासा भाग भोगत असतो. त्याला ‘प्रारब्ध’ म्हणतात. प्रारब्धामुळे जिवाच्या चांगल्या कर्मामुळे त्याला पुण्य लाभून सुख किंवा वाईट कर्मामुळे पाप लागून दुःख भोगावे लागते.
३ ई. मनुष्य सोडून अन्य प्राणीमात्रांचा भोग भोगण्यासाठी पुनःपुन्हा जन्म होणे : विश्वात एकूण ८४ लक्ष योनी आहेत. जीव प्रत्येक जीवनात क्रिया करत असल्यामुळे त्याला कर्मफलन्याय लागू न पडता तो थेट पुढच्या पुढच्या योनीत जन्माला येतो आणि त्याला शेवटचा, म्हणजे ८४ वा मनुष्य जन्म मिळतो. या जन्मात त्याच्याकडून कर्म घडत असते. त्यामुळे केवळ मनुष्याला प्रारब्धभोग भोगावे लागतात, तर अन्य जिवांना त्यांच्या संबंधित योनीशी संबंधित केवळ भोग भोगायचे असतात. त्यामुळे मनुष्य सोडून अन्य प्राणीमात्रांचा भोग भोगण्यासाठी विविध जिवांच्या स्वरूपात विविध प्रकारचे स्थूल देह मिळत असतात.
(क्रमशः उद्याच्या अंकात)
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (सूक्ष्मातील ज्ञान मिळण्याचा दिनांक आणि वेळ २२.८.२०२४ दुपारी २.१० ते ३.५०)
या लेखाच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/835112.html
|