SC Slams CBI : सीबीआयने ती ‘बंद पिंजर्‍यातील पोपट नाही’, हे सिद्ध करावे ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

सर्वोच्‍च न्‍यायालयाचे सीबीआयला खडे बोल !

नवी देहली : देहलीतील मद्य धोरण आर्थिक गैरव्‍यवहार प्रकरणातील देहलीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्‍च न्‍यायालयाने १३ सप्‍टेंबरला जामीन संमत केला. त्‍यामुळे मागील ६ महिन्‍यांपासून कारागृहात असलेले केजरीवाल १३ सप्‍टेंबरला संध्‍याकाळी तिहार कारागृहातून बाहेर आले. अरविंद केजरीवाल यांच्‍या याचिकेवर सुनावणी करतांना न्‍यायमूर्ती सूर्यकांत आणि न्‍यायमूर्ती उज्‍ज्‍वल भूइंया यांच्‍या खंडपिठाने सीबीआयला खडे बोल सुनावले. न्‍यायमूर्ती भूइंया म्‍हणाले, ‘‘सीबीआयला सिद्ध करावे लागेल की ती बंद पिंजर्‍यातील पोपट नाही.’’

न्‍यायमूर्ती भुइंया म्‍हणाले की, चुकीच्‍या पद्धतीने कुणालाही अटक होऊ नये, यासाठी शक्‍य ते सर्व प्रयत्न सीबीआयने करायला हवेत. प्रदीर्घ कारावास हा एखाद्याचे स्‍वातंत्र्य हिरावून घेऊ शकतो. सीबीआय ‘बंद पिंजर्‍यातील पोपट’ असल्‍याचा लोकांचा समज त्‍यांना दूर करावा लागेल. देशातील नागरिकांच्‍या मनात निर्माण झालेली ही प्रतिमा पालटण्‍यासाठी संस्‍थेने प्रयत्न करावे.