नास्तिकता माणसाला परवडणारी नाही. एका मोठ्या माणसाची वास्तवात घडलेली एक गोष्ट सांगतो. केरूनाना छत्रे या नावाचे एक प्रसिद्ध गणिती महाराष्ट्रात होऊन गेले. ते नास्तिक होते. केरूनाना महर्षि अण्णासाहेब पटवर्धन यांचे गुरु. अण्णासाहेब धार्मिक आणि सश्रद्ध होते. या गुरु-शिष्यांचे मोठे प्रेम होते. केरूनाना एकदा आपल्या शिष्याच्या खोलीवर निवासासाठी होते. पहाटेची वेळ होती. केरूनाना काहीतरी पुटपुटत होते. काही वेळाने अण्णासाहेबांनी विचारले, ‘नाना, ध्यानाला बसल्यासारखे काय पुटपुटत होता ?’ केरूनाना म्हणाले, ‘मी विष्णुसहस्रनाम म्हणत होतो.’ पटवर्धनांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ‘नाना, तुम्ही विष्णुसहस्रनाम म्हणता ?’ केरूनाना म्हणाले, ‘कारण सांगतो ऐक. मी माझ्या बुद्धीने जेवढा विचार करतो, त्या विचारांच्या क्षेत्रात कुठे देव आहे, असे जाणवत नाही; पण माझ्या बुद्धीच्या कक्षेत येते, तेवढेच खरे असेही मी मानू शकत नाही. माझ्या बुद्धीच्या पलीकडे काही म्हणून असणारच. त्यात देव जर असला तर म्हणून मी विष्णुसहस्रनाम म्हणतो. देव जर नसला, तर माझी १०-१२ मिनिटे वाया जातील. तसा दिवसाकाठी बराच वेळ वाया जातो. त्यातीलच ही १०-१२ मिनिटे; पण देव असला, तर मला त्याला सांगता येईल की, मी तुझ्यासाठी विष्णुसहस्रनाम म्हटले आहे.’ केरूनाना सज्जन आणि प्रामाणिक !
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘पूर्वरंग तरंग’ या ग्रंथातून)