Netflix IC 814 The Kandahar Hijack : कंदहार विमान अपहरणाशी संबधित ‘वेबसिरीज’मधील जिहादी आतंकवाद्यांना दिली हिंदु नावे !

केंद्र सरकारने ‘नेटफ्लिक्स’च्या भारतातील प्रमुखाला समन्स पाठवून बोलावले !

(वेबसिरिज म्हणजे ऑनलाईन प्रसारित करण्यात येणारी व्हिडिओची मालिका)

मुंबई – ‘नेटफ्लिक्स’(Netflix) या ओटीटी(OTT) मंचावरील वेबसिरीज ‘आय सी ८१४ द कंदहार हायजॅक’ (कंदहार विमान अपहरण) (IC 840 Kandahar Hijack) यामध्ये जिहादी आतंकवाद्यांची खरी नावे लपवून त्यांना भोला आणि शंकर अशी हिंदु नावे(Hindu Names) दिल्यावरून गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांत विरोध केला जात आहे. आता केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याची नोंद घेत ‘नेटफ्लिक्स’च्या भारतातील प्रमुखाला समन्स बजावून बोलावले आहे.

ही वेबसिरीज २९ ऑगस्ट या दिवशी प्रदर्शित झाली होती. अनुभव सिन्हा याचे दिग्दर्शक आहेत. २४ डिसेंबर १९९९ या दिवशी काठमांडूहून उड्डाण केल्यानंतर ‘इंडियन एअरलाईन्स’चे विमान ‘आयसी ८१४’चे पाकिस्तानी आतंकवाद्यांनी (Pakistani terrorists) अपहरण केले होते. याचीच कथा या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आली आहे.

विमानाचे अपहरण करणारे जिहादी आतंकवादी यांची नावे इब्राहिम अतहर (बहावलपूर), शाहिद अख्तर (कराची), सनी अहमद (कराची), जहूर मिस्त्री (कराची) आणि शाकीर (सुक्कुर सिटी) अशी होती; मात्र वेबसिरिजमध्ये त्यांची नावे ‘भोला’ आणि ‘शंकर’ अशी ठेवण्यात आल्यावरून सामाजिक माध्यमांत टीका झाली. तसेच या वेबसिरीजवर बहिष्कार घालण्याचीही मागाणी करण्यात आली.

त्यावर ‘आतंकवाद्यांनी एकमेकांसाठी सांकेतिक नाव दिले होते आणि या वेबसिरीजसाठी योग्य अभ्यास अन् माहिती घेण्यात आली आहे’, असे स्पष्टीकरण या वेबसिरीजचे एक दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी दिले होते. (जिहादी आतंकवादी नेहमीच स्वतःची ओळख लपवण्यासाठी हिंदूंची नावे धारण करतात; मात्र वेबसिरीज करतांना त्यांची खरी नावे काय होती ?, हे का सांगितले नाही ? ती का लपवण्यात का आली ? ही जिहादी मानसिकता आहे का ?, याचाही शोध घ्यायला हवा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

‘नेटफ्लिक्स’वर भारतात बंदी का घातली जात नाही ? चित्रपटांसाठी जसे केंद्रीय परीक्षण निरीक्षण मंडळ आहे, तसे वेबसिरीजसाठी सरकार मंडळ का स्थापन करत नाही ? आणखी किती वर्षे वेबसिरीजच्या माध्यमांतून भारतीय संस्कृती, हिंदु धर्म आदींचा होणारा अवमान सहन करायचा ?