सिंधुदुर्ग – आगामी गणेशोत्सवाच्या कालावधीत ५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत विविध टप्प्यांत मुंबई-गोवा महामार्गावर मुंबई ते सावंतवाडीपर्यंत अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. ७ सप्टेंबर या दिवशी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ ते ८ सप्टेंबर या दिवशी रात्री ११ या कालावधीत बंदी असणार आहे. त्यानंतर ५ आणि ७ दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन, गौरी-गणपति मूर्ती विसर्जन आणि गणेशभक्तांचा परतीचा प्रवास यांसाठी ११ सप्टेंबरच्या रात्री ८ ते १३ सप्टेंबरला रात्री ११ वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशीला ११ दिवसांच्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन आणि गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासाकरता १७ सप्टेंबरला सकाळी ८ ते १८ सप्टेंबरला रात्री ८ या कालावधीत वाहतुकीस बंदी असणार आहे.
या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असेल. हे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला आणि नाशिवंत साहित्य आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्या वाहनांना लागू रहाणार नाही. मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण आणि दुरुस्ती यांचे काम करण्यासाठी साहित्य ने-आण करणार्या वाहनांना ही बंदी लागू असणार नाही. या अनुषंगाने वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग आणि महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी. कोकणात जाणार्या गणेशभक्तांचा आणि महामार्गांचा विचार करून पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांनी जड अन् अवजड वाहनांवरील वाहतुकीचे निर्बंध शिथिल करण्याविषयी प्राप्त परिस्थितीनुसार त्यांच्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जे.एन्.पी.टी.) आणि जयगड बंदर येथून मालाची आयात-निर्यात करण्यासाठी वाहतूक चालू राहील. याकरता वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे, असे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.