स्वधर्माचरणाविषयी कंटाळा करणे हाच आळस !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

प्रश्न : किं आलस्यं च विज्ञेयम् ।

अर्थ : आळस कशाला म्हणावे ?

उत्तर : धर्मनिष्क्रियता.

अर्थ : स्वधर्माचरणाविषयी कंटाळा करणे, हाच आळस होय.

कर्तव्यकर्माचा त्याग न करता कर्म करणे महत्त्वाचे !

जे करणे आवश्यक आणि इष्ट आहे, ते कर्तव्य म्हणून केलेच पाहिजे. अशा गोष्टी करण्याचा कंटाळा असणे, म्हणजे आळस होय. या प्रकारचा आळस मात्र पुष्कळ ठिकाणी आढळतो. मुले खेळण्याच्या नादात हुंदडत असतात; पण अभ्यासाचा कंटाळा करतात, असा अनुभव बहुधा घरोघरी असतो. थोरांचेही तसेच होते. नाटक, कादंबर्‍या, लघुकथा त्यातही अपराध कथा, वृत्तपत्रे यांच्या वाचनात बराच वेळ घालवणारे लोक पुष्कळ आहेत. जीवनावर चांगले संस्कार घडवतील, असे तुकारामगाथा-ज्ञानेश्वरी आणि दासबोध-गीतारहस्य हे ग्रंथ वाचनाचा कंटाळा करतात. काहींना तर या ग्रंथाची एक-दोन पाने वाचून होताच झोप येते. ‘कर्तव्यकर्माचा त्याग करून देवाचे नाव घेत बसतो’, असे म्हणणे हेही शास्त्रसंमत नाही.

अपहाय निजं कर्म कृष्ण कृष्णेति वादिनः ।
ते हरेर्द्वेषिणः पापा धर्मार्थं जन्म यद्धरेः ।।

अर्थ : आपले (स्वधर्माेक्त) कर्तव्य कर्म सोडून केवळ ‘कृष्ण-कृष्ण’ म्हणत बसणारे लोक हरीचे द्वेष्टे आणि पापी आहेत; कारण ईश्वराचा जन्म धर्माच्या संस्थापनेसाठी होत असतो.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ‘यक्षप्रश्न’ या ग्रंथातून)