
जेजुरी (जिल्हा पुणे) – श्री खंडोबा देवता आणि लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी यांच्या वतीने तीर्थक्षेत्र श्री कडेपठारावर ११ जानेवारीला ‘गोशाळा’ भूमीपूजन सोहळा, गोपूजन सोहळा आणि सामूहिक महाआरती सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सर्वश्री पराग गोखले, दीपक गोखले, विनीत पाटील, ह.भ.प. डॉ. दत्तात्रय चोरघे महाराज, ख्यातनाम शिल्पकार आणि साकुर्डे येथील श्री स्वामी समर्थ मठाचे विश्वस्त दीपक थोपटे आदी मान्यवर उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र श्री कडेपठारावर भूपाळीनंतर मुख्य मंदिराबाहेर गोमातांचे मनोभावे पूजन करण्यात आले. त्यांना डाळ-गुळाचा नैवेद्य दाखवून घास भरवण्यात आला. त्यानंतर न्यासाच्या वतीने ज्याठिकाणी गोशाळा बांधण्यात येणार आहे, त्या पवित्र ठिकाणी सर्व मान्यवरांच्या वतीने भूमीपूजन कारणात आले. या वेळी न्यासाच्या वतीने प्रस्तावित विकासकामांविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. एक उत्कृष्ट गोशाळा कशी असावी याविषयी काही संकल्प करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी न्यासाच्या ‘अशोकवन देवराई’त देवराईविषयी माहिती घेऊन थोडावेळ श्रमदानही केले.
महाआरतीचे आयोजन !
सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री खंडेरायाची दुपारतीची महापूजा पार पडली. त्यानंतर लगेचच महाराष्ट्र मंदिर महासंघाने संकल्पित केलेल्या महाआरतीमध्ये जमलेल्या भाविकांसह सर्व मान्यवरांनी मनोभावे सहभाग घेतला. शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात झालेल्या ठरावानुसार महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.