प्रयागराज – मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांनी १९ जानेवारीला सेक्टर-७ मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकारने स्थापन केलेल्या भव्यदिव्य सांस्कृतिक गाव ‘कलाग्राम’ला भेट दिली आणि शिल्पकारांशी संवाद साधला. कलाग्रामची भव्यता आणि सौंदर्य यांची प्रशंसा करतांना केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे श्री. आशिष गिरी (प्रभारी संचालक, एन्.सी.जेड.सी.सी.), श्री. सुरेंद्र कश्यप (साहाय्यक संचालक, प्रशासन आणि लेखा) आणि कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण करून हार्दिक स्वागत केले. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सातव्या दिवशी कलाकारांनी सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ पद्मश्री विदुषी सुमित्रा गुहा यांनी गणेश वंदनेने केला. त्यानंतर हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांनी लोकनृत्ये सादर केली. चित्तरंजन त्रिपाठी यांच्या दिग्दर्शनाखाली आसिफ अली लिखित ‘समुद्रमंथन’ नाटकाचे सादरीकरण झाले.