बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात भारत सरकारने कठोर पावले उचलावीत ! – पू. भिडेगुरुजी

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ २५ ऑगस्टला ‘सांगली जिल्हा बंद’ची हाक !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सांगली, १८ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशामध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध म्हणून सांगली जिल्ह्यात २५ ऑगस्ट या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. बंदमध्ये तोडफोड आम्हाला मान्य नाही, ती आम्ही करणार नाही. बांगलादेशामध्ये जे अत्याचार चालू आहेत, त्या विरोधात भारत सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी १८ ऑगस्ट या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणाले की,

१. बांगलादेशात जो नंगानाच चालू आहे, त्या विरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. ही पावले उचलण्याचे कौशल्य १०१ टक्के सध्याच्या सरकारमध्ये आहे. बांगलादेशातील हिंदूंना भारतात आणण्याऐवजी ते तेथेच सुरक्षित राहिले पाहिजेत.

२. जगातील कोणतेही राष्ट्र हिंदुस्थानचे मित्रराष्ट्र नाही. शासनकर्त्यांनी धर्म आणि राष्ट्र यांच्या कल्याणासाठी अत्यंत कठोरपणे पावले उचलावीत.

३. देशातील सर्व शासनकर्त्यांनी स्वत:चा स्वार्थ बाजूला टाकून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात खवळून उठले पाहिजे. हिंदूंच्या रक्तात देशभक्ती, मातृभक्ती, स्वाभिमान यांविषयी पोटतिडीकेची भावना नाही. त्यामुळे बांगलादेशातील अत्याचारांविषयी कुणी मनमोकळेपणाने बोलत नाही.

४. बांगलादेशातील हिंदूंसाठी सर्व पक्षांनी मतभेद बाजूला सारून एकमताने उभे राहिले पाहिजे. गाझाविषयी इस्रायलच्या लोकांमध्ये दुमत नाही. बहुतांश हिंदूंना स्वार्थाविना काही कळत नाही.

५. देशात सर्वत्र बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याविषयी कठोर भूमिका हवी. महिला ही भारतमातेसमान आहे, ही श्रद्धा अंत:करणात हवी. तशी श्रद्धा नाही.

६. ‘लव्ह जिहाद’ हा जाणीवपूर्वक बलात्कार करण्याचा धंदा आहे. देशात प्रतिदिन पुष्कळ संख्येत महिलांवर बलात्कार होत आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चांगली आहे; मात्र महिलांच्या शिलाविषयी अभिवचन दिले पाहिजे. महिलांच्या केसाला जरी कुणी धक्का लावला, तर त्याला इहलोकीची यात्रा संपवावी लागेल, असे सांगायला हवे.

७. मराठ्यांनो उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता ? सिंहाने अरण्य सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालवणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्या दिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल.

८. मराठा आरक्षण हे कळीचे सूत्र आहे. सांगली येथील ‘कमांडो ट्रेनिंग कँप’मध्ये निःशुल्क प्रवेश दिला, तर वाघ आणि सिंह यांनी तेथे प्रवेश घ्यावा का ? विमान उडवण्याच्या प्रशिक्षणासाठी गरूडाने प्रवेश घ्यावा का ? ‘स्विमिंग क्लब’मध्ये मासळी प्रवेश घेईल का ? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का ?

संपादकीय भूमिका :

जागृत हिंदू हेच जगाला जिहादी लोकांपासून वाचवू शकतात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !