
नंदीग्राम (बंगाल) – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये हिंदूंवर सतत आक्रमणे होत आहेत. नंदीग्राम ब्लॉक २ मधील कमलपूरमध्ये स्थानिक रहिवासी ११ मार्चपासून पूजा आणि कीर्तन करत होते; परंतु ते चालू असतांना काही लोकांना कीर्तनाच्या वेळी होणारा श्रीरामाच्या नावाचा जप सहन झाला नाही अन् त्यांनी त्या जागेची तोडफोड केली. या वेळी हनुमानाच्या मूर्तीचीही तोडफोड करण्यात आली, अशी माहिती भाजपचे माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक पोस्ट करून दिली. १४ मार्च या दिवशी ही घटना घडल्याचा आरोप येथील भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी केला.
१. अमित मालवीय यांनी म्हटले की, होळीच्या दिवशी बरुईपूर, जादवपूर आणि मुर्शिदाबाद यांसह राज्यभरात अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पोलिसांनी बंगालच्या काही भागात होळी साजरी करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला; परंतु नंतर त्यांनी माघार घेतली. सनातनींमध्ये व्यापक संताप आहे; परंतु या कठीण काळात भाजप त्यांच्यासमवेत खंबीरपणे उभा आहे. आम्ही ममता बॅनर्जी यांना बंगालचे दुसरे बांगलादेश बनू देणार नाही.

२. बंगालमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बीरभूम जिल्ह्यातील सैंथिया शहरातील किमान ५ ग्रामपंचायती भागात १७ मार्चपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अफवा आणि बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
३. यापूर्वी ९ मार्च या दिवशी बंगालमधील बशीरहाट शहरातील शंखचुरा बाजार येथील श्री कालीमाता मंदिराची, तसेच देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती. मंदिरावरील आक्रमण तृणमूल काँग्रेसचे नेते शाहनूर मंडल यांनी केल्याचा आरोप आहे.
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकाबंगाल म्हणजे दुसरे बांगलादेश झाले आहे. केंद्र सरकार बांगलादेशाविषयी काही करत नाही, तसेच बंगालविषयीही काही करत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हिंदूंना मार खाण्याखेरीज पर्याय नाही ! |