सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही ! – मंत्री अदिती तटकरे

अंगणवाडीसेविकांना मानधनाचे वितरण चालू

मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’मध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये २ कोटी ३६ लाख लाभार्थी होते, तर फेब्रुवारी २०२५ मध्ये तीच संख्या २ कोटी ४६ लाख इतकी होती. कोणत्याही बहिणीची सरकार फसवणूक करणार नाही, असे आश्वासन महिला आणि बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तारांकित प्रश्न मांडला होता. त्यावर त्या बोलत होत्या.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की,

१. अंगणवाडीसेविकांना पात्र लाभार्थी नोंद करणार्‍यांना मानधन देण्यात येत आहे. २६ जिल्ह्यातील अंगणवाडीसेविकांना ३१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात येत आहे.

२. ‘नमो शेतकरी’ या योजनेद्वारे महिलांना १ सहस्र रुपये देण्यात येत आहे. वरील ५०० रुपये हे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तून देण्यात येत आहेत. ती संख्या ५ लाख ५० सहस्र ते ६ लाख अशी आहे.

विरोधकांचा सभात्याग

राज्य सरकार बहिणींची फसवणूक करत आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे सरकार २ सहस्र १०० रुपये देत नाही. या कारणावरून विरोधकांनी गदारोळ करत काही वेळेकरिता सभात्याग केला.