बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा अकोला येथे निषेध !
अकोला, १३ ऑगस्ट (वार्ता.) : बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतले. पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचे त्यागपत्र राष्ट्रपतींकडे सोपवून देशातून पलायन केले. बांगलादेशात हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. तेथे २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. हिंदूंच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. हिंदु नगरसेवक आणि पत्रकार यांची हत्या करण्यात आली. यामुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असले, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न रहाता हिंदु समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, असे प्रतिपादन हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. उदय महा यांनी केले. हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि समविचारी हिंदु संघटना यांच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले. त्यात ते बोलत होते. या वेळी उपस्थित विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वत:ची मते मांडली. उरणमधील यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येचा निषेध नोंदवून राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा करावा, याविषयीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
या वेळी शिवसेना महानगरप्रमुख श्री. योगेश अग्रवाल, राष्ट्र जागृती मंचाचे संस्थापक अध्यक्ष आणि उद्योजक संजय ठाकूर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्रीय संघटक मंत्री उदय जी, विहिंपचे प्रखंड प्रमुख राजू मंजुळेकर, स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन अध्यक्ष रवींद्र फाटे, समुपदेशक डॉ. प्रा. संतोष उमाकांत पस्तापुरे, शिवसेनेचे शहर प्रमुख आणि श्रीरामसेनेचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता पप्पू मोरवाल, भाजपचे महाप्रदेशचे सदस्य डॉ. अशोक ओळंबे, आदर्श गो सेवेचे श्री. सुभाष जैन, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या श्रुती भट यांसह विविध अधिवक्ते, तसेच हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे साधक अन् विविध हिंदु संघटनांचे अकोला जिल्हा, तसेच राज्यस्तराचे प्रतिनिधी उपस्थित होते.