Bangladesh Hindu Violence : (म्‍हणे) ‘अल्‍पसंख्‍यांकांवरील आक्रमणे घृणास्‍पद गुन्‍हा असून त्‍यांचे रक्षण करणे तरुणांचे कर्तव्‍य !’ – बांगलादेशाचे अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस

  • बांगलादेशाचे अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचे आवाहन !

  • बांगलादेशातील ५२ जिल्‍ह्यांमध्‍ये आतापर्यंत हिंदूंवर २०६ आक्रमणे

बांगलादेशाचे अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस

ढाका (बांगलादेश) – अल्‍पसंख्‍यांकांवरील आक्रमणे हा एक घृणास्‍पद गुन्‍हा आहे. बांगलादेशात रहाणार्‍या हिंदु, ख्रिस्‍ती आणि बौद्ध समाजांतील लोकांचे रक्षण करणे, हे देशातील तरुणांचे कर्तव्‍य आहे. विद्यार्थ्‍यांनी या देशाला वाचवले आहे. ते अल्‍पसंख्‍यांकांचे रक्षण करू शकत नाहीत का ? अल्‍पसंख्‍यांकही आपल्‍या देशाचे नागरिक आहेत. आपल्‍याला एकत्र रहायचे आहे. बांगलादेश आता तरुणांच्‍या हातात आहे, असे आवाहन बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी केले आहे. ते बेगम रोकेया विद्यापिठातील एका कार्यक्रमात विद्यार्थ्‍यांना संबोधित करतांना बोलत होते.

चितगाव येथे लाखो हिंदूंकडून निदर्शने !

बांगलादेशात आतापर्यंत ५२ जिल्‍ह्यांमध्‍ये हिंदूंवरील आक्रमणाच्‍या २०५ घटना घडल्‍या आहेत. आता या हिंसाचाराच्‍या विरोधात हिंदु, तसेच अवामी लीगचे कार्यकर्ते यांच्‍याकडून संपूर्ण बांगलादेशातील विविध शहरांत निदर्शने केली जात आहेत. १० ऑगस्‍ट या दिवशी चितगाव येथे लाखोंच्‍या संख्‍येने त्‍यांच्‍याकडून निदर्शने करण्‍यात आली. त्‍यांनी त्‍यांची घरे, दुकाने आणि मंदिरे यांवर झालेल्‍या आक्रमणांचा निषेध केला. या आंदोलनाचे व्‍हिडिओ प्रसारित झाले आहेत. या वेळी आंदोलकांनी ‘हिंदूंचे रक्षण करा’, ‘आम्‍हाला न्‍याय हवा’, ‘देश सर्व नागरिकांचा आहे’, अशा घोषणाही दिल्‍या. ‘हिंदूंची घरे आणि मंदिरे का लुटली जात आहेत?’, असेही आंदोलनकर्त्‍यांकडून विचारण्‍यात येत होते.

हिंदूंसाठी स्‍वतंत्र मंत्रालय स्‍थापन करण्‍याची मागणी

आंदोलनकर्त्‍या हिंदूंनी त्‍यांच्‍यावर होणारी आक्रमणे थांबवण्‍यासाठी आवश्‍यक पावले उचलण्‍याची मागणी केली आहे. अल्‍पसंख्‍यांकांच्‍या हिताचे रक्षण करण्‍यासाठी स्‍वतंत्र मंत्रालयाची मागणीही त्‍यांनी केली. ‘बांगलादेशाच्‍या संसदेत त्‍यांना १० टक्‍के जागा द्याव्‍यात’, असे आंदोलकांचे म्‍हणणे आहे.

सैन्‍याच्‍या वाहनावर आक्रमण : ५ सैनिक घायाळ

१० ऑगस्‍ट या दिवशी गोपालगंज येथे निदर्शने करणार्‍यांचे आंदोलन चालू असतांना सैन्‍याने लाठीमार करण्‍याचा प्रयत्न केला . या वेळी आंदोलनकर्त्‍यांनी सैन्‍याच्‍या वाहनावर आक्रमण करून त्‍याला आग लावली. यात ५ सैनिक आणि १० नागरिक घायाळ झाले. या वेळी २ पत्रकारांनाही मारहाण करण्‍यात आली. आंदोलकांनी सैनिकांच्‍या हातातील शस्‍त्रेही हिसकावून घेतली.

ब्रिटनच्‍या संसदेबाहेरही निदर्शने

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध करण्‍यासाठी ब्रिटनच्‍या संसदेच्‍या सभागृहाबाहेरही मोठ्या संख्‍येने लोक जमले होते. त्‍यांनी ‘हिंदू लाइफ मॅटर्स’च्‍या (हिंदूंचे आयुष्‍यही महत्त्वाचे असल्‍याच्‍या) घोषणा दिल्‍या. मानवाधिकार संघटनांच्‍या सदस्‍यांसह अनेक लोक या निदर्शनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी हिंसाचारात बाधित झालेल्‍यांना भरपाई देण्‍याची मागणीही केली. याखेरीज मोडकळीस आलेली मंदिरे पुन्‍हा बांधण्‍याची मागणीही करण्‍यात आली.

(म्‍हणे) ‘शेख हसीना यांच्‍या माजी मंत्र्यांवर बंदी घालावी !’ – अमेरिकेच्‍या खासदारांची मागणी

शेख हसीना यांच्‍या कार्यकाळात काम करणार्‍या बांगलादेशी अधिकार्‍यांवर बंदी घालण्‍याची मागणी अमेरिकेतील काही खासदारांनी केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार व्‍हॅन हॉलेन यांनी हसीना सरकारमध्‍ये गृहमंत्री राहिलेले असदुझ्‍झमन खान कमाल आणि सरचिटणीस ओबेदुल कादर यांच्‍यावर निर्बंध घालण्‍याची मागणी केली आहे. यासाठी त्‍यांनी परराष्‍ट्रमंत्री अँटोनी ब्‍लिंकन यांना पत्रही लिहिले होते. (बांगलादेशातील सरकार उलथवण्‍यामागे अमेरिकाच आहे, हेच यातून लक्षात येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

केवळ तरुणांना आवाहन करून महंमद युनूस हिंदूंची बाजू घेत असल्‍याचा दिखाऊपणा करत आहेत. युनूस यांनी असे आवाहन करण्‍याऐवजी हिंदूंवर आक्रमण करणार्‍यांना अटक करून त्‍यांना शिक्षा होण्‍यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हिंदूंचे रक्षण करण्‍यासाठी कठोर पावले उचलत पीडित हिंदूंना हानीभरपाई दिली पाहिजे !