Brahmins Role In Indian Constitution : राज्यघटना बनवण्यात ब्राह्मणांचा सहभाग नसता, तर ती २५ वर्षे उशिरा सिद्ध झाली असती ! – कृष्णा एस्. दीक्षित, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस्. दीक्षित यांचे विधान

कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस्. दीक्षित

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये ब्राह्मणांचे महत्त्वाचे योगदान आहे. राज्यघटना प्रारूपाच्या (मसुद्याच्या) समितीतील ७ सदस्यांपैकी ३ ब्राह्मण होते. राज्यघटनेचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये सांगितले होते की, बी.एन्. राव यांनी राज्यघटनेचे प्रारूप सिद्ध केले नसते, तर ते सिद्ध करण्यासाठी आणखी २५ वर्षे लागली असती, असे विधान कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस्. दीक्षित यांनी येथे ब्राह्मण परिषदेत केले. बी.एन्. राव हे ब्राह्मण होते. अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘विश्‍वामित्र’ या २ दिवसीय ब्राह्मण परिषदेत न्यायमूर्ती दीक्षित सहभागी झाले होते.

वेद व्यास मासेमाराचे पुत्र होते आणि महर्षि वाल्मीकि अनुसूचित जातीतील होते !

न्यायमूर्ती दीक्षित पुढे म्हणाले की, वेदांचे वर्गीकरण करणारे वेद व्यास मासेमाराचे पुत्र होते आणि रामायण लिहिणारे महर्षि वाल्मीकि अनुसूचित जाती-जमातीचे होते. आपण (ब्राह्मणांनी) त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिले आहे का ? आपण शतकानुशतके प्रभु रामाची उपासना करत आलो आहोत आणि त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.

न्यायमूर्ती दीक्षित यांनी ब्राह्मणेतर राष्ट्रवादी चळवळींशी असलेल्या त्यांच्या भूतकाळातील सहवासाचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की, न्यायमूर्ती बनल्यानंतर मी स्वतःला इतर सर्व कामांपासून दूर केले आहे आणि मी न्यायालयीन चौकटीत बोलत असतो.