Trump Sanction Russia : जर पुतिन युद्धाविषयी वाटाघाटी करण्यास सिद्ध नसतील, तर अमेरिका रशियावर निर्बंध लादेल ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

युक्रेन युद्धावर डॉनल्ड ट्रम्प यांची व्लादिमिर पुतिन यांना चेतावणी !

डावीकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना युक्रेन युद्धाच्या सूत्रावरून चेतावणी दिली आहे. ट्रम्प यांनी नुकतेच सांगितले की, जर पुतिन युद्धाविषयी वाटाघाटी करण्यास सिद्ध नसतील, तर अमेरिका रशियावर निर्बंध लादेल. पुतिन यांच्याशी चर्चा करण्यासाठी आणि वैयक्तिकरित्या भेटण्यासाठी आपण नेहमीच सिद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

१. प्रसारमाध्यमांशी बोलतांना ट्रम्प म्हणाले की, युक्रेनमध्ये युद्ध कधीच चालू व्हायला नको होते. ते राष्ट्रपती असते, तर असे घडले नसते. रशियाने आपल्या कार्यकाळात युक्रेनवर आक्रमण करण्याचे धाडस केले नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला.

२. रशिया-युक्रेन युद्धाच्या सूत्रावर आपण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्याशी चर्चा करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प लवकरच पुतिन यांच्याशीही चर्चा करणार आहेत. रशिया आणि युक्रेन यांनी एकमेकांशी चर्चा करावी, असा ट्रम्प यांचा आग्रह राहिला आहे.

३. व्लादिमिर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी २१ जानेवारीला युक्रेन युद्ध संपवण्याविषयी चर्चा केली.