१. माहेरी बेळगाव येथे मुलांच्या सुटीसाठी जातांना बहिणीने सनातनचे मराठी भाषिक ग्रंथ वितरणासाठी देणे
‘प्रतिवर्षी मुलांच्या सुटीत मी माहेरी आईकडे बेळगावला जाते. या वेळी मी आईकडे जाणार होते, तेव्हा माझ्या मोठ्या बहिणीने माझ्याकडे २७ मराठी ग्रंथ दिले आणि सांगितले, ‘‘उत्तर भारतात मराठी कुणाला समजत नाही; म्हणून कुणाला दाखवू शकत नाही. बेळगाव येथे गुरुपौर्णिमेच्या वेळी हे ग्रंथ वितरण होऊ शकतात का, हे पहा.’’
२. सेवा करण्यासाठी मनातून उत्साह न जाणवणे
आमच्या आईच्या सदनिकेमध्ये एक होमिओपॅथी वैद्या रहातात; पण मी त्यांच्यापर्यंत पोचू शकत नव्हते. तसेच मला मनातून उत्साहही जाणवत नव्हता. माझ्या मनात ‘मी त्या वैद्यांशी कसे आणि काय बोलणार ?’, असे विचार येत होते. ६.५.२०२४ या दिवशी माझे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी भ्रमणभाषवर बोलणे झाले. मी त्यांना आत्मनिवेदनपर माझ्या सर्व अडचणी सांगितल्या. त्यांच्याशी बोलल्यावर माझे मन हलके झाले आणि मला चैतन्यही मिळाले.
३. ध्यानी-मनी नसतांनाही वैद्यांनी १० मोठे ग्रंथ विकत घेतल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे
त्याच दिवशी संध्याकाळी माझी त्या वैद्यांशी भेट झाली. त्यांना मी ग्रंथांविषयी सांगितले आणि त्यांना घरी बोलावले. ग्रंथ पाहिल्यावर त्यांना ते पुष्कळ आवडले आणि त्यांनी लगेच १० मोठे ग्रंथ विकत घेतले. त्या वैद्या इतके ग्रंथ एकाच वेळी घेतील, अशी मला कल्पनाही नव्हती. त्या वेळी मला गुरुकृपेची अनुभूती आली आणि गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
४. ‘संतांच्या केवळ चैतन्याने सर्व कार्य होत असते’, हे अनुभवणे
‘सद्गुरु पिंगळेकाकांच्या माध्यमातून संतांचे चैतन्य आणि संकल्प कसा कार्यरत असतो !’, हे मला अनुभवायला मिळाले. ‘संतांच्या केवळ चैतन्याने सर्व कार्य होत असते’, हेही माझ्या लक्षात आले. गुरुदेवांनी मला ही अनुभूती दिली, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. ललिता यादव, आगरा, उत्तरप्रदेश.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |