सातारा जिल्‍ह्यातील ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर यांच्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाच्‍या भेटीची ठळक वैशिष्‍ट्ये !

ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर

 ‘ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर हे महाराष्‍ट्रातील सातारा जिल्‍ह्यातील ज्‍येष्‍ठ कीर्तनकार, तसेच समाज प्रबोधनकार आहेत. व्‍यसनाच्‍या आहारी गेलेले युवक व्‍यसनमुक्‍त व्‍हावेत, यासाठी बंडातात्‍यांनी ‘व्‍यसनमुक्‍त युवक संघा’ची स्‍थापना केली. या संघटनेच्‍या माध्‍यमातून आजपर्यंत अनेक युवक व्‍यसनमुक्‍त झाले आहेत.

२४.६.२०२४ या दिवशी ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर यांनी सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. त्‍या वेळी त्‍यांचे काही वारकरी अनुयायीही उपस्‍थित होते. २४.६.२०२४ या दिवशी आरंभ झालेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या उद़्‍घाटन सत्रालाही त्‍यांची वंदनीय उपस्‍थिती होती. त्‍यांच्‍या भेटीची ठळक वैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

१. वारकरी अनुयायांना आश्रम अभ्‍यासपूर्वक पहाण्‍यास सांगणे

श्री. महेश पाठक

ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर दक्षिण भारतातील तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन गोवा येथील मंदिरांमध्‍ये दर्शनासाठी आले होते. त्‍या वेळी ते रामनाथी येथील ‘सनातन’चा आश्रम पहाण्‍यासाठीही आले होते. त्‍यांच्‍या समवेत ४० – ५० वारकरी होते. आश्रमात अल्‍पाहार करण्‍यासाठी ते सर्व जण भोजनकक्षात आले होते. त्‍या वेळी तात्‍यांनी तेथील भोजनासंबंधीच्‍या कृतींमागील शास्‍त्र असलेले फलक पाहिले. ते पाहिल्‍यावर समवेत असलेल्‍या वारकरी अनुयायांना तात्‍या म्‍हणाले, ‘‘आपली कितीही निघायची धावपळ असली, तरी आश्रम नीट पहा.’’ आश्रम पाहिल्‍यानंतर काही वारकरी बंधूंनी ‘‘आम्‍हाला येथे सेवा करायला मिळेल का ?’’, असे विचारले, तसेच ‘तुमच्‍या कार्याशी आम्‍हाला जोडून घ्‍या’, असेही सांगितले.

– श्री. महेश पाठक (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय ४३ वर्षे) आणि श्री. पराग गोखले (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, वय ५५ वर्षे), हिंदु जनजागृती समिती, पुणे (१३.७.२०२४)

ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर यांनी सन्‍मान सोहळ्‍याच्‍या वेळी काढलेले उद़्‍गार !

श्री. पराग गोखले

आश्रम पाहिल्‍यानंतर ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर यांचा सनातन संस्‍थेचे २५ वे संत पू. पृथ्‍वीराज हजारे यांच्‍या हस्‍ते सन्‍मान करण्‍यात आला. त्‍याचप्रमाणे त्‍यांच्‍या समवेत असलेले ‘व्‍यसनमुक्‍त युवक संघा’चे अध्‍यक्ष श्री. दीपक जाधव यांचाही सत्‍कार करण्‍यात आला.

सन्‍मान सोहळ्‍यात बोलतांना ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर म्‍हणाले, ‘‘आमचे व्‍यसनमुक्‍तीचे कार्य चालू आहे. ‘आम्‍हाला तेच मोठे आहे’, असे वाटत होते; पण आश्रम पाहिल्‍यावर आमचे कार्य किती लहान (खुजे) आहे’, याची आम्‍हाला जाणीव झाली. आश्रमात आम्‍हाला जे शिकायला मिळाले, ते कृतीत आणण्‍याचा प्रयत्न आम्‍ही नक्‍की करणार आहोत. गोव्‍यातील मंदिरे बघण्‍यासाठी आम्‍ही आलो होतो; पण सनातन संस्‍थेचा आश्रम पाहिल्‍यावर आम्‍हाला खर्‍या अर्थाने गोव्‍याचे दर्शन झाले.’’

तात्‍यांच्‍या सहवासात त्‍यांच्‍यातील नम्रता, साधकांप्रतीची आत्‍मीयता शिकायला मिळाली. श्री गुरूंनी ही सेवा दिल्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. महेश पाठक (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय ४३ वर्षे) आणि श्री. पराग गोखले (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, वय ५५ वर्षे), हिंदु जनजागृती समिती, पुणे (१३.७.२०२४)