मी नुकतीच अमरनाथ यात्रा करून परत आलो. मला यात्रेच्या काळात आलेले बरे-वाईट अनुभव शब्दबद्ध केले आहेत. या यात्रेच्या अनुभवावरून हिंदूंची मंदिरे आणि व्यवस्था भाविकांच्या हातात का असावी ?, याचे महत्त्व पटते.
१. अमरनाथ यात्रेची पार्श्वभूमी
अमरनाथ यात्रा ही भारतातील अतिशय दुर्गम यात्रा समजली जाते. अमरनाथ धामला ‘तीर्थांचे तीर्थ’ म्हटले जाते; कारण याच ठिकाणी भगवान शंकराने माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले. दक्षिण काश्मीरमधील दुर्गम अशा अमरनाथ गुहेत प्रतिवर्षी बर्फाचे शिवलिंग प्रकट होते आणि ते अंतर्धान पावल्यावर यात्रा समाप्त होते. भगवंताचा अद्भुत असा हा चमत्कार आहे. या कालावधीत बाबा बर्फानींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात यात्रेकरू येत असतात. वर्षातील ठराविक दिवस ही यात्रा असते. सर्वसाधारणपणे जूनचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टमधील शेवटचा आठवडा या काळात ही यात्रा असते.
२. अमरनाथ यात्रेसाठी ‘श्री अमरनाथ श्राईन बोर्डा’ची स्थापना
भारत सरकारने अमरनाथ यात्रेसाठी ‘श्री अमरनाथ श्राईन बोर्ड’ स्थापन केला आहे. या यात्रेविषयी सर्व निर्णय या बोर्डाकडूनच घेतले जातात. ते प्रतिवर्षी साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात यात्रेसबंधी सूचना देतात. प्रतिवर्षी ही यात्रा किती दिवस असेल?, हे श्राईन बोर्डाकडून आगाऊ सूचित केले जाते. ही यात्रा अत्यंत दुर्गम भागातून जाते. त्यामुळे ती करतांना शारीरिक क्षमतेचा कस लागतो. परिणामी प्रत्येक इच्छुक यात्रेकरूची सरकारी रुग्णालयात आरोग्य पडताळणी केली जाते. त्यात आपण सर्व निकषांवर उत्तीर्ण झालो, तरच ही यात्रा करण्याची अनुमती मिळते. १३ ते ७० या वयोगटातील व्यक्ती या यात्रेत सहभागी होऊ शकतात. देशभरातील कुठल्या रुग्णालयात पडताळणी करू शकतो, तसेच ‘ऑफलाईन’ नोंदणीसाठी कोणत्या बँकेत अर्ज करू शकतो, याची सूचीही बोर्डाकडून घोषित केली जाते. श्राईन बोर्डाकडून यात्रेच्या पूर्वी किमान २ मास १० किलोमीटर चालणे, तसेच उंच ठिकाणी असलेल्या अल्प ऑक्सिजनचा त्रास होऊ नये; म्हणून प्रतिदिन प्राणायाम करण्याच्या सूचना दिल्या जातात.
३. अमरनाथ यात्रेचे मार्ग
यावर्षी ही यात्रा २९ जून ते १९ ऑगस्ट अशी ५२ दिवसांची घोषित झाली आहे. ही यात्रा करण्याचे दोन मार्ग आहेत.
अ. पहिला पहलगाम मार्ग आहे. तो पारंपरिक मार्ग असून याच मार्गाने भगवान महादेव माता पार्वतीला अमरनाथ गुहेपर्यंत घेऊन गेले होते. पहलगामपासून अमरनाथ गुहा ४८ किलोमीटर अंतरावर आहे.
आ. दुसरा मार्ग बालटालमधून आहे. या मार्गे अमरनाथ गुहा १४ किलोमीटर आहे. बालटाल मार्गे अंतर १४ कि.मी. जरी असले, तरी तो सरळ चढणीचा रस्ता असून पायी चढायला अतिशय अवघड आहे. पहलगाम मार्गे गुहेपर्यंत जायला २-३ दिवस लागतात; पण बालटालच्या तुलनेत पहलगामचा मार्ग अल्प थकवणारा आहे. बालटाल मार्गावरून येतांना उतरण असल्याने परतणे सोपे असते. त्यामुळे आम्ही या मार्गाने परतण्याचे ठरवले.
४. यात्रेमागील पौराणिक कथा
एकदा माता पार्वतीने भगवान शिवाला अमरत्वाचे रहस्य विचारले. पुष्कळ आग्रह केल्यामुळे महादेवाने माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले. यालाच ‘अमरकथा’ म्हटले जाते. हे जीवन-मृत्यूचे रहस्य माता पार्वतीखेरीज अजून कुणाला कळू नये; म्हणून महादेवाने निर्जन गुहेत ते सांगण्याचे ठरवले. त्यांनी त्यांच्या नंदीला पहलगामला सोडले, जटेतील अर्धचंद्राला चंदनवाडीला सोडले, गळ्यात धारण केलेल्या नागाला शेषनाग तलावात सोडले, श्री गणेशाला वाटेतील महागुण पर्वतावर सोडले (या थांब्याला आता ‘महागणेश टॉप’ म्हटले जाते.) आणि त्यांच्यातील पंचमहाभूतांचे अंश पंचतर्णीला सोडले. हे सगळे थांबे आजही या यात्रेत आहेत आणि भाविक यात्रेच्या वेळी या ठिकाणी विसावा घेतात.
हे रहस्य कोणत्याही जीवाच्या कानावर पडू नये; म्हणून महादेवाने कालाग्नीला सांगून गुहेत अग्नी प्रज्वलित केला, जेणेकरून कुणीही जीवित प्राणी तेथे रहाणार नाही. अशी सगळी खात्री केल्यावर महादेवाने गुहेत हरणाचे कातडे अंथरले आणि माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले. हे रहस्य सांगून झाल्यावर माता पार्वती आणि भोलेनाथ एका बर्फाच्या लिंगात एकरूप झाले. असे म्हटले जाते की, महादेवाने इतकी काळजी घेऊनही एका धवल रंगाच्या कबुतराच्या जोडीने हे रहस्य गुपचूप ऐकले आणि ती जोडी अमर झाली. आजही श्रावण पौर्णिमेला या गुहेत धवल रंगाची कबुतरे दिसतात. ही कबुतरे ज्याला दिसतात, त्याला भाग्यवान समजले जाते.
या गुहेचा शोध भृगुऋषींनी लावला आणि या अद्भुत बर्फाच्या लिंगाविषयी माहिती दिली. तेव्हापासून स्थानिक लोक श्रावण मासात भगवान महादेव आणि माता पार्वती ज्या मार्गाने या गुहेत गेले, त्याच मार्गाने या गुहेत महादेवाच्या दर्शनाला जातात. (सांप्रत काळी वर्ष १८५० मध्ये बुटा मलिक नावाच्या व्यक्तीने या गुहेचा शोध लावला, अशी अत्यंत खोटी माहिती सांगितली जाते. इस्लामचा जन्मही झालेला नव्हता, तेव्हापासून हिंदू बाबा बर्फानींचे दर्शन घेत आहेत. नीलमत पुराणात याचा स्पष्ट उल्लेख आहे. – संकलक)
५. अमरनाथ यात्रेकरूंच्या सोयीसुविधांसाठी भगवतीनगर बेस कॅम्प
अमरनाथ यात्रेसाठी बोर्डाकडून जम्मूतील भगवतीनगरमध्ये कायमस्वरूपी तळ बनवले आहेत. ज्यांना सैन्याच्या ताफ्यासमवेत पहलगाम किंवा बालटाल येथे पोचायचे आहे, त्यांनी या शिबिरामध्ये यात्रेच्या दिनांकाच्या २ दिवस पूर्वी येणे अपेक्षित आहे. भगवतीनगर ‘बेस कॅम्प’मध्ये प्रवेश करतांना सैन्याकडून सर्व यात्रेकरू आणि त्याचे साहित्य यांची ३ वेळा कसून पडताळणी केली जाते. काही अमली पदार्थ किंवा शस्त्रे आढळून आल्यास ती कह्यात घेतली जातात.
या कॅम्पमध्ये यात्रेकरूंसाठी सर्व सुविधा आहेत. खाण्यासाठी लंगर (शिखांनी केलेली जेवणाची सोय), पिण्याचे पाणी, शौचालये, रुग्णालय, बँकेचे एटीम्, ‘यात्री सिम कार्ड’ (जम्मू-काश्मीरमध्ये अन्य भारतातील ‘प्रीपेड’ भ्रमणभाष कार्ड चालत नाहीत. त्याला ‘यात्री सिम कार्ड’ म्हणतात.), थंडीसाठी लागणारी उत्पादने, अधिकचे साहित्य नाममात्र दरात ठेवण्यासाठी कुलूपबंद खोली आणि यात्रेकरूंना विश्रांतीसाठी विविध प्रकारच्या खोल्या आहेत. येथे पोचल्यावर यात्रेकरूंनी सर्वप्रथम आपण ज्या मार्गाने (पहलगाम किंवा बालटाल) जाणार, त्या बसगाडीचे तिकीट काढावे लागते. त्यानंतर यात्रेकरूला बसगाडीचा आणि आसन क्रमांक दिला जातो. त्या यात्रेकरूला रात्री १ वाजून ३० मिनिटांनी ठरलेल्या गाडीत बसायचे असते. सर्व गाड्या भरल्या की, पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी सैन्याच्या सुरक्षेत यात्रेकरूंच्या सर्व गाड्यांचा जत्था (समूह) निघतो.
६. अमरनाथ यात्रेकरूंसाठी भारतीय सैन्याची अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था
अमरनाथ यात्रेकरू हे काश्मीरमधील आतंकवाद्यांचे कायमच लक्ष्य राहिले आहेत. यापूर्वी अनेक वेळा यात्रेकरूंवर आक्रमणे करून यात्रा बंद पाडण्यात आली आहे. आतंकवादी घटना परत घडू नये; म्हणून यात्रेकरूंच्या जथ्याला जम्मूपासून पहलगाम किंवा बालटाल ‘बेस कॅम्प’पर्यंतच्या प्रवासाला भारतीय सैन्याकडून सशस्त्र संरक्षण पुरवले जाते.
जम्मू ते पहलगाम हे अंतर २३२ किलोमीटर आहे, तर जम्मू ते बालटाल हे अंतर ३३५ किलोमीटर आहे. या संपूर्ण मार्गावर भारतीय सैन्याच्या संरक्षणात जेव्हा यात्रेकरूंचा जत्था निघतो, तेव्हा तेथील स्थानिक वाहतूक थांबवली जाते. विरुद्ध बाजूच्या रस्त्यावरील वाहतूकही थांबवली जाते. या रस्त्यावर आजूबाजूच्या गावातील येऊन मिळणारे रस्तेही काटेरी कुंपण घालून बंद केले जातात. या ताफ्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाची सशस्त्र वाहने ठराविक अंतराने यात्रेकरूंच्या बसगाड्यांच्या मागे-पुढे गस्त घालत असतात. वर उल्लेखलेल्या संपूर्ण लांबीच्या रस्त्यावर प्रत्येक ५० मीटर अंतरावर दुतर्फा किमान एक सशस्त्र सैनिक पहारा देत असतो. वाटेत उभारलेल्या प्रत्येक चौकीवर ४-५ सशस्त्र सैनिक असतात. ते तेथून जाणार्या सर्व गाड्यांच्या क्रमांकांची नोंद ठेवत असतात. यासमवेतच प्रत्येक २०० मीटरवर सैन्याचे सशस्त्र वाहन उभे असते. यात्रेकरूंचा ताफा जात असतांना त्यावर ‘ड्रोन’द्वारे लक्ष ठेवले जाते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने शक्य असेल, तेथे रस्त्यावरील घरांवर उभे राहू सैनिक गस्त घालतांना दिसतात. भारतीय सैन्याकडून श्री अमरनाथ यात्रेकरूंना दिली जाणारी ही अभूतपूर्व अशी सुरक्षा पाहिल्यावर रात्रंदिवस यात्रेकरूंसाठी डोळ्यात प्राण आणून गस्त घालणार्या सैनिकांविषयी कृतज्ञतेचा भाव दाटून येतो.
७. यात्रेकरूंशी उद्धटपणे वागणारा धर्मांध बसचालक
आमच्या बसगाडीचा चालक हा धर्मांध होता. रात्रीपासूनच तो यात्रेकरूंशी उद्धटपणे बोलत होता. त्याने ठरल्यापेक्षा ऐनवेळी ३-४ प्रवासी अधिकचे घेऊन त्यांच्याकडून पैसे उकळले. सैन्याच्या ताफ्यासमवेत आमची बस निघाली, तेव्हा वाटेत तो एकदा म्हणाला, ‘‘सैन्याच्या या एवढ्या बंदोबस्ताची आवश्यकता आहे का ?, येथे काही होत नाही, सगळे शांत असते.’’ काहीच दिवसांपूर्वी तिकडे माता वैष्णोदेवीच्या भक्तांवर आक्रमण झाले होते, तसेच अमरनाथ यात्रेसाठी धमक्या आल्या होत्या; पण त्याचे त्याला काहीच वाटले नाही.’
(क्रमश: उद्याच्या दैनिकात)
– श्री. अनिकेत विलास शेटे, प्रमाणित आर्थिक सल्लागार, चिंचवड, जिल्हा पुणे.