छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा औरंगजेबासह इस्लामी आक्रमकांवर झालेला परिणाम !

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. त्या निमित्ताने…

छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुढे त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. या राज्याभिषेकाचा औरंगजेबावर काय परिणाम झाला ? छत्रपती शिवराय यांच्या हिंदवी साम्राज्याचे प्रमुख ध्येय आणि मराठ्यांच्या युद्धपद्धतीतील वैशिष्ट्य यांविषयीची माहिती या लेखाद्वारे देत आहे.

१. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची बातमी कळताच औरंगजेबाने ४८ घंटे अन्न-पाणी ग्रहण न करणे

औरंगजेबाच्या दरबारात बहादुरखान कोकलताश नावाचा एक दरबारी होता. त्याने औरंगजेबाला छत्रपती शिवराय यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतल्याची बातमी सांगितली. ती वार्ता ऐकताच औरंगजेब अस्वस्थ झाला. काही क्षण नीरव शांततेत गेले. त्यानंतर तो त्याच्या सिंहासनावरून उठला आणि सरळ जनानखान्यात निघून गेला. शिवराज्याभिषेकाच्या बातमीने तो अत्यंत संतप्त झाला. त्या संतापाच्या भरातच तो भूमीवर नमाज पढण्यासाठी बसतात तसा गुडघ्यावर बसला. त्याने त्याचे दोन्ही हात जोरजोरात भूमीवर आपटले. ‘या अल्ला ! या अल्ला !!’, असे तो मोठ्याने ओरडू लागला. अशा प्रकारे तो स्वतःचे दुःख व्यक्त करू लागला. शिवराज्याभिषेकाचा दोष तो अल्लाला देतांना म्हणाला, ‘अल्लाने मुसलमानांचे राज्य हिसकावून घेतले आणि मराठ्यांना दिले. आता हे अती झाले.’

श्री. दुर्गेश परुळकर

शिवराज्याभिषेकाचा त्याने एवढा धसका घेतला की, पुढचे २ दिवस त्याला अन्न-पाणी गोड लागले नाही. किंबहुना त्याने अन्नाचा एक दाणा किंवा पाण्याचा एक थेंबही तोंडात टाकला नाही. त्याची ही अवस्था पाहून त्याच्या मंत्र्याने थोडा धीर करून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याची कशीबशी समजूत काढण्यास त्या मंत्र्याला ४८ घंट्यांनंतर यश आले. औरंगजेब २ दिवसानंतर कसाबसा दरबारात गेला. तो सिंहासनावर बसण्याआधी काही क्षण तसाच शांतपणे उभा राहिला. शेवटी त्याच्या मंत्र्याने त्याचा हात धरून त्याला सिंहासनावर बसवले.

मोगलांना जसा शिवराज्याभिषेकाचा धसका बसला, तसाच तो आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाही या इस्लामी सत्तांना बसला. एवढेच नाही, तर सातासमुद्रापलीकडे असलेल्या सीरिया, पर्शिया, इराण, तुर्कस्तान येथील सत्ताधिशांचीही पाचावर धारण बसली आणि त्यांची झोप उडाली. (संदर्भ : Shivaji his life and times – Gajanan Bhaskar Mehendale)

२. छत्रपती शिवराय यांच्या ‘हिंदवी साम्राज्या’चे प्रमुख ध्येय

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘हिंदवी स्वराज्य स्थापने’च्या चळवळीचा आरंभ केला. समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या नंतरच्या पिढ्यांना संस्मरणीय पराक्रम करण्याची स्फूर्ती दिली. परकीय आक्रमकांच्या राजकीय आणि धार्मिक सत्तेपासून स्वतःला मुक्त करणे, परकीय आक्रमकांचे धर्मवेडाने उत्पन्न झालेले अभिनिवेशाचे प्रयत्न अयशस्वी करणे, हिंदु संस्कृती आणि धर्म यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदु साम्राज्याची स्थापना करणे यांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची वृत्ती निर्माण केली. ही वृत्ती हिंदवी स्वराज्यापासून थेट श्रीमंत थोरले बाजीराव यांच्या हिंदु पदपादशाहीपर्यंत आणि नंतरच्या पिढीतील पंतप्रधानांचे बुद्धीमान प्रतिनिधी गोविंदराव काळे यांच्यापर्यंत तेवढीच तेजस्वी राहिली; म्हणूनच गोविंदराव काळे यांनी वर्ष १७९५ मध्ये अत्यंत अभिमानाने ‘हे हिंदुस्थान आहे, तुर्कस्तान नाही’, असे हिंदवी स्वराज्याचे वर्णन केले. हेच साम्राज्याचे जिवंत ध्येय गाठण्यासाठी छत्रपती शिवराय यांनी हिंदवी साम्राज्य निर्माण करण्याची शपथ घेतली होती. यासाठीच आजच्या आणि उद्याच्याही हिंदुस्थानातील कोणत्याही राजकीय विचारधारेच्या पक्षाने छत्रपती शिवराय यांच्या हिंदवी साम्राज्याचे ध्येय दुर्लक्षित करू नये.

३. मराठ्यांच्या युद्धपद्धतीची वैशिष्ट्ये

मराठ्यांचा ‘गनिमी कावा’ (म्हणजे वृकयुद्ध) ही युद्धपद्धत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होती. त्या काळच्या परिस्थितीत ती अत्यंत उपयुक्त होती. छत्रपती शिवराय यांच्या नंतरच्या पिढ्यांनासुद्धा ती अत्यंत लवचिक आणि मराठ्यांच्या विशिष्ट बुद्धीला सोयीस्कर असल्याचे आढळून आले. (व्हिएतनामने अमेरिकेला त्रस्त करण्यासाठी छत्रपती शिवराय यांच्या गनिमी काव्याचा आधार घेतला होता. वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धातही भारतीय सैन्याने छत्रपती शिवराय यांच्या युद्धनीतीचा उपयोग केला.) अगदी आरंभीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी हेच युद्धतंत्र उपयोगात आणले होते. छत्रपती शिवराय यांच्या नंतरच्या काळात मराठ्यांनी मोठे सैन्यदल असले, तरीही शत्रूविरुद्ध गनिमी काव्याचा उपयोग केला. ‘शत्रू आपल्यापेक्षा बलवान असेल, तर मराठ्यांचे घोडेस्वार अकस्मात् चारही दिशांना नाहीसे होऊन जात होते. जवळच्या डोंगरांवरून किंवा झाडीतून ते टेहळणी करत असत. आपल्याला घाबरून मराठे पळून गेले, असा शत्रूचा समज होऊन ते बेसावध रहात असे. त्याच वेळी अचानक त्याच्यावर धाड घालून त्याला चोप देऊन क्षणात मराठे पळून जात होते.’ या युद्ध तंत्रामुळे शत्रूच्या मनात मराठ्यांविषयी भय निर्माण झाले. ‘मराठे अवचित आपल्यासमोर येतात. आपल्यावर तुटून पडतात. ते कुठून आणि कसे येतात’, हेच त्यांना कळत नसे. मराठ्यांची ही युद्धपद्धत समर्थ रामदासस्वामी यांच्या ‘शक्तीने मिळती राज्ये’ आणि ‘युक्तीने यत्न होत असे’, या वचनातील तत्त्वांवर आधारित होती.

सत्कार्यासाठी करावे लागणारे युद्ध हे पवित्र आहे. असे युद्ध केल्यावाचून स्वातंत्र्य किंवा साम्राज्य प्राप्त करता येत नाही. आत्मयज्ञ, अमर्याद पराक्रम या दोन गोष्टी युद्धासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तानाजीने सिंहगडावर आत्मयज्ञ आणि पराक्रम या दोन गुणांच्या बळावर जे यश संपादन केले, त्याच गुणांच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊ शकली. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे ‘पराक्रमापेक्षा चातुर्याला अधिक महत्त्व आहे. चातुर्यावाचून पराक्रम म्हणजे पशूचा गुण होतो.’ जो आत्मयज्ञ विजयाकडे घेऊन जात नाही, त्याला मराठ्यांच्या युद्धपद्धतीत आणि डावपेचात कोणतेही स्थान नाही. म्हणून मराठ्यांनी अशा प्रकारची युद्धनीती उपयोगात आणली होती की, ज्या पद्धतीमुळे स्वतःची न्यूनतम हानी आणि शत्रूची अधिकाधिक हानी होत असे. याच गुणांनी भविष्यातही मराठ्यांना अटकेवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी बळ दिले. हेच मराठ्यांच्या युद्धपद्धतीचे वैशिष्ट्य आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली.