ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘कल्याणकारी महामंडळ’ स्थापन करू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई – ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. ‘ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळा’ची स्थापन करण्याची घोषणा करण्यात येईल. ज्येष्ठांसाठीच्या सर्व योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे कार्यवाही व्हावी, यासाठी ‘कर्तव्य अभियान’ राबवण्याचे निर्देशही या वेळी त्यांनी प्रशासनाला दिले. ज्येष्ठ नागरिक धोरणांविषयी २९ जुलैला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी विविध विभागांचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणार्‍या विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारीही उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘नुकत्याच झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत ‘विकसित भारत २०४७’ च्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. वर्ष २०४७ पर्यंत भारतात ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी-सुविधांची वाढणारी आवश्यकता लक्षात घेऊन आतापासून सिद्धता करणे आवश्यक आहे. येत्या काळात प्रत्येक महापालिकाक्षेत्रात विरंगुळा केंद्राची निर्मिती करण्यात येईल. या केंद्राद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘डिमेंशिया’, ‘अल्जायमर’ या स्मृतीभ्रंशाविषयीच्या आजारांविषयी साहाय्यता उपलब्ध करून देण्यात येईल.’’