विविध प्रसंगांतून ‘कृतज्ञता कशी असायला हवी ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकायला मिळणे !
‘वर्ष १९९१ – १९९२ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर मुंबईहून येऊन गोवा येथे मासातून (महिन्यातून) एकदा अध्यात्माविषयी अभ्यासवर्ग घ्यायचे. त्या वेळी मी त्यांच्या अभ्यासवर्गाला जात असे. अभ्यासवर्गाच्या वेळीच माझी त्यांच्याशी भेट होत असल्याने मला त्यांच्या भेटीसाठी एक मास वाट पहावी लागत असे.
आमची भेट झाल्यावर प.पू. डॉक्टरांचा मला पहिला प्रश्न असायचा, ‘‘यजमान कसे आहेत ?’’ तेव्हा माझ्या मनात यायचे, ‘माझे यजमान परात्पर गुरु डॉक्टरांची कधी आठवणही काढत नाहीत आणि मी एक मास चातकाप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांची वाट पाहून अभ्यासवर्गाला उपस्थित रहाते. असे असूनही ते माझी काहीच विचारपूस न करता केवळ यजमानांचीच विचारपूस का करतात ?’ काही वेळा या विचारांमुळे मला थोडे वाईट वाटायचे. असे ५-६ मास झाल्यानंतर मला त्याविषयी वाईट वाटायचे थांबले. त्यानंतर बर्याच मासांनंतर माझ्या लक्षात आले, ‘ज्यांच्यामुळे आपण या अभ्यासवर्गांना जाऊ शकत आहोत, त्यांच्याप्रती मनात कृतज्ञताभाव असावा’, हेच परात्पर गुरु डॉक्टर मला या कृतीतून शिकवत आहेत.’
– सौ. विजयालक्ष्मी बसवराज आमाती, फोंडा, गोवा. (६.३.२०१७)