Samvidhan Hatya Divas : केंद्र सरकारकडून ‘२५ जून’ हा दिवस ‘राज्यघटना हत्या दिन’ घोषित

२५ जून १९७५ या दिवशी इंदिरा गांधी यांनी देशात लागू केली होती आणीबाणी !

नवी देहली – केंद्र सरकारने ‘२५ जून’ हा दिवस ‘राज्यघटना हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे. केंद्राने याविषयी अधिसूचना प्रसारित केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली. २५ जून १९७५ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली होती.

अमित शहा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, २५ जून १९७५ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून आणि हुकूमशाही मानसिकतेचे प्रदर्शन करून देशातील लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला होता. लाखो लोकांना त्यांची कोणतीही चूक नसतांना कारागृहात टाकण्यात आले आणि प्रसारमाध्यमांचा आवाजही दाबण्यात आला होता. वर्ष १९७५ मधील अमानुष वेदना सहन करणार्‍या सर्वांच्या महान योगदानाचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने प्रतिवर्षी ‘२५ जून’ हा दिवस ‘राज्यघटना हत्या दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामागे लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणे आहे, ज्यांनी हुकूमशाही सरकारच्या असंख्य यातना आणि दडपशाही यांचा सामना करूनही वाटचाल चालू ठेवली. ‘राज्यघटना हत्या दिन’ प्रत्येक भारतीय व्यक्तीत व्यक्तीस्वातंत्र्याची अमर ज्योत तेवत ठेवण्याचे काम करेल, जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही.

आणीबाणी म्हणजे काय ?


भारतीय राज्यघटनेच्या कलम ३५२ नुसार राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाच्या लेखी शिफारसीनुसार आणीबाणी घोषित केली जाते. या अंतर्गत नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार रहित करण्यात येतात. जेव्हा संपूर्ण देशात किंवा कोणत्याही राज्यात दुष्काळ, परदेशांचे आक्रमण, अंतर्गत प्रशासकीय अराजकता किंवा अस्थिरता इत्यादी परिस्थिती उद्भवते, तेव्हा त्या भागातील सर्व राजकीय आणि प्रशासकीय अधिकार राष्ट्र्रपतींच्या हातात जातात. आतापर्यंत भारतात एकूण ३ वेळा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. यामध्ये वर्ष १९६२, १९७१ आणि १९७५ मध्ये कलम ३५२ अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती.


वर्ष १९७५ मध्ये आणीबाणी का घोषित झाली ?

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वर्ष १९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. इंदिरा गांधी यांच्या रायबरेली येथील निवडणुकीतील विजयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर १२ जून १९७५ या दिवशी उच्च न्यायालयाने निकाल दिला होता. ही निवडणूक उच्च न्यायालयाने रहित केली होती आणि त्यांना पुढील ६ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. यानंतर इंदिरा गांधी यांच्या त्यागपत्राची मागणी होऊ लागली आणि देशात अनेक ठिकाणी आंदोलने होऊ लागली.  यानंतर इंदिरा गांधी यांच्याकडून आणीबाणी घोषित करण्यात आली. इंदिरा गांधी सरकारच्या या निर्णयाला हुकूमशाही ठरवत विविध संघटनांनी विरोध केला आणि प्रचंड निदर्शने चालू झाली.