दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नाशिक येथे एका महिलेचा वाहनाच्या धडकेने मृत्यू !; बनावट सोने बँकेत ठेवून कोट्यवधींची फसवणूक !…

नाशिक येथे एका महिलेचा वाहनाच्या धडकेने मृत्यू !

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे जमा करण्यासाठी येवला तहसील कार्यालयात जाणार्‍या उज्ज्वला चौधरी (वय ४५ वर्षे) याचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.


बनावट सोने बँकेत ठेवून कोट्यवधींची फसवणूक !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – बनावट सोने बँकेत गहाण ठेवून १ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गौतम छन्ना राठोड असे आरोपी खातेदाराचे नाव आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या सुवर्ण कर्ज योजनेच्या अंतर्गत ही फसवणूक करण्यात आली होती.

संपदकीय भूमिका : अशांकडून ही रक्कम वसूल करायला हवी !


सामूहिक भोजनातून ३० लोकांना विषबाधा

गडचिरोली – येथे एका गावात बारशानिमित्त आयोजित केलेल्या सामूहिक भोजनातून ३० लोकांना विषबाधा झाली. त्यापैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक आहे. या कार्यक्रमाला ७० जण उपस्थित होते. उलटी, मळमळ अशी लक्षणे काहींमध्ये दिसून आल्यानंतर जेवण थांबवण्यात आले. सर्वांवर उपचार चालू आहेत.


डोंबिवलीत आस्थापनाला आग !

ठाणे – डोंबिवली औद्योगिक वसाहतीत स्फोटाने बेचिराख झालेल्या अमुदान आस्थापनाच्या शेजारील ‘न्यूओ ऑर्गेनिक डाईंग’ आस्थापनाला ७ जुलैला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ‘डाईंग’साठी साठवलेल्या पावडरच्या पिंपांना आग लागली. कामगार आणि अग्नीशमन दल यांनी आग नियंत्रणात आणली. यात जीवितहानी झालेली नाही. आगीऐवजी स्फोटाच्या संदर्भातील लघुसंदेश प्रसारित झाल्याने डोंबिवलीकर भयभीत झाले होते.


प्लास्टिकच्या फुलांवरील बंदीसाठी जनहित याचिका !

मुंबई – सजावटीसाठीच्या प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्तींनी राज्य आणि केंद्र सरकारला याचिकेवर प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. प्लास्टिकच्या फुलांमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी सरकारने त्यांवर बंदी आणावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.