‘वक्फ बोर्ड’ रहित करा यांसह विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आमरण उपोषण करणार

कोल्हापूर – भारतीय न्यायव्यवस्थेला समांतर असणारे ‘वक्फ बोर्ड’ रहित करण्यात यावे, वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी महाराष्ट्र सरकार देत असलेला निधी विधानसभेत ठराव करून कायमस्वरूपी बंद करावा, ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करण्यात यावा, सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढावेत, गड-दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावेत, या मागण्यांसाठी सकल हिंदू समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते २६ जूनपासून आमरण उपोषण करणार आहेत, तरी याची सरकारने नोंद घेऊन त्यावर तातडीने कृती करावी, या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना २१ जून या दिवशी देण्यात आले.

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, अखिल भारत हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, बजरंग दलाचे श्री. अक्षय ओतारी सर्वश्री अर्जन आंबी, निरंजन शिंदे, आनंदराव पवळ अभिजित पाटील, विकास जाधव यांसह अन्य उपस्थित होते.