IIT Mumbai Students Fined : मुंबईतील ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्‍यांना प्रत्‍येकी १ लाख २० सहस्र रुपयांचा दंड !

प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांचे विडंबनात्‍मक नाटक सादर केल्‍याचे प्रकरण !


मुंबई – वार्षिक कला महोत्‍सवात प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांचे विडंंबन करणारे ‘आरोहन’ हे नाटक सादर केले. या प्रकरणी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या (आयआयटीच्या) विद्यार्थ्‍यांना संस्‍थेच्‍या प्रशासनाने प्रत्‍येकी १ लाख २ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. ३१ मार्च २०२४ या दिवशी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या सभागृहात या नाटकाचे सादरीकरण करण्‍यात आले होते.


या नाटकामध्‍ये प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांचे पात्र आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्‍यात आले होते. आधुनिकतेच्‍या नावाखाली प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांच्‍या तोंडी या नाटकामध्‍ये आक्षेपार्ह संवाद घालण्‍यात आले होते.

नाटकाच्‍या सादरीकरणानंतर जेव्‍हा सामाजिक माध्‍यमांवरून याच्‍या ‘क्‍लिप’ (अल्‍प कालावधीचे व्‍हिडिओ) सामाजिक माध्‍यमांवरून प्रसारित झाल्‍या, त्‍या वेळी हा प्रकार लक्षात आला. कलास्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली या नाटकातून धार्मिक भावना दुखावण्‍यात आल्‍याच्‍या तक्रारी काही विद्यार्थ्‍यांनी संस्‍थेच्‍या प्रशासनाकडे केल्‍या. यानंतर संस्‍थेच्‍या शिस्‍तपालन समितीच्‍या बैठकीमध्‍ये विद्यार्थ्‍यांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. यामध्‍ये वरिष्‍ठ वर्गांमधील विद्यार्थ्‍यांकडून प्रत्‍येकी १ लाख २ सहस्र रुपये दंड घेण्‍यात आला असून कनिष्‍ठ वर्गातील विद्यार्थ्‍यांना प्रत्‍येकी ४० सहस्र रुपये इतका दंड ठोठावण्‍यात आला आहे. यासह वसतीगृहात देण्‍यात आलेल्‍या सुविधाही या विद्यार्थ्‍यांना नाकारण्‍यात आल्‍याची माहिती संस्‍थेच्‍या प्रशासनाकडून प्राप्‍त झाली आहे.

संपादकीय भूमिका

पुरोगामित्‍वाच्‍या नावाखाली भारतभरात काही ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये येथे विद्यार्थ्‍यांकडून नाटकांच्‍या माध्‍यमातून हिंदूंच्‍या देवतांचे विडंबन केले जाते. आयआयटीच्या प्रशासनाने जसा कठोर निर्णय घेतला, तसा अन्‍य ठिकाणीही घेतल्‍यास असल्‍या प्रकारांना आळा बसेल !