Mumbai HC Permitted ‘Hamare Barah’ : ‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती !

  • चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद हटवण्याचे निर्देश !

  • अनुमतीविना विज्ञापन प्रदर्शित केल्यामुळे निर्मात्यांना ५ लाख रुपयांचा दंड !

मुंबई – ‘हमारे बारह’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील ठराविक भाग हटवण्यास आणि काही पालट करण्यास सहमती दर्शवल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने २१ जून या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास अनुमती दिली. न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपिठाने दोन्ही पक्षांना सामंजस्य करार करण्याचे निर्देश दिले आहेत.


काय आहे चित्रपटाच्या प्रदर्शनामागील वाद ?

‘हमारे बारह’ या चित्रपटात ‘आय विल किल यू, अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) असा एक संवाद आहे. त्यातील ‘अल्ला हू अकबर’ हा उल्लेख वगळण्याचे निर्देश खंडपिठाने दिले आहेत, तसेच चित्रपटाचे प्रदर्शनपूर्व विज्ञापन सेन्सॉर मंडळाच्या अनुमतीविना प्रदर्शित केल्याप्रकरणी निर्मात्यांना ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर हे विज्ञापन हटवण्यात आले आहे.


‘हे विज्ञापन मुसलमानांच्या भावना दुखावणारे, तसेच मुसलमान महिलांचा अवमान करणारे असल्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी’, अशी मागणी करणारी याचिका पुणे येथील अझहर तांबोळी यांनी प्रविष्ट केली होती. सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालून हे विज्ञापन हटवण्याचे निर्देश दिले होते आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी चित्रपट पाहून निर्णय घ्यावा, असे नमूद केले होते.

सामाजिक संदेश देणारा चित्रपट ! – उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आम्ही हा चित्रपट पाहिला असून या चित्रपटात वादग्रस्त असे काहीही नाही. सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे. काही आक्षेपार्ह शब्द आणि दृश्ये काढून टाकावीत. चित्रपट न पहाता टिप्पणी करणे चुकीचे आहे, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या अधिवक्त्याला सांगितले. तथापि या चित्रपटाचे विज्ञापन अत्यंत चुकीचे आणि वादग्रस्त आहे. कुराणमधील आयतांचा (ओळींचा) चुकीचा अर्थ काढून महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणार्‍या पुरुषाचा हा चित्रपट आहे. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने आमच्या आधीच काही पालट सुचवले आहेत.