India Nuclear Power : भारताने अणूबाँबच्या निर्मितीमध्ये पाकिस्तानला टाकले मागे !

भारताकडे १७२, तर पाकिस्तानकडे १७० अणूबाँब

स्टॉकहोम (स्विडन) – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणूबाँब शर्यतीत भारताने अंततः पाकिस्तानला मागे टाकले आहे. भारताच्या अणूबाँबची संख्या आता त्याचे शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानपेक्षा अधिक झाली आहे. जगभरातील अणूबाँबवर लक्ष ठेवणार्‍या ‘एस्.आय.पी.आर्.आय.’ (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट) या संस्थेने तिच्या ताज्या आकडेवारीत खुलासा केला आहे की, भारताने १७२ अणूबाँब बनवले आहेत, तर पाकिस्तानकडे सध्या १७० अणूबाँब आहेत. भारताने गेल्या वर्षभरात ८ नवीन अणूबाँब बनवले आहेत. तर पाकिस्तानने गेल्या वर्षभरात एकही नवा अणूबाँब बनवला नाही. भारताचा सर्वांत मोठा शत्रू चीनची अणूबाँबची संख्या एका वर्षात ४१० वरून ५०० झाली आहे. (अणूबाँबच्या निर्मितीमध्ये भारत आणि चीन यांची तुलनाच होऊ शकत नाही, असे चित्र आहे. भारत जोपर्यंत चीनपेक्षा अधिक शस्त्रसज्ज होत नाही, तोपर्यंत चीनची दादागिरी चालूच रहाणार, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)

१. ‘एस्.आय.पी.आर्.आय.’ने तिच्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्रायल यांनी  वर्ष २०२३ मध्ये अण्वस्त्रांचे लक्षणीय आधुनिकीकरण केले आहे.

२. वर्ष २०२४ मध्ये एकूण जागतिक स्तरावर सर्व देशांची मिळून एकूण अणूबाँबची संख्या आता १२ सहस्र १२१ वर पोचली आहे. यांपैकी ९ सहस्र ५८५ अणूबाँब हे सैन्य साठ्यात ठेवले आहेत.

३. जगभरात विविध ठिकाणी क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने यांमध्ये ३ सहस्र ९०४ अणूबाँब ठेवण्यात आले आहेत. क्षेपणास्त्रांच्या आतमध्ये २ सहस्र १०० अणूबाँब ‘हाय अलर्ट’वर (उच्च सतर्कतेवर) ठेवण्यात आले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.

चीनकडून प्रथमच क्षेपणास्त्रांमध्ये अणूबाँब तैनात !

अमेरिका आणि रशिया यांनी त्यांचे बहुतेक अणूबाँब ‘हाय अलर्ट’वर ठेवले आहेत; पण आता पहिल्यांदाच चीननेही त्याचे अणूबाँब ‘हाय अलर्ट’वर ठेवले आहेत. तैवानच्या सूत्रावरून चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावर वाढत आहे. या पार्श्‍वभूभीवर चीनने हे पाऊल उचलले आहे. चीनने एका वर्षात ९० अणूबाँब बनवले आहेत.

संपादकीय भूमिका

भारताने पाकला जरी मागे टाकले असले, तरी दोन्ही देशांच्या अणूबाँबच्या संख्येतील भेद नगण्य आहे. भारत पाकपेक्षा सर्वच क्षेत्रांत बलाढ्य असूनही त्याच्याकडील अणूबाँबची संख्या पाकपेक्षा किरकोळ संख्येने अधिक असणे, हे आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! भारताने आता तरी गतीने युद्धसज्ज होणे, ही काळाची आवश्यकता आहे !