यजमानांच्या अकस्मात् झालेल्या निधनाच्या वेळी स्थिर राहून प्रसंगाला सामोर्‍या गेलेल्या मुंबई येथील श्रीमती मंजिरी अनिल कदम यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

१. यजमानांचे अकस्मात् निधन होऊनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने स्थिर रहाणे

श्री. अनिल कदम

‘२३.११.२०२३ या दिवशी सायंकाळपासून माझे यजमान श्री. अनिल शिवराम कदम यांना अकस्मात् त्रास होऊ लागला; म्हणून त्यांना रुग्णालयात भरती केले. ते २ दिवस व्यवस्थित बोलत आणि जेवत होते. ‘‘मी उद्या बरा होईन. मला कुठे काय झाले आहे ?’’, असे ते म्हणत होते. २५.११.२०२३ या दिवशी सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी रक्तदाब वाढून त्यांचे निधन झाले. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) २३.११.२०२३ या दिवसापासून ते आजपर्यंत मला स्थिर ठेवले आहे.

२. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि सनातनच्या ७४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) संगीता जाधव यांनी साधिकेला संपर्क करून नामजप, प्रार्थना अन् प्रत्येक कृतीला भावाची जोड देण्यास सांगणे

श्रीमती मंजिरी कदम

यजमानांना रुग्णालयातील अतीदक्षता विभागामध्ये (‘आय.सी.यू’मध्ये) ठेवले होते. मी त्यांना पहायला जातांना ‘मी चैतन्याच्या पोकळीत प्रवेश करत आहे’, असा भाव ठेवायचे. ‘प.पू. डॉक्टर यजमानांच्या डोक्यावर हात ठेवून उभे आहेत. श्रीकृष्ण त्यांच्या सप्तचक्रांवर मोरपीस फिरवत आहे’, असा माझा भाव असायचा. ठाणे येथील सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि सनातनच्या ७४ व्या (समष्टी) संत  पू. (सौ.) संगीता जाधव या मला संपर्क करून ‘नामजप करा. प्रार्थना करा, तसेच प्रत्येक कृतीला भावाची जोड द्या’, असे सांगत असत.

३. भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्यामुळे परिस्थितीला स्थिरपणे सामोरे जाता येणे

‘प्रत्येक पावलागणिक गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण माझ्या समवेत आहेत’, असे मला वाटत असे. माझ्या मनात भीती किंवा नकारात्मकता असे काहीच नव्हते. यजमानांकडे पाहून वाईट असे काहीच जाणवत नव्हते. आधुनिक वैद्यांशी बोलतांना मी त्यांच्यामध्ये श्रीकृष्णाला पहायचे आणि गुरुदेवांचे स्मरण करायचे.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधिका आणि तिचा मुलगा यांना शांत आणि स्थिर ठेवल्याने त्यांच्या प्रती कृतज्ञताभाव जागृत होणे

माझा १४ वर्षांचा मुलगा कु. आयुष याने सर्व विधी केले. त्यालाही गुरुदेवांनी शांत आणि स्थिर ठेवले. हे सर्व अनुभवतांना ‘गुरुदेवांप्रती किती आणि कशी कृतज्ञता व्यक्त करू ?’, असे मला वाटले. ‘मी एवढी शांत कशी राहू शकते ?’, असे मला सतत वाटायचे. ‘गुरुदेवांनी मला धीर दिला, बळ दिले आणि ऊर्जा दिली. मुलालाही सांभाळून घेतले आणि मला घडवले’, असे वाटून सतत कृतज्ञताभाव जागृत होत असतो.

५. जेव्हा मी आज त्या प्रसंगाचे चिंतन करते, तेव्हा गुरुदेवांनी ‘माझ्यासाठी काळ थांबवून ठेवला होता’, असे मला वाटते.

६. शिकायला मिळालेली सूत्रे

या प्रसंगात साधक सतत माझ्या समवेत होते. मला त्यांच्यातील भगवंत पहाता आला. ‘साधक म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांचेच रूप आहेत’, असे मला वाटायला लागले. ‘गुरुदेवांनी मला घडवण्यासाठीच हा प्रसंग घडवला आहे’, असे मला वाटत आहे.’

– श्रीमती मंजिरी अनिल कदम, अंधेरी, मुंबई. (१४.२.२०२४)

पतीनिधनानंतर श्रीमती मंजिरी कदम यांची अन्य साधकांना जाणवलेली सूत्रे

१. श्रीमती जयश्री रेळेकर

१ अ. स्थिर रहाणे : ‘मीसुद्धा या प्रसंगातून गेले आहे. त्यामुळे मला पुष्कळ वाईट वाटत होते; पण मंजिरीताई एवढ्या मोठ्या प्रसंगातही स्थिर होती. सर्वांना ‘मी बरी आहे. गुरुदेव आपली काळजी घेतात’, असे सांगत होती.’

२. सौ. सुलोचना नाणेकर

२ अ. ‘गुरुदेव प्रत्येकाला सक्षम करतात’, हे लक्षात येणे : ‘मंजिरीताईचे यजमान गेल्याचे कळल्यावर ‘ताईचे आणि तिच्या मुलाचे कसे होईल ?’, असे वाटून तिला भेटेपर्यंत माझे हात-पाय थरथरत होते; परंतु मंजिरीताईला भेटल्यानंतर माझ्या मनातून तो विचार निघून गेला. तिला भेटल्यावर मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘गुरुदेव प्रत्येकाला सक्षम कसे करतात’, हे माझ्या लक्षात आले.’

३.  सौ. पूजा कोकमकर

३ अ. प्रसंगात न अडकणे : ‘या प्रसंगानंतर काही दिवसांनी मला सेवेनिमित्त ताईला संपर्क करायचा होता. तेव्हा ‘काय बोलू आणि कसे बोलू ?’, या विचारांनी मला धडधडत होते. जेव्हा आमचा संवाद झाला, तेव्हा ताई शांतपणे सेवेचा आढावा घेत होती. त्या वेळी ‘साधनेमुळे व्यक्तीत किती पालट होऊ शकतो !’, याची मला प्रचीती आली. ‘साधनेतील शक्तीमुळे या प्रसंगातून ती सहज बाहेर पडली’, असे मला वाटले.’

४. सौ. रश्मी विरनोडकर

४ अ. ताईने यजमानांचे निधन झाल्यावर तिसर्‍या दिवसापासून तिची ‘सोशल मिडिया’ची सेवा चालू केली.

४ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असणे : मंजिरीला भेटायला गेल्यावर तिला पाहून ‘पुढे आपत्काळात आपण कसे स्थिर रहायला पाहिजे ?’, हे मला शिकता आले. एक साधिका ताईला भेटायला यायला पुष्कळ घाबरत होती. त्या वेळी मंजिरीताई म्हणाली, ‘‘गुरुदेव आपली काळजी घेतात. मी बरी आहे.’’ तिचे बोलणे ऐकून ‘तिचा गुरुदेवांप्रती किती भाव आहे !’, असे मला वाटले.’