‘हवामान पालट’ हा शब्द आता आपल्या परिचयाचा झाला आहे. हा शब्द जरी छोटा दिसत असला, तरी त्याचे परिणाम दूरगामी आणि बर्याच वेळा भयंकर असतात. निसर्ग या माध्यमातून स्वतःची शक्ती दाखवून देत असतो आणि आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची सूचना करत असतो, जिच्याकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो. सोप्या शब्दांत सांगायचे, तर हवामान पालट, म्हणजे ‘ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींवर माणसाच्या विविध कृतींचे होणारे चुकीचे परिणाम. ज्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते आणि आपत्ती येण्याची शक्यता असते.’ सध्या जग अशाच काही आपत्तींना सामोरे जात आहे.
डोळ्यांसमोर घडत असलेल्या घटना !
तुर्कीयेमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता. कॅनडामध्ये जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला असून तिथे तापमान एवढे वाढले आहे की, तेथील एका तलावात १०० ‘डॉल्फिन’ मासे मृतावस्थेत सापडले. या सगळ्याची कारणे हवामान पालटाकडे निर्देश करत आहेत; पण हे सगळे एका दिवसात घडले का ? याचा विचार केला गेला पाहिजे.
काही महिन्यांपूर्वी गोव्यातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात लागलेल्या आगीमध्ये ३० लाख चौरसमीटर जंगलक्षेत्र जळून राख झाले. या आगीमुळे दुर्मिळ जैवविविधता, तसेच काही बागायतदारांचे काजूचे पीकही नष्ट झाले.
गोव्यातील अश्वे समुद्रकिनार्यावर मोठ्या आवाजात वाजवण्यात येणारे संगीत आणि विजेचे झगमगते दिवे यांमुळे समुद्रकिनार्यावर अंडी घालणासाठी येणार्या ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या कासवांच्या संख्येत घट झाली आहे.
यावर्षी काश्मीरमधील तापमान उणे ३ ते ५ डिग्री सेल्सियस इतके खाली गेलेले असतांनाही तेथे बर्फवृष्टी झालेली नाही. एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. काश्मीरच नाही, तर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश राज्यांतही अशीच स्थिती होती. काश्मीरमध्ये बर्फाविना हिवाळ्याची १० वर्षांतील ही तिसरी वेळ आहे. जम्मू-काश्मीर हवामान विभागाचे संचालक डॉ. मुख्तार अहमद यांच्या मते, ‘एल् निनो’मुळे बर्फ पडलेला नाही, तसेच समुद्राचे तापमान ०.५ अंशांनी वाढले आहे. ‘एल् निनो’ ही प्रशांत महासागरात सिद्ध झालेली हवामान स्थिती आहे, जिचा बाष्पाने भरलेल्या मोसमी वार्यांवर परिणाम होतो. ‘एल् निनो’चा परिणाम विविध देशांच्या हवामानावर होतो. दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि आसपासचे देश, तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि प्रशांत महासागराला जोडलेले अनेक देश यांना ‘एल् निनो’चा फटका बसतो.
पुण्यातील केशवनगर भागात मुठा नदीवर डासांचे वादळ आल्याचे चलचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले होते. मध्य अमेरिका, रशिया अशा देशांमध्ये पावसाळ्यात हे डासांचे वादळ पहायला मिळते. या चलचित्रावर प्रतिक्रिया देत एकाने सांगितले की, मुठा नदी स्वच्छ नसल्याने, तसेच नदीमध्ये सांडपाणी येत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, असे वादळ येणे नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक असल्याने महापालिका आतातरी मुठा नदी स्वच्छतेच्या सूत्रावर गंभीर होऊन नदीच्या स्वच्छतेसाठी शीघ्र कृती करेल का ? हाही प्रश्न आहे.
झाडे, प्राणी आणि पक्षी यांवरही परिणाम !
१. उत्तराखंडमध्ये २ सहस्र ५०० मीटरच्या उंचीवर हिमालयातील ‘हिमालयन पॉप्युलर’ ही वनस्पती आढळून येत होती. त्याचे शास्त्रीय नाव ‘पॉप्युलस सिलियाटा’ आहे. हीच वनस्पती आता या उंचीवर नष्ट झाली; कारण या वनस्पतीला आवश्यक अशी थंडी आणि आर्द्रता या उंचीवर मिळत होती. आता ही वनस्पती ४ सहस्र ५०० मीटर उंचीवर मिळू लागली आहे.
२. उत्तराखंड राज्य पक्षी ‘हिमालयन मोनाल’ वर्ष १९५१ पर्यंत १ सहस्र १०० मीटरपर्यंत दिसून येत होता. आता तोही आणखी उंचीवर गेला आहे. उत्तराखंडमध्ये वर्ष १९९९ पर्यंत १ सहस्र १०० मीटरपर्यंत बर्फवृष्टी होत. त्यानंतर तसे झाले नाही. त्यामुळे आता हे पक्षी २ सहस्र ५०० मीटरखाली येत नाहीत.
३. वाढत्या उष्णतेचा फटका पर्वतावरील फुलपाखरे आणि कीटक यांच्या अनेकविध प्रजातींना बसला आहे. हे जीव उंच ठिकाणी गेले आहेत, हे सरकारने केलेल्या एका पाहणीतून दिसून आले. ‘लेपिडोप्टेरा’ फुलपाखरांच्या ३५ टक्क्यांहून अधिक प्रजातींसाठी हिमालय हे घर आहे.
कोकणात हत्ती, गवा यांसारख्या वन्यप्राण्यांचा शेती-बागायती यांत शिरकाव
वन्य प्राण्यांसाठी चारा, पाणी आदी सोयी उपलब्ध करणे; वनप्राण्यांचा उपद्रव थांबवणे या दृष्टीने वनविभागाच्या अनेक योजना आहेत; परंतु वनक्षेत्रात अतीक्रमण केलेल्यांना लाखो हेक्टर वनभूमी दिल्या गेल्या. त्यामुळे वनक्षेत्र अल्प होत गेले अन् तेव्हापासूनच वन्य प्राण्यांपासून निर्माण होणार्या समस्यांमध्ये वाढ झाली. आता हे प्राणी मनुष्यवस्तीत येऊ लागले आहेत.
– वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (२६ जुलै २०२३ या दिवशी विधानसभेत वन्य प्राण्यांच्या समस्येवर उपस्थित झालेल्या लक्षवेधीवर दिलेले उत्तर)