Russia China Ties : अमेरिका आजही शीतयुद्धाच्या मानसिकतेतून बाहेर आलेली नाही !

  • चीन आणि रशिया यांची टीका

  • रशिया आणि चीन हे भावासारखे असल्याचे पुतिन यांचे वक्तव्य !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

बीजिंग (चीन) – अमेरिका आजही शीतयुद्धाच्या मानसिकतेतून बाहेर आलेली नाही. ती जगभरात गोंधळाची बिजे पेरत आहे, असे वक्तव्य चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी येथे केले. पुतिन १६ आणि १७ मे अशा दोन दिवसांच्या चीनच्या दौर्‍यावर गेले होते. तेव्हा दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या भेटीच्या वेळी त्यांनी सामाईकरित्या अमेरिकेचा निषेध नोंदवला. या वेळी त्यांनी दोन्ही देशांमध्ये भागीदारीचे नवीन युग चालू झाल्याचेही सांगितले.

पुतिन यांचे स्वागत करतांना जिनपिंग म्हणाले की, चीन-रशिया राजनैतिक संबंधांचा ७५ वा वर्धापनदिन साजरा करत असणे, हे महत्त्वाचे सूत्र आहे. पालटत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितींच्या चाचणीतही हे संबंध खरे ठरले आहेत. आमच्या राजनैतिक संबंधांनी ‘महत्त्वाच्या आणि शेजारील देशांनी एकमेकांशी आदर अन् प्रांजळपणाने वर्तन कसे करावे ?’ याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

पुतिन यांनीही त्यांच्या भाषणात जिनपिंग यांचा उल्लेख ‘प्रिय मित्र’ असा केला, तसेच चीन आणि रशिया हे भावासारखे आहेत. आमच्यातील संबंध संधीसाधू नाहीत, तसेच ता कुणाच्याही विरोधात नाहीत, असे ते म्हणाले. जागतिक घडामोडींमधील आमचे सहकार्य आंतरराष्ट्रीय क्षेत्रात एक महत्त्वाचा स्थैर्य घटक म्हणून काम करतो, असा दावा पुतिन यांनी केला.

रशिया आणि चीन यांच्यातील व्यापारात वाढ नोंदवली गेली आहे. वर्ष २०२१ च्या तुलनेत २०२३ मध्ये दोन्ही देशांमधील व्यापारात ६४ टक्क्यांनी वाढ होऊन तो २० लाख कोटी रुपयांवर पोचला आहे. वर्ष २०२३ मध्ये चीन रशियाचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार बनला आहे.

संपादकीय भूमिका

पाकधार्जिणा चीन हा भारताचा कट्टर शत्रू आहे. त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार्‍या रशियाचा भारत मित्र असला, तरी तो रशियाला टोकू शकत नाही. याचे कारण युरोप आणि अमेरिका यांनी निर्बंध लादलेल्या रशियाला चीनसारख्या बलाढ्य देशाची आवश्यकता आहे. असे असले, तरी भारताने मात्र रशियाशी सावधगिरीनेच वागणे आवश्यक आहे !