Top 10 Economies 2075 : वर्ष २०७५ पर्यंत पाकिस्तान आणि इंडोनेशिया हे देश जगातील पहिल्या १० अर्थव्यवस्थांमध्ये असतील !

  • जगातील सर्वोत्कृष्ट बँकांपैकी एक असलेल्या ‘गोल्डमन सॅक्स’चा अंदाज

  • चीन प्रथम, तर भारत द्वितीय क्रमांकावर असण्याची शक्यता !

न्यूयॉर्क (अमेरिका) – पुढील ५० वर्षांत, म्हणजे वर्ष २०७५ पर्यंत जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांची एकूण अर्थव्यवस्था २३५ ट्रिलियन डॉलर्सची असेल. यांपैकी साधारण ५० ट्रिलियन डॉलर्स केवळ मुसलमानांच्या हातात असेल, असा अंदाज जगातील सर्वोत्कृष्ट बँकांपैकी एक असलेल्या ‘गोल्डमन सॅक्स’ने वर्तवला आहे. वर्ष २०७५ पर्यंत पहिल्या १० अर्थव्यस्थांमध्ये इंडोनेशिया, पाकिस्तान, नायजेरिया आणि इजिप्त हे ४ मुसलमान देश ‘श्रीमंत देश’ म्हणून उदयास येतील, असे या बँकेचे म्हणणे आहे. चीन प्रथम, तर भारत दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचेही या बँकेचे म्हणणे आहे.

सध्या इंडोनिशयाची अर्थव्यवस्था १६ व्या क्रमांकावर असून नायजेरिया ३१ व्या, इजिप्त ३२ व्या, तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था ४१ व्या क्रमांकावर आहे. पुढील ५० वर्षांत या देशांमध्ये मोठे पालट घडून येतील आणि त्यांच्या अर्थव्यवस्था झपाट्याने वधारतील, असा ‘गोल्डमन सॅक्स’चा दावा आहे.


वर्ष २०५० पर्यंत भारतात जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असेल !


अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ या जागतिक अहवाल बनवणार्‍या आस्थापनानुसार, वर्ष २०५० पर्यंत भारत हा सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेला देश बनेल. सध्या भारतात जगातील ११ टक्के मुसलमान लोकसंख्या रहाते. ती वर्ष २०७५ मध्ये ११.२ टक्के होईल. दुसरीकडे वर्ष २०७५ पर्यंत इस्लाम ख्रिस्ती धर्माला मागे टाकत जगात सर्वाधिक अनुयायी असलेला धर्म बनेल.