Loksabha Elections 2024 : भाजप हाच धर्मनिरपेक्ष पक्ष ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

  • भाजपच्या ‘मोदींची गॅरंटी २०२४’ या संकल्प पत्राचे अनावरण

  • आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांच्या धर्मनिरपेक्ष पक्षाला मतदान करण्याच्या आवाहनाचे स्वागत !

भाजपच्या ‘मोदींची गॅरंटी २०२४’ या संकल्प पत्राचे अनावरण करतांना सौ. सौ. पल्लवी धेंपे, खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि मंत्री सुभाष शिरोडकर

पणजी, १८ एप्रिल (वार्ता.) : भाजप हाच एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यामुळे भाजप गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांच्या ‘धर्मनिरपेक्ष पक्षालाच मतदान करा’, या नागरिकांना केलेल्या आवाहनाचे आम्ही स्वागत करतो, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. भाजपचे ‘मोदींची गॅरंटी २०२४’ या राष्ट्रीय संकल्प पत्राचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पक्षाच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे, भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपे आणि उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय संकल्प पत्रामध्ये ‘एक देश, एक निवडणूक’; विजेचे देयक शून्य रकमी यावे, यासाठी सौरऊर्जा योजना लागू करणे; ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’आणि ‘समान नागरी कायदा’ लागू करणे, आदी महत्त्वाच्या सूत्रांचा समावेश आहे.’’ पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष असून तो गोव्यातील धेंपे उद्योग समुहापेक्षाही मोठा आहे. पल्लवी धेंपे यांना त्यांचे सामाजिक कार्य मोठे असल्याने आणि त्या लोकप्रिय असल्याने उमेदवारी देण्यात आली आहे.’’

काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांच्याशी खुली चर्चा करण्यास मी सिद्ध ! – मुख्यमंत्री

काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार रमाकांत खलप यांनी भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना खुल्या चर्चेचे आव्हान देण्याच्या फंदात पडू नये. त्यांच्या प्रत्येक सूत्रावर चर्चा करण्यास मी सिद्ध आहे. गोव्यातील लोकसभा निवडणूक झाल्यानंतर (७ मेनंतर) ते केव्हाही खुल्या चर्चेसाठी मला बोलावू शकतात; मात्र सध्या गोव्यातील निवडणूक होईपर्यंत मी व्यस्त आहे, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

..तर ‘म्हापसा अर्बन बँक’ची धारिका पुन्हा उघडू शकते !

‘दिवाळे घोषित झालेली ‘म्हापसा अर्बन बँक’ची धारिका आवश्यकता भासल्यास पुन्हा उघडली जाऊ शकते’, अशी गर्भित चेतावणी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार अधिवक्ता रमाकांत खलप यांचे थेट नाव न घेता दिली. पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘म्हापसा अर्बन बँके’चे प्रकरण सध्या सहकारी संस्था निबंधकांकडे आहे. हे प्रकरण अजून संपलेले नाही, याचा विचार ज्याने त्याने अवश्य करावा. ‘म्हापसा अर्बन बँक’ का बुडाली ? याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ‘म्हापसा अर्बन बँक’ बुडाल्याने ज्या शेकडो लोकांचे कष्टाचे पैसे बुडाले त्यांना त्याविषयी विचारा. ते लोक ‘यासाठी कोण उत्तरदायी आहेत ?’ हे सांगतील. हक्काचे पैसे न मिळणार्‍या लोकांच्या वेदना समजून घ्या. ठेवीदार आणि भाग भांडवलदार यांना त्यांचे पैसे मिळाले पाहिजेत. आमच्यावर आरोप करण्यासाठी कुणी अन्य कुणालाही पुढे करू नये. जे काय म्हणायचे आहे, ते थेट म्हणावे. कुठल्या उमेदवाराने अनधिकृतपणे पैसे कमवून ते कुठे गुंतवले आहेत, याची सर्वांनाच कल्पना आहे. आम्ही राजकारणाचा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच केला नाही. आमच्यासाठी प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी आम्ही असतो. राजकारणातून आम्ही स्वार्थ साधला, असे कुणी सिद्ध केल्यास त्याच क्षणी राजकारण सोडून घरी जाण्याची आमची सिद्धता आहे.’’