पुणे विद्यापिठाकडून ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रहित !

नाटकाचा प्रयोग ‘विद्यार्थी विकास मंचा’कडून आयोजित, ऐन वेळी अनुमती नाकारली !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये महात्मा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महोत्सव चालू आहे. या महोत्सवामध्ये १२ एप्रिल या दिवशी होणारा ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रहित करण्यात आला. ऐन वेळी विद्यापिठाने नाटक सादर करण्यास अनुमती नाकारली. त्यामुळे प्रयोग सादर करता आला नाही, असे नाटकातील कलाकार आणि अभिनेते संभाजी तांगडे यांनी सांगितले.

तांगडे पुढे म्हणाले की, विद्यापिठातील महोत्सवामध्ये ‘विद्यार्थी विकास मंचा’ने या नाटकाचे आयोजन केले होते. त्यासाठीची अनुमती ही १० दिवसांपूर्वीच घेण्यात आली होती. त्यानुसार कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या प्रवासाची तिकीटे आणि दिनांक घेतल्या होत्या; परंतु ऐन वेळी नाटकाची अनुमती रहित करण्यात आल्याचे, आम्हाला सांगण्यात आले. शासनाच्या ‘सेन्सॉर बोर्डा’ने प्रमाणपत्र दिलेले हे नाटक आहे. गेली १३ वर्षे या नाटकाचे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आणि देहलीसह इतरत्र ८५० हून अधिक प्रयोग झालेले आहेत. ‘छत्रपती शिवरायांच्या नावाने जाती-धर्मात द्वेष पसरवू नका’, असा स्पष्ट संदेश देणारे हे नाटक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने नाकारले आहे याचा अर्थ काय समजावा?, असा प्रश्नही संभाजी तांगडे यांनी केला आहे.