हिंदु संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने उभारलेल्या सामूहिक गुढीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
पुणे – गुढीपाडवा अर्थात् चैत्र शुक्ल प्रतिपदा ! ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून सत्ययुगाचा प्रारंभ केला म्हणून हा दिवस नववर्षाचा प्रारंभदिन म्हणून साजरा केला जातो. हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले होते. नववर्षाचा हा प्रारंभदिन पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. आळंदेवाडी, भोर तुळशीबागेतील राममंदिर, पारगाव (सालू मालू) दौंड तालुका, वडगाव काशिंबे (मंचर), भावडी (मंचर), बारव जुन्नर, मुळेवाडी मंचर, कोंढणपूर, आर्वी,मंचर, शेवाळवाडी मंचर, शिवतेजनगर मोई, रामवाडी, पुणे, भीमाशंकर, शिंदेवाडी पारगाव (सालू मालू) तालुका दौंड, श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान श्री क्षेत्र वडज, ओझर, लेण्याद्री देवस्थान आदी ठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी सामूहिक गुढी उभारून गुढीचे पूजन केले.
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणच्या शाळा, सोसायट्या, तसेच मंदिरांमध्ये गुढीपाडव्याविषयी प्रवचने घेण्यात आली, तसेच ‘गुढी कशी उभारावी ?’ याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रबोधन करण्यात आले. ठिकठिकाणी फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून गुढीपाडव्याविषयी माहिती देण्यात आली. सहस्रो धर्मप्रेमींनी उपक्रमाचा लाभ घेतला. या वेळी रामराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली आणि उत्साहात रामराज्याच्या घोषणा दिल्या.
वैशिष्ट्यपूर्ण
१. आळंदेवाडी येथील रणरागिणी शाखेतील मनीषा गव्हाणे, दिव्या गव्हाणे आणि अन्य सदस्य यांनी सर्व नियोजन केले. घरोघरी जाऊन निमंत्रण देऊन प्रसार केला आणि उपक्रमाचे आयोजन केले. २. भोर येथे मंदिर विश्वस्त श्री. यशवंत भेलके, श्री. आप्पा राऊत आणि अन्य यांनी सामूहिक गुढीचे सर्व नियोजन केले. ३. पारगाव हिंदु जनजागृती समिती शाखेतील आणि शिंदेवाडी पारगाव धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी यांनी एकत्रित येऊन उपक्रमाचे नियोजन केले. सर्वांना भ्रमणभाष करून प्रसार केला, तसेच गुढी उभारून झाल्यानंतर गावातील व्यापारी, ग्रामस्थ, प्रतिष्ठित यांना हिंदु जनजागृती समितीची शुभेच्छा पत्रके देऊन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. ‘प्रसार व्हिडिओ’ही युवकांनी सिद्ध केला. ‘येथून पुढे प्रत्येक वर्षी आम्ही सामूहिक गुढी उभारणार’, असे त्यांनी सांगितले. गावातील ग्रामदैवत येथील गुढी उभारून झाल्यावर गावातील शिंदेवाडी येथील वर्गामध्ये जाऊन तिथेही तेथील धर्मप्रेमी यांना सामूहिक गुढी उभारण्यासाठी साहाय्य केले. ४. भीमाशंकर येथील गुढीपूजनात मंदिराचे पुजारी आणि विश्वस्तही सहभागी झाले होते. ५. शिवतेजनगर, मोई येथील महिलांनी सामूहिक गुढी उभारली. ६. रामवाडी, पुणे येथे मंदिर ट्रस्टी श्री. दिलीप देवकर यांच्या पुढाकाराने मंदिरासमोर गुढी उभारण्यात आली. आलेल्या सर्व धर्मप्रेमींकडून सामूहिक रामराज्य प्रतिज्ञा घेण्यात आली. या वेळी येथील श्री. दिलीप देवकर यांनी सांगितले की, हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून येथील मंदिरात सामूहिक गुढी उभारता आली आणि यापुढे प्रत्येक वर्षी आपण मंदिरात सामूहिक गुढी उभारण्याचे नियोजन करणार आहोत. ७. मोईगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य चौकामध्ये सामूहिक गुढी उभारणे आणि प्रतिज्ञा घेणे, हा उपक्रम तेथील धर्मप्रेमींनी स्वतः पुढाकार घेऊन यशस्वीपणे पार पडला. |