पुणे, ९ एप्रिल (वार्ता) : राष्ट्रीय कला अकादमी, पुणे यांच्या वतीने ९ एप्रिलला गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शुक्रवार पेठेतील भारत भवन येथून यात्रेचा प्रारंभ झाला.
शुक्रवार पेठेतील ‘सेवा मित्र मंडळा’च्या गणपति मंदिरासमोर हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी त्यांनी गुढीपाडव्याचे ऐतिहासिक, नैसर्गिक आणि आध्यात्मिक महत्त्व सांगितले. आपल्या ऋषिमुनींनी सांगितलेल्या कालगणनेनुसार या वर्षी हिंदूंचा हा कितवा वर्षारंभदिन आहे ? याविषयी सांगितल्यावर सर्वजण आनंदित झाले आणि उपस्थित सर्वांनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या. या वेळी सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने २१ एप्रिल २०२४ या दिवशी पुणे येथेकाढण्यात येणाऱ्या दिंडीत सहभागी होण्यासाठी साधकांनी सर्वांना निमंत्रण देण्यात आले.
कु. क्रांती पेटकर पुढे म्हणाल्या की,
पाश्चात्त्य कालगणनेच्या तुलनेत भारतातील ऋषीमुनींनी केलेला कालगणनेचा अभ्यास किती व्यापक आणि अचूक होता, त्यातून आपला सनातन हिंदु धर्म किती महान आहे ? हे सिद्ध होते. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला आपण हिंदू असल्याचा अभिमान वाटायला हवा.
या वेळी राष्ट्रीय कला अकादमीच्या कार्यकर्त्यांनी फेरीच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. ‘राष्ट्रीय कला अकादमी’चे संचालक श्री. अमर लांडे यांना समितीच्या वतीने शुभेच्छापत्रक देण्यात आले.
मंडई येथून गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन !
पुणे येथील मंडई येथून गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन श्री. राघवेंद्र (बापू) मानकर यांनी केले होते. त्याला समाजातून पुष्कळ चांगला प्रतिसाद मिळाला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. राघवेंद्र मानकर यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पत्रक देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.