SC Criticized Madras HC : मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी निवृत्तीच्या ५ महिन्यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रहित !

खटल्याची धारिका (फाईल) स्वतःकडे ठेवणे अन्यायकारक !  – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – मद्रास उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी निवृत्तीनंतर ५ महिन्यांनी एका प्रकरणाचा निकाल दिल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, पद सोडल्यानंतर ५ महिने खटल्याची धारिका (फाईल) स्वत:कडे ठेवणे अत्यंत अन्यायकारक आहे. न्यायमूर्तींकडे निर्णय देण्यासाठी ५ आठवडे होते; परंतु त्यांनी तसे केले नाही. मद्रास उच्च न्यायालयाने आता या प्रकरणावर पुन्हा सुनावणी करून निर्णय घ्यावा.

सर्वोच्च न्यायालयाने इंग्लंडचे पहिले सरन्यायाधीश लॉर्ड हेवार्ट यांचा हवाला देत म्हटले की, न्याय केवळ केला पाहिजे असे नाही, तर तो होतांनाही दिसला पाहिजे. मद्रास उच्च न्यायालयात जे काही केले गेले ते हेवार्टच्या म्हणण्याविरुद्ध आहे. आम्ही अशा अन्याय्य प्रथांचे समर्थन करू शकत नाही. या कारणास्तव निवृत्त न्यायाधिशांचा निर्णय रहित करण्यात आला आहे.