कलियुगात वाईट शक्तींच्या त्रासाविषयी समाज अनभिज्ञ आहे. आम्हा साधकांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे वाईट शक्तींच्या सूक्ष्म जगताविषयी ज्ञात झाले.श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. २० फेब्रुवारी या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला, आज सूक्ष्म परीक्षण, वास्तूशुद्धी आणि वाहनशुद्धी याविषयी पाहूया.
सादर लेखमालेचा भाग ३ बघण्या करिता येथे क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/766136.html
(भाग ४)
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांचे, तसेच ते रहात असलेल्या वास्तूचे परीक्षण करायला शिकवणे
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील कळणार्या साधकांना सांगितले, ‘‘एखाद्या साधकाला होत असलेल्या त्रासाचे प्रमाण पुष्कळ असेल, तर तो रहात असलेल्या वास्तूचेही परीक्षण करा; कारण वास्तूत त्रास असेल, तर त्याचा परिणाम म्हणून त्या साधकाला त्रास होऊ शकतो.’’ वास्तूतील त्रासाचा अभ्यास करण्यासाठी मी गोवा येथे रहाणार्या अनेक साधकांच्या घरी गेले. मला तेथे विविध अनुभव आले. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ‘‘वास्तूत त्रास असेल, तर तो कशामुळे आहे ?’, हे शोधून काढा. ‘पूर्वजांच्या त्रासामुळे वास्तूत त्रास जाणवत आहे कि भूत, पिशाच, करणीबाधा यांमुळे वास्तू दूषित झाली आहे’, हे शोधायला हवे.’’
२. वास्तूत दाब जाणवल्यास त्याचा मूळ स्रोत शोधून तेथे विविध आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आणि आकाशतत्त्वाचे उपाय म्हणून प.पू. भक्तराज महाराज रचित भजने लावणे
बर्याच वेळा वास्तूत गेल्यानंतर मला दाब जाणवायचा. ‘जाणवत असलेल्या दाबाचा मूळ स्रोत कुठे आहे ?’, हे आम्ही शोधून काढत होतो. वास्तूच्या एखाद्या कोपर्यात वाईट शक्तीने स्थान बनवलेले असायचे. आम्ही साधकांना ‘वास्तूच्या त्या कोपर्यात गोमूत्र शिंपडणे, विभूती फुंकरणे किंवा एखाद्या देवतेचे चित्र तेथे लावणे’, असे उपाय सांगत होतो. असे केल्याने काही वेळा त्रास वाढतही असे; कारण वाईट शक्ती चिडून घरात रहाणार्या व्यक्तींना त्रास देत असत. अशा वेळी आम्ही वास्तूत ‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांनी रचलेली आणि गायलेली भजने लावणे किंवा एखाद्या देवतेचा नामजप लावून ठेवणे’, असे उपाय करत असू. नादाच्या माध्यमातून वास्तूत आकाशतत्त्वाचे उपाय झाल्याने वास्तूतील त्रास लवकर न्यून होत असे.
३. आकाशतत्त्वाचे उपाय करणारी प.पू. भक्तराज महाराज रचित चैतन्यमय भजने !
३ अ. प.पू. भक्तराज महाराज रचित भजनांतील चैतन्याचे महत्त्व जाणून त्यांच्या वाणीतील भजने ध्वनीमुद्रित करून ठेवणारे द्रष्टे गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले ! : अनुमाने वर्ष २००१ नंतर आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून प.पू. भक्तराज महाराज रचित भजने ऐकण्याची चैतन्यमय परंपरा चालू झाली. ‘प.पू. बाबांच्या देहत्यागापूर्वीच त्यांच्या आवाजातील भजने परात्पर गुरु डॉक्टरांनी खडतर परिश्रम घेऊन ध्वनीमुद्रित का करून ठेवली ?’, त्याचे कारण आम्हाला उमगले. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांतील नादचैतन्याचा परिणाम म्हणून अनेक साधकांचा वाईट शक्तींचा त्रास न्यून झाला.
३ आ. ‘प.पू. भक्तराज महाराज रचित भजने’, ही साधकांसाठी आध्यात्मिक ठेवा ! : प.पू. बाबांची भजने ध्वनीमुद्रित करणे, ही एक ईश्वरी लीलाच होती. प.पू. बाबांची भजने आम्हा साधकांचा साधनेतील एक आधारस्तंभ आहे. प.पू. बाबांच्या भजनांत चैतन्य असल्याने साधकांनी ती भजने ऐकल्यावर त्यांना साधना करण्यासाठी प्रेरणा मिळते, वाईट शक्तींच्या त्रासामुळे साधकांची न्यून झालेली प्राणशक्ती वाढते आणि साधकांना असलेला थकवा दूर होतो. प.पू. बाबांची भजने आम्हा साधकांसाठी ‘मल्टिव्हिटॅमिन’चा (अनेक जीवनसत्त्वे असलेला) जणूकाही डोसच आहे, जो कोणताही आधुनिक वैद्य आम्हाला देऊ शकत नाही.
परात्पर गुरु डॉक्टर, तुम्ही आम्हाला अनेक वेळा प.पू. बाबांच्या भजनांचा आधार देऊन वाईट शक्तींच्या गर्तेतून बाहेर काढले आहे. आम्ही सर्व साधकांनी आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.
४. वास्तूदोष दूर होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेली ‘वास्तूछत’ पद्धत !
परात्पर गुरु डॉक्टरांनी वास्तूदोषाच्या निवारणार्थ वास्तूत देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या लावण्याची पद्धत चालू केली. यालाच ‘वास्तूछत’ असे नाव देण्यात आले. ‘खोलीच्या चार भिंतींवर कोणत्या देवतांच्या नामजपांच्या पट्ट्या लावायच्या’, हे सूक्ष्मातील अभ्यास करून ठरवण्यात आले. साधकांनी ते रहात असलेल्या वास्तूत वास्तूछत लावल्यावर साधकांचे त्रास बर्याच प्रमाणात न्यून होऊ लागले.
५. वाहनांच्या माध्यमातून साधकांना होणारे त्रास आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शोधलेल्या ‘वाहनशुद्धी’च्या पद्धती !
५ अ. साधकांना सेवा करतांना वाहनांच्या संदर्भात अडथळे येऊ नयेत, यासाठी वाहनशुद्धी करण्याचे उपाय शोधणे : साधना करतांना साधकांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. साधकांना सेवेला जातांना ‘चारचाकी किंवा दुचाकी गाडी बंद पडणे, गाडीचे टायर फुटणे, गाडीचा अपघात होता होता वाचणे’, अशा अडचणी येऊ लागल्या. आम्ही साधकांना गाडीची नारळाने दृष्ट काढणे, गाडी चालवण्यापूर्वी गाडीत विभूती फुंकरणे, गाडीच्या चाकांवर गोमूत्र शिंपडणे, यांसारख्या उपायपद्धती सांगू लागलो.
५ आ. वाहनशुद्धीसाठी वाहनात देवतांच्या नामपट्ट्यांचे मंडल लावणे : गुरुदेवांनी आम्हाला सांगितले, ‘‘आपण वास्तूत देवतांच्या नामजपाच्या पट्ट्यांचे छत लावतो, त्याप्रमाणेच वाहनातही लावू शकतो ना; कारण वाहन ही एक खोलीच नाही का ?’’ त्यानंतर आम्ही सूक्ष्मातून देवाला विचारून वाहनात लावायचे नामजपाच्या पट्ट्यांचे मंडल सिद्ध केले.
६. सूक्ष्म जगताचा अभ्यास करतांना साधकांना टप्प्याटप्प्याने पुढे घेऊन जाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
६ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी न थकता साधकांना सूक्ष्मातील पद्धतींविषयी सांगणे आणि नंतर साधकांचे ‘यांना किती कळते ना !’, असे सांगून कौतुक करणे : परात्पर गुरु डॉक्टर आम्हाला प्रत्येक गोष्टीचा सखोलपणे विचार करायला सांगायचे. मी सूक्ष्मातील पद्धतीचा अभ्यास करून अनेक वेळा परात्पर गुरु डॉक्टरांकडे जायचे. तेव्हा ते न थकता आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायचे आणि नंतर आमचेच कौतुक करून म्हणायचे, ‘‘यांना किती कळते ना !’’ आम्ही त्याच वेळी मनात ‘गुरुदेव, तुम्हीच तर आम्हाला हे सर्व दिले आहे. आम्ही केवळ तुमचे आज्ञापालन करणारे माध्यम आहोत. तुम्ही आम्हाला असेच शिकवून अध्यात्मातील सूक्ष्म अंगाचे दर्शन घडवा. आमच्या अल्प मतीने सूक्ष्म जगताविषयी जाणणे शक्य नाही. तुम्हीच आम्हाला घडवा, आम्हाला मोठे करा’, अशी कृतज्ञता व्यक्त करत असू.
६ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना वास्तूचे परीक्षण करतांना ‘आधी प्रत्यक्ष वास्तू पाहून परीक्षण करणे, वास्तूचा नकाशा पाहून परीक्षण करणे आणि नंतर सर्वांनाच उपयोगी असा नामजप शोधणे’, अशा टप्प्यांनी शिकवणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला सांगितले, ‘‘आता तुम्ही साधकांच्या घरी परीक्षणासाठी जाऊ नका. त्यांच्या घराचा नकाशा येथे मागवा.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला वास्तूचे परीक्षण करण्यातील आणखी पुढच्या टप्प्याकडे नेले. त्यामुळे आमचा साधकांच्या घरी जाण्यातील वेळ वाचू लागला.
आम्ही साधकांच्या वास्तूंच्या नकाशाचे परीक्षण करून ‘कुठे कोणता त्रास आहे ?’, याविषयी सांगू लागलो. आम्ही त्या नकाशांवर ‘कोणत्या दिशेच्या भिंतीवर कोणत्या देवतेच्या नामजपाच्या पट्टया लावायच्या ?’, याविषयी लिहून देऊन संबंधित साधकांकडे पाठवू लागलो. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही असे किती नकाशे पहाणार आणि किती जणांना नामजप शोधून देणार ? तुम्ही देवाला ‘वास्तूतील त्रास अल्प होण्यासाठी सर्वांनाच उपयोगी पडणारा नामजप कोणता आहे ?’, असे विचारा, म्हणजे आपला वेळही वाचेल.’’
६ इ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगात साधकांना सूक्ष्म जगतातील अनेक गोष्टी शिकता येणे : आम्हाला देवाला असे विचारण्याविषयी सुचले नाही. परात्पर गुरु डॉक्टरच आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी सांगून किंवा आमच्यासमोर एखादा प्रसंग उभा करून आम्हाला सूक्ष्मातील जाणण्याच्या पद्धतीच्या पुढच्या पुढच्या टप्प्यात आमच्या नकळतच घेऊन जात असत. खरेच, यातून साधनेत देहधारी गुरु असण्याचे महत्त्व कळते. गुरूंच्या सत्संगात साधक बरेच काही शिकतो; मात्र साधकाची शिकण्याची जिज्ञासा हवी. आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या सूत्रांचे त्वरित आज्ञापालन केल्याने आम्हाला सूक्ष्म जगतातील बर्याच गोष्टी शिकता आल्या.
६ ई. वास्तूतील त्रासाची तीव्रता अधिक असल्यास परात्पर गुरुदेवांनी साधकांच्या स्थितीनुसार त्यांना वास्तू सोडायला किंवा अन्य उपाय करायला सांगणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी वास्तूविषयी त्यांचे निरीक्षण कागदावर लिहून तो कागद माझ्याकडे पाठवला. त्यांनी लिहिले होते, ‘वास्तूत अधिकाधिक ६ टक्के त्रास असेल, तर वास्तू सोडून जाण्याविना पर्याय नसतो. वास्तूतील हा त्रास अल्प होण्यास अनेक वर्षेही लागू शकतात. वास्तूतील त्रास अल्प करण्यासाठी साधकांची साधनाही व्यय होते. त्यामुळे वास्तूतील त्रासाचे परीक्षण करतांना आधी ‘वास्तूतील त्रास किती टक्के आहे ?’, ते सूक्ष्मातून जाणून घ्यावे. वास्तूत त्रास असल्याने वास्तू सोडावी लागणार असल्यास साधकाला तसे सांगावे; परंतु त्याच्या घरच्या परिस्थितीचा विचार करूनच हं !; कारण अनेक साधकांची वास्तू सोडण्याची परिस्थिती नसते. साधकाच्या त्या वेळच्या परिस्थितीचा अभ्यास करूनच हा उपाय सांगावा. साधकाची तशी स्थिती नसेल, तर त्याला ‘अन्य आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगून वास्तूतील त्रास कसे अल्प करता येतील ?’, हे सांगावे.’ साधकांविषयी किती हा विचार ! यामुळे आम्ही साधकाला शक्यतो वास्तू सोडायला लागू नये, यासाठीचा उपाय सांगत होतो. वास्तूत कितीही त्रास असला, तरीही परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे साधकांचे त्रास न्यून होत आहेत. ‘जीवनात गुरुकृपा किती महत्त्वाची आहे !’, हेही आमच्या लक्षात आले.
७. वास्तू पालटल्यावरही काही साधकांना त्रास होत असल्याने ‘साधकाने साधना करून स्वतःभोवती वज्रासारखे कवच निर्माण करणे’, हाच शाश्वत उपाय आहे’, हे लक्षात येणे
काही साधकांच्या संदर्भात आमच्या लक्षात आले, ‘साधकांनी आधीची वास्तू सोडली आणि ते दुसर्या वास्तूत रहायला गेल्यावर त्यांना काही कालावधीनंतर पुन्हा त्रास चालू झाला; मात्र त्यांच्या त्रासाची तीव्रता अल्प होती.’ याचे कारण शोधल्यावर आमच्या लक्षात आले, ‘समष्टी साधना करणार्या साधकाच्या संदर्भात त्याने एक वास्तू सोडली, तरी वाईट शक्ती त्याच्या मागे मागे दुसर्या वास्तूत येतातच.’ परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्या लक्षात आणून दिले, ‘वास्तू सोडणे, वास्तूत उपाय करणे, हे सर्व तात्कालिक उपाय आहेत. ‘साधकाने साधना वाढवून स्वतःभोवती वज्रासारखे कवच निर्माण करणे आणि हे कवच सतत जागृत रहाण्यासाठी नित्य साधना करणे’, हाच शाश्वत पर्याय होऊ शकतो. कोणत्याही पद्धतीचा आणि कोणत्याही ठिकाणी त्रास असल्यास साधकाला स्वतः साधना करण्याविना पर्याय नाही.’
८. साधनेत टिकून रहाण्यासाठी गुरुकृपाच हवी !
‘साधकांनी साधना करण्यासह अन्य उपायपद्धती अवलंबणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे साधकाची साधना त्रास न्यून करण्यात व्यय होत नाही’, हेही परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवले, म्हणजेच वर्तमान स्थितीत सर्वच महत्त्वाचे आहे; कारण हे कलियुग आहे. सभोवती वाईट शक्तींचा प्रकोप अधिक आहे. त्याला सामोरे जाऊन साधनेत टिकून रहाणे महत्त्वाचे आहे; मात्र त्यासाठी गुरुकृपाच हवी.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू. (६.२.२०२२) (क्रमश:)
|
भाग ५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/767027.html