कलियुगात वाईट शक्तींच्या त्रासाविषयी समाज अनभिज्ञ आहे. आम्हा साधकांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे वाईट शक्तींच्या सूक्ष्म जगताविषयी ज्ञात झाले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत.
२१ फेब्रुवारी या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला, आज ‘साधकाची साधना व्हावी’, यासाठी त्याला कसे साहाय्य करायचे ? याविषयी पाहूया.
(भाग ५)
भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/766715.html
१. ‘साधकाची साधना व्हावी’, यासाठी त्याला कसे साहाय्य करायचे ?’, ते शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनुभूतींचा अभ्यास करायला सांगणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला (सूक्ष्म परीक्षण करणार्या साधकांना) सांगितले, ‘‘तुम्ही साधनेत येणार्या अनुभूतींचाही अभ्यास करायला हवा.’’ आम्ही तसा प्रयत्न चालू केल्यावर आम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू लागली, उदा. एखाद्या साधकाला त्रास असला, तरी त्याच्याकडे पाहून चांगले वाटायचे. याचे कारण शोधल्यावर ‘त्या साधकाची सेवा करण्याची तळमळ चांगली आहे’, असे आमच्या लक्षात आले.
१ आ. साधनेत ‘देवाप्रतीचा भाव, तळमळ, प्रेमभाव आणि अहं न्यून असणे’, याला अधिक महत्त्व असणे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधक साधनेत कुठे न्यून पडतो ?’, ते शोधायला सांगणे : प्रथम आम्ही साधकांना ‘कोणत्या प्रकारचा त्रास आहे ?’, एवढेच शोधून देत होतो. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला सांगितले, ‘‘साधनेत देवाप्रतीच्या भावाला पुष्कळ महत्त्व आहे. साधकाचा अहंही अल्प हवा. साधकामधील ‘साधनेची तळमळ आणि प्रेमभाव’ हे गुणही महत्त्वाचे आहेत. साधकांमधील या घटकांचे परीक्षण करून ‘तो साधनेत कुठे न्यून पडतो ?’, हेही त्याला सांगा. साधकाची साधना वाढल्यावर आपोआपच त्याचा त्रासही न्यून होत जाईल.’’ असा आम्ही कधी विचारच केला नव्हता.
१ इ. ‘साधकाच्या साधनेचा आढावा घेणे’, ही नवीन उपायपद्धत उदयाला येणे : आम्ही ‘साधकामध्ये किती टक्के भाव, तळमळ आणि अहं आहे ?’, याचे परीक्षण करून त्या साधकाला आवश्यक त्या घटकावर अधिक लक्ष देण्यास सांगत होतो. साधकाने त्यानुसार केल्यावर साधकाच्या साधनेत वृद्धी होऊन त्याला आनंद होत असे. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकाला असलेल्या आध्यात्मिक त्रासाची टक्केवारी, तसेच साधकामधील ‘भाव, तळमळ आणि अहं’ यांच्या टक्केवारीला तेवढेच महत्त्व द्यायला प्रारंभ केला. यातूनच ‘साधकाच्या साधनेचा आढावा घेणे’, ही नवीन उपायपद्धत उदयाला आली.
१ ई. साधिकांनी केलेले सूक्ष्म परीक्षण परात्पर गुरु डॉ. आठवले तन्मयतेने जाणून घेत असल्याने सूक्ष्म जगताचे परीक्षण करण्यासाठी हुरूप येणे : आम्ही (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ), सुश्री (कु.) कविता राठिवडेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४३ वर्षे) कु. सुषमा पेडणेकर (आताच्या सौ. सुषमा नाईक, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४२ वर्षे) ‘साधकामध्ये किती टक्के भाव, तळमळ आणि अहं आहे ?’,याचा अभ्यास करत होतो. आम्ही सूक्ष्म जगताविषयी एकमेकींशी बोलून त्याविषयीची सूत्रे वहीत लिहून परात्पर गुरु डॉक्टरांकडे जात असू. परात्पर गुरु डॉक्टर आम्ही सांगत असलेल्या लहान सहान गोष्टीही तितक्याच तन्मयतेने जाणून घेत असत. त्यामुळे आम्हाला सूक्ष्म जगताचे परीक्षण करण्यासाठी हुरूप येत असे.
१ उ. प्रसारसेवेतील साधकांचे सूक्ष्म परीक्षण करून त्याविषयी त्यांना सांगणे
१ उ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भारतभर साधनेचा प्रसार करणार्या प्रमुख प्रसारसेवकांच्या सत्संगाला जायला सांगून त्यांच्यातील ‘भाव, तळमळ आणि अहं’ या घटकांची टक्केवारी काढायला सांगणे : त्या वेळी संपूर्ण भारतभर साधनेचा प्रसार करणार्या प्रमुख प्रसारसेवकांचा गोव्यात एकत्रितपणे सत्संग होत असे. परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक वेळा मला या सत्संगांत जायला सांगितले. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सांगितले, ‘‘प्रसारसेवक कसा बोलतो ? त्याचे साधनेतील दृष्टीकोन कसे आहेत ? तो इतरांचे ऐकतो का ? त्याचे सत्संगात लक्ष असते का ? तो प्रत्येक सूत्राचा गांभीर्याने विचार करतो का ?’, हे सर्व प्रत्यक्ष पहा आणि त्याच्यातील ‘भाव, तळमळ आणि अहं’ या घटकांची टक्केवारी काढा.’’ मी तसे करून परात्पर गुरु डॉक्टरांपुढे एक तक्ताच सादर करत असे. परात्पर गुरु डॉक्टर त्यातील त्रुटी शोधून मला त्याविषयी मार्गदर्शन करत असत.
१ उ २. प्रसारसेवकांचे केलेले परीक्षण त्यांना सांगून ‘साधनेच्या अनुषंगाने कोणत्या घटकाकडे कसे लक्ष द्यायचे ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना सांगायला सांगणे : त्यानंतर ते मला लगेच सांगत, ‘‘सत्संग चालू होण्यापूर्वीच तुमचे परीक्षण साधकांना सांगा आणि ‘साधनेच्या अनुषंगाने त्या त्या घटकाकडे कसे लक्ष द्यायचे ?’, हेही त्यांना सांगा.’’ मी आज्ञापालन म्हणून त्वरित हे सर्व सत्संगाच्या प्रारंभी संबंधित साधकांना सांगत असे.
१ ऊ. श्री गुरूंचे आज्ञापालन करून इतरांचे परीक्षण त्यांना सांगतांना स्वतःमधीलही साधनेचे गुण वाढवण्याचे गांभीर्य वाढणे : माझ्या मनात ‘या प्रसारसेवकांना काय वाटेल ?’, असा विचार किंचितही येत नसे. श्री गुरूंनीच मला ती शक्ती दिली होती. ‘गुरूंच्या सांगण्यात किती शक्ती असते !’, हे त्यांच्या वचनाचे त्वरित आज्ञापालन केल्यानेच कळते’, हे माझ्या लक्षात येऊ लागले. नव्हे, तसे ते माझ्याकडून करूनही घेऊ लागले; कारण त्या वेळी मीच साधनेत नवीन होते. माझ्यामध्ये साधनेसाठी आवश्यक हे सर्व गुण नव्हते. मी इतरांना सांगतांना ‘माझ्यामध्येही भाव, तळमळ आणि अहं अल्प असणे’ यांसारख्या घटकांविषयीचे गांभीर्य वाढू लागले.
१ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरु हा देह नसून एक तत्त्व आहे’, हा साधनेतील मूलभूत सिद्धांत नकळत शिकवणे : ‘मी स्वतःच या सर्वांत न्यून आहे, तर मी इतरांना कसा उपदेश करू ?’, असा विचार माझ्या मनाला शिवला नाही. तेव्हा माझी अशी श्रद्धा होती की, ‘या देहातून साक्षात् परात्पर गुरु डॉक्टरच बोलत आहेत आणि ते सर्वज्ञ अन् परिपूर्ण आहेत. मग चिंता कशाला करायची ? आपण केवळ आपल्या देहातील त्यांच्या तत्त्वाला अनुभवायचे आहे.’ ‘अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘गुरु हा देह नसून एक तत्त्व आहे’, हा साधनेतील मूलभूत सिद्धांत मला शिकवण्यास कधी आरंभ केला ?’, हे माझे मलाच कळले नाही.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या सर्वांतून ‘साधना करण्याविना पर्याय नाही’, हे सूत्र मनात खोलवर रुजवण्याचा प्रयत्न करणे
साधकांना असलेला आध्यात्मिक त्रास, तसेच त्यांच्यातील भाव, तळमळ आणि अहं यांच्या टक्केवारीचेही परीक्षण नोंद होऊ लागले. यातून गुरुदेवांनी ‘साधना करण्याविना पर्याय नाही’, हे सूत्र पुनःपुन्हा आमच्या मनात खोलवर रुजवण्याचा प्रयत्न केला. यालाच ‘गुरुतत्त्वाची शिकवण’, असे म्हणतात.
३. साधकांमधील स्वभावदोष दूर होण्यासाठी ‘स्वभावदोष-निर्मूलन पद्धत’ आणि ‘स्वयंसूचना घेणे’ या प्रक्रियेचा आरंभ !
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांतील स्वभावदोष शोधून ते त्यांना सांगायला सांगणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले पाठीशी असल्याने त्याविषयी सहजतेने सांगता येणे : साधकांतील साधनेच्या पुढच्या घटकांचे परीक्षण करतांना गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला म्हणाले, ‘‘आता साधकांतील मूळ स्वभावदोष शोधून काढा. देवाला विचारा, ‘या साधकाच्या साधनेत अडथळा ठरणारा मूळ स्वभावदोष कोणता आहे ?’’ साधकांचे मूळ स्वभावदोष शोधल्यावर ‘साधक इतरांशी खोटे बाेलत असेल किंवा इतरांना फसवत असेल’, तर तेही आम्ही साधकांना निःसंकोचपणे सांगू शकत होतो. साधकाला सेवा टाळण्याची सवय असेल किंवा स्वतःची प्रतिमा जपण्याची सवय असेल, तर देव आम्हाला संबंधित साधकातील ते स्वभावदोष लगेच लक्षात आणून देत असे. साक्षात् परात्पर गुरु डॉक्टर पाठीशी असल्याने आम्हाला साधकांचे स्वभावदोष सांगतांना काहीच वाटत नसे. हीसुद्धा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !
३ आ. ‘साधकांना सूक्ष्मातील जाणणार्या साधकांविषयी जवळीकही वाटली पाहिजे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवणे : आम्ही साधकाला त्याचे स्वभावदोष सांगितल्यावर त्याला वाईट वाटत असे. यावर उपाय म्हणून आम्ही प्रथम देवाला प्रार्थना करत होतो, ‘त्या साधकाला साधनेत पुढे जाण्यासाठी आम्ही त्याला साहाय्यच करत आहोत’, असा विश्वास त्या साधकात निर्माण होण्यासाठी देवा, तुम्हीच काहीतरी करा !’ या प्रार्थनेचा आम्हाला चांगला परिणाम दिसू लागला. बर्याच साधकांना सूक्ष्मातील जाणणार्या साधकांविषयी विश्वास वाटू लागला. यातून ‘साधकाला आपलेसे केले पाहिजे आणि त्यासाठी प्रेमभाव महत्त्वाचा आहे. केवळ सूक्ष्मातील जाणणे उपयोगाचे नाही, तर ‘साधकांना सूक्ष्मातील जाणणार्या साधकांविषयी जवळीकही वाटली पाहिजे’, हे सूत्र परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला शिकवले.
३ इ. साधकांना स्वभावदोष सांगण्याच्या या पद्धतीतून पुढे वर्ष २००३ पासून ‘स्वभावदोष-निर्मूलन पद्धत’ आणि ‘स्वयंसूचना घेणे’, ही प्रक्रिया चालू होणे : ‘साधकांना स्वभावदोष सांगण्याच्या पद्धतीतच आजच्या ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिये’चे बीज दडले होते’, असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. अनुमाने वर्ष २००३ मध्ये ‘स्वभावदोष-निर्मूलन पद्धत’ आणि ‘स्वयंसूचना घेणे’, ही पद्धत मूळ धरू लागली आणि आता ती चांगल्या प्रकारे रुजली आहे. आता अनेक साधक ही प्रक्रिया शिकण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येत आहेत आणि आनंदी होत आहेत.
४. कृपाळू परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महानता
४ अ. साधकांना विविध प्रकारे घडवणे : खरेच, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा साधकांना कसे विविध प्रकारे घडवले आहे ?’, हे आता विचार केल्यावर लक्षात येते. काही संप्रदायांत केवळ ‘नामजप करा’, असे सांगितले जाते. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘नामजप करण्यासह अन्य गोष्टींनाही महत्त्व असते आणि तसे केले तरच प्रगती होते’, हे आम्हाला शिकवले.
४ आ. सूक्ष्म परीक्षण करणार्या साधिकाही साधनेत फुलांसारख्या हळूवारपणे उमलत जाणे : गुरुदेव आम्हा साधकफुलांवर कृपेची फुंकर घालत असल्यामुळे सूक्ष्म परीक्षण करता करता आम्हीही साधनेत फुलासारखे उमलत होतो. ही चैतन्याची फुंकरच आमच्यासारख्या साधकफुलांना उमलवून विकसित करत होती आणि त्यांच्यात गुरुकृपेच्या वर्षावाचा सुगंधही भरत होती.
५. शब्दातीत कृतज्ञता
‘गुरुदेवा, तुमच्याविषयी कितीही लिहिले, तरीही ते अल्पच आहे. ‘तुम्ही आम्हाला शिकवण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत’, याची कल्पनाच करवत नाही. खरेच, आम्हाला घडवण्याची तळमळ आमच्यापेक्षा तुम्हालाच अधिक आहे. ‘खरे गुरु कसे असतात ?’, ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आणि ते तुम्हीच आहात गुरुदेव, ते तुम्हीच आहात !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू. (६.२.२०२२) (क्रमश:)
|