जैन धर्मातील दिगंबर पंथियांसाठी आदर्श असलेले संत प.पू. आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज (वय ७७ वर्षे) यांनी छत्तीसगडमधील डोंगरगड येथे १८ फेब्रुवारी २०२४ या दिवशी अखेरचा श्वास घेतला. त्या निमित्ताने प.पू. आचार्य विद्यासागर महाराज यांना अभिवादन करणारा लेख येथे देत आहे.
१. शेतीक्षेत्रामध्ये विशेष कार्य आणि देशातील सर्वांत मोठ्या गोशाळेची निर्मिती
देशाची एकात्मता टिकायची असल्यास ऋषी आणि कृषी संस्कृती टिकवण्यासाठी समाजाने झटले पाहिजे, असा विचार ठेवून समाजासाठी अखंडपणे काम करणारे तपस्वीसम्राट म्हणून ओळखले जाणारे प.पू. आचार्य विद्यासागर महाराज होते. त्यांनी लाखो शोषित, वंचित लोकांना आधार दिला, तसेच कृषी संस्कृतीवर विशेष लक्ष देत शेतकरी हा कणा मानून त्यांनी शेतीक्षेत्रामध्ये विशेष कार्य केले. देशातील सर्वांत मोठ्या गोशाळेची निर्मिती केली आहे.
२. जैन साहित्यनिर्मिती, सामाजिक कार्य आणि मुनीदीक्षा यांत योगदान
आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्यांविषयी त्यांना अधिक तळमळ होती. देशभरात भ्रमण करत असतांना त्यांनी ८ भाषांवर स्वतःचे प्रभुत्व निर्माण केले. या सर्व भाषांतून त्यांनी जैन साहित्याची निर्मिती केली. जैन धर्माचा इतिहास सर्वज्ञात होण्यासाठी त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांची निर्मिती केली. शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना पदवीधर शिक्षणापर्यंत विनामूल्य शिक्षणाची व्यवस्था केली.
प.पू. विद्यासागर महाराजांनी त्यांच्या मुनीदीक्षेच्या ५६ वर्षांच्या काळात देशभरात लाखो किलोमीटरचा पायी प्रवास करत धर्मप्रभावना प्रसारित केली. यामुळे त्यांना वर्तमान काळातील ‘वर्धमान’ म्हणून संबोधले जाऊ लागले. जैन समाजाच्या मुनी परंपरेमध्ये सर्वाधिक मुनीदीक्षा देण्याचे कार्य प.पू. विद्यासागर महाराजांनी केले आहे. त्यांच्या मुनीदीक्षेच्या कार्यकाळातील केलेले कार्य पहाता समाजातील यापुढील मुनीजनांना आदर्श निर्माण करणारे आहे.
३. …असे श्रेष्ठ संत, गुरुवर्य पुन्हा होणे नाही !
दिगंबर जैनमुनी परंपरा सहस्रो वर्षांपासून चालत आली आहे. ही मुनी परंपरा पुन्हा एकदा पुनर्स्थापित करण्याचे कार्य प.पू. प्रथमाचार्य १०८ श्री शांतिसागरजी महाराज यांनी केले. त्यामुळे वर्ष १९२० पासून संपूर्ण देशामध्ये सहस्रो त्यागी पुन्हा एकदा दिसू लागले. अलीकडच्या काळामध्ये अनेक त्यागींची ही परंपरा चालू असतांना याच मालिकेमध्ये एक अत्यंत कठोर तपश्चरण करणारे, जीनवाणीचा (ज्ञानवाणीचा) अत्यंत सखोल अभ्यास असणारे, शेकडो श्रावकांना (उपासकांना) दिगंबर मुनी दीक्षा देऊन त्यांच्या जीवनाचे अनमोल परिवर्तन करणार्या, त्याचप्रमाणे लाखो श्रावक – श्राविकांना सतत आपल्या अनमोल हितोपदेशाच्या माध्यमातून त्यांना धर्म मार्गावर पुन्हा एकदा प्रस्थापित करणार्या, अत्यंत ज्ञानी, घोर तपस्वी, संतश्रेष्ठ प.पू. आचार्य विद्यासागर महाराज यांच्या भव्य आत्म्याला भावपूर्ण विनयांजली ! असे श्रेष्ठ संत, गुरुवर्य पुन्हा होणे नाही ! (१८.२.२०२४)
– श्री. अमल महाडिक, माजी आमदार, भाजप, कोल्हापूर.
प.पू. आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांचा त्याग !१. प.पू. आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे स्वतःचे कोणतेही बँक खाते नाही. त्यांनी धनाचा त्याग केला. २. आजीवन तेल, साखर, मीठ, हिरव्या भाज्या, फळ, अॅलोपॅथी औषधे, दही, सुकामेवा यांचा त्याग ३. एकवेळ मर्यादित आहार आणि पाणी ४. आजीवन चटई आणि पांघरूण यांचा त्याग ५. सर्व प्रकारच्या भौतिक वस्तूंचा त्याग – श्री. अमल महाडिक (१८.२.२०२४) |