Pastor Abused Minor: चर्चच्या पास्टरने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या विरोधात अहिल्यानगरमध्ये ‘निषेध मोर्चा’ !

अशा विकृतींना ठेचण्यासाठी सरकारकडून शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा घ्या ! – हिंदु जनजागृती समिती

सोनई येथे झालेल्या निषेध सभेला उपस्थित हिंदु धर्मप्रेमी !

सोनई (जिल्हा अहिल्यानगर), १८ फेब्रुवारी (वार्ता.) – ख्रिस्ती धर्मगुरूंनी आतापर्यंत एकूण किती जणांवर लैंगिक अत्याचार केले आहेत, याची आकडेवारी शोधण्यासाठी वर्ष २०१८ मध्ये फ्रान्समधील कॅथॉलिक चर्चने एक आयोग स्थापन केला. गेल्या ७० वर्षांत २ लाख १६ सहस्र मुलांवर लैगिंक अत्याचार केल्याचे फ्रान्सच्या आयोगाला लक्षात आले. अमेरिकेतही गेल्या ५० वर्षांत ४ सहस्र ख्रिस्ती धर्मगुरूंना लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली. नवी मुंबईच्या चर्चमध्ये अशाच प्रकारचे गैरप्रकार आढळले होते, तेव्हा ते चर्च प्रशासनाने भुईसपाट केले.

अशा प्रकारच्या घटनांसाठी हिंदूंना वारंवार रस्त्यावर यावे लागणे, हीच मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे अशा विकृतींना ठेचण्यासाठी अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करायला हवा, असे आवाहन येथील ग्रामस्थांना हिंदु जनजागृती समितीच्या अहिल्यानगर येथील समन्वयक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले. सोनई-बेल्हेकरवाडी रस्त्यावर असलेल्या चर्चमध्ये पास्टर उत्तम वैरागर याने २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. याच्या निषेधार्थ २ सहस्रांहून अधिक महिला आणि युवक यांनी राहुरी रस्त्यावर ठाण मांडून निषेध सभा घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

अंधश्रद्धेच्या नावाखाली त्या मुलींना भीती घालून चर्चमध्ये बोलावण्यात आले. या विषयी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा का लागू होत नाही ? असा प्रश्‍नही कु. प्रतीक्षा यांनी या वेळी उपस्थित केला. या निषेध सभेत ‘राष्ट्रीय श्रीराम संघा’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सागर बेग आणि श्री. सोमनाथ झाडे यांनीही त्यांच्या संतप्त भावना व्यक्त केल्या. गुन्हा नोंद केल्यानंतर संबंधित आरोपीच्या हितचिंतकांनी पोलीस यंत्रणा आणि न्यायालय यांनी दिलेल्या पोलीस कोठडीचा विचार न करता दबावतंत्र वापरले, असा आरोपही या वेळी करण्यात आला.

अत्याचारांच्या निषेधार्थ दिवसभर सोनई आणि परिसरात कडकडीत बंद !

या अत्याचारांच्या निषेधार्थ १७ फेब्रुवारीला संतप्त ग्रामस्थांनी दिवसभर सोनई आणि परिसरात कडकडीत बंद पाळला. सोनई बसस्थानक चौकात आंदोलक युवक आणि महिला जमा झाले. या ठिकाणी प्रारंभीच ‘मोर्चा आणि निषेध सभा शांततेच्या मार्गाने करून स्वत:ची भावना प्रशासनाच्या पुढे मांडणार’, असे सांगण्यात आले. हातात निषेधाचे फलक आणि ‘आरोपींवर कडक कारवाई करावी’, अशा घोषणा देत मोर्चा पोलीस ठाण्यासमोर आला. येथे मोर्चा अडवण्यात आल्याने रस्त्यावर ठाण मांडून निषेध सभा घेण्यात आली. या वेळी एक दंगल नियंत्रण पथक आणि काही पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. ४ लहान मुलींच्या हस्ते मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले.

कुणी सरकारी अधिवक्ता भेटला नाही, तर ८ दिवसांनी येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन ! – राष्ट्रीय श्रीराम संघाची चेतावणी

राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सागर बेग या वेळी म्हणाले की, ख्रिस्ती धर्माने २०० वर्षे हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. आपल्यावर राज्य केले. आजही ख्रिस्ती लोक धर्मांतर करत आहेत, मुलींवर अत्याचार करत आहेत. अशा घटना घडल्या कारण हिंदू निद्रिस्त आहेत, त्यामुळे त्यांचे फावते आहे; पण एक व्यक्ती जेव्हा धर्मांतरित होते, तेव्हा ती व्यक्ती आपल्या विरोधात उभी रहाते, हे लक्षात घेतले पाहिजे. नेवासा, राहुरी, सोनई, श्रीरामपूर येथे यापूर्वीही जिहाद्यांकडून लहान मुलींवर अत्याचार करण्यात आले आहेत; पण ते जिहादी आज जामिनावर आहेत. अशा खटल्यांमध्ये कुणीही अधिवक्ता आपल्याला सहकार्य करत नाही. न्यायालयीन त्रुटींचा अपलाभ घेऊन हे आरोपी सुटतात. या वेळी मात्र आपल्याला कुणी सरकारी अधिवक्ता भेटला नाही, तर आम्ही ८ दिवसांनी येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करणार, अशी चेतावणीही त्यांनी या वेळी दिली.

काय आहे प्रकरण ?

नेवासे तालुक्यातील सोनईजवळ असलेल्या बेल्हेकरवाडी परिसरात विलियर्ड्स चर्चमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाईट प्रकार चालत असल्याची स्थानिक रहिवाशांमध्ये चर्चा होती; मात्र ही गंभीर गोष्ट १५ फेब्रुवारीला चव्हाट्यावर आली. या चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचे स्पष्ट झाले. या चर्चच्या परिसरात पास्टर उत्तम वैरागर नावाचा नराधम पाचव्या इयत्तेत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याचे स्थानिक जागरूक ग्रामस्थांना समजताच, काही युवकांनी त्या प्रकाराचे गुप्तपणे ‘व्हिडिओ’ चित्रीकरण केले. तो ‘व्हिडिओ’ सोनई पोलिसांना देण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून सोनई पोलिसांनी वासनांध उत्तम वैरागर याला तात्काळ अटक केली. हे चर्च अवैध असून या चर्चच्या परिसरात अनेक दिवसांपासून धार्मिकतेच्या नावाखाली घाणेरडे प्रकार चालू असल्याचे समजते.

गावातील ख्रिस्त्यांचे आरोपीला समर्थन !

गावातील ख्रिस्त्यांनी त्यांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस’वर आरोपीला वाचवण्यासाठी लिखाण ठेवले होते. ‘सर्व ख्रिस्ती बंधू-भगिनींना विनंती आहे की, सोनई गावातील देवाच्या अनभिषिक्त सेवकाला खोटा आरोप करून कारागृहात टाकण्यात आले आहे. आपण सर्वजण त्याच्यासाठी प्रार्थना आणि उपवास करू !’ त्या ख्रिस्ती पास्टरसाठी मर्सिडीज, ऑडी, जॅग्वार अशा गाड्यांमधून न्यायालयामध्ये साधारणपणे १५० लोक जमले होते. ते आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून आले होते. (ख्रिस्त्यांचा कावेबाजपणा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ख्रिस्त्यांच्या चर्चचे खरे स्वरूप जाणा ! अशा घटना भारतात वरचेवर समोर येत आहेत. या विरोधात आता हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !
  • हिंदूंच्या संतांवर निराधार आरोप झाल्यावरही हिंदु धर्मावर चिखलफेक करणारी हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मूग गिळून गप्प बसतात. त्यांना आता या घटनेवरून जाब विचारला पाहिजे !