पिंपरी (पुणे) – महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. विविध ११ पदांच्या ३७१ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्यात पात्र झालेले उमेदवार रूजूही झाले; मात्र त्यातील ६१ कर्मचार्यांनी राजीनामे दिले असून सद्यःस्थितीत ३७१ पैकी ३२० कर्मचारी रूजू आहेत, तर प्रतीक्षा सूचीतील ३५ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना रूजू करण्यात येत असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
महापालिकेच्या नियमानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र दिल्यानंतर त्यातील २९ लिपिक, ४ कनिष्ठ अभियंता, २७ स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक, १ समाजसेवक पदावर रुजू झालेल्या ६१ कर्मचार्यांनी त्यागपत्र दिले होते. ते आयुक्त शेखर सिंह यांनी संमत केले. त्यांच्या जागीही प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे.
यावर महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले की, राज्यशासनाच्या इतर विभागांत चांगल्या पदावर संधी मिळाल्याने महापालिकेची नोकरी नाकारली आहे, तसेच काही पदांच्या संवर्गातील अर्ज न आल्याने ती पदे रिक्त आहेत, तर राजीनामा दिलेल्या पदांवरील जागांवर प्रतीक्षा सूचीतील इतर उमेदवारांना संधी देण्यात येत आहे.