अयोध्येतील प्रभु श्रीराममंदिराला सूक्ष्मातून प्रदक्षिणा घालत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

अधिवक्त्या (सौ.) दुर्गा मिलिंद कुलकर्णी

१. ‘देवता श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची सिद्धता करत आहेत’, असे दृश्य दिसणे

‘श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे २१.१.२०२४ या दिवशी रात्री मी नामजप करत असतांना ‘सूक्ष्मातून अयोध्येतील प्रभु श्रीराममंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालूया’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानुसार मी सूक्ष्मातून प्रभु श्रीरामाच्या मंदिराकडे गेले. तिथे गेल्यावर मला कळसाकडे श्री मारुतिराया दिसला आणि ‘तो सोहळ्याच्या रक्षणाची सेवा करत आहे’, असे दिसले. त्यानंतर तिथे अनेक देवता आल्या. देवतांची पुष्कळ धावपळ होती. देवता दुसर्‍या दिवशी होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाची सिद्धता करत होत्या.

२. ‘देवता भक्तांकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सिद्धता करून घेत आहेत’, असे दिसणे 

मला पुढील दृश्य दिसले, ‘जे भक्त प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सिद्धता करत होते, त्यांची दोरी देवतांच्या हातात आहे. देवताच सर्व कार्य करत असून तेथील काम करणारे भक्त कठपुतलीप्रमाणे देवतांच्या इच्छेनुसार कार्य करत आहेत.’ हे दृश्य पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्या वेळी मला बराच वेळ नामजप करत सूक्ष्मातून श्रीरामाच्या मंदिराला मानस प्रदक्षिणा घालता आल्या.

‘हे गुरुमाऊली, ‘आपल्या कृपेमुळे वरील अनुभूती आल्या’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– अधिवक्त्या (सौ.) दुर्गा मिलिंद कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२३.१.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक