१. साधिकेला पडलेले भयंकर स्वप्न
१ अ. स्वप्नात सर्वत्र मुसळधार पाऊस-वारा चालू असणे आणि पुष्कळ दुर्गंध येत असलेले मोठ्या आकाराचे विचित्र पक्षी सर्वत्र हाहाःकार माजवत आणि सर्व उद्ध्वस्त करत सर्वांना चावा घेऊन मारतांना दिसणे : ‘काही दिवसांपूर्वी मला आपत्काळाविषयी एक स्वप्न पडले. मला स्वप्नात दिसले, ‘सर्वत्र हाहाःकार माजलेला आहे. पुष्कळ मुसळधार पाऊस आणि वारा येत आहे. मोठ्या आकाराचे आणि पुष्कळ दुर्गंध येत असलेले विचित्र पक्षी सर्वत्र फिरून सर्व काही उद्ध्वस्त करत आहेत. ते सर्वांना चावा घेऊन मारून टाकत आहेत.
१ आ. सगळे लोक आपापल्या घराची दारे – खिडक्या लावून स्वतःचा बचाव करत असणे, स्वतःचा बचाव करण्यासाठी साधिकेने सर्वांच्या घरांची दारे वाजवून तिला घरात घेण्यासाठी विनवणे; परंतु कुणीच दार उघडायला सिद्ध नसणे : अशा परिस्थितीत सगळे लोक आपापल्या घराची दारे – खिडक्या लावून स्वतःचा बचाव करत आहेत. अशा परिस्थितीत मी मात्र एकटीच घराबाहेर होते. त्या ठिकाणी माझ्या ओळखीचे असे कुणीच नव्हते. मलाही स्वतःचा बचाव करायचा होता. त्यासाठी मी सर्वांच्या घरांची दारे वाजवून त्यांना मलाही घराच्या आतमध्ये घेण्यासाठी ओरडून ओरडून सांगत होते, विनवण्या करत होते; परंतु प्रत्येक जण त्या भयंकर स्थितीला पाहून घाबरला होता. कुणीच दार उघडायला सिद्ध नव्हते.
१ इ. एक पक्षी साधिकेकडे येतांना दिसणे आणि साधिकेने साहाय्य मागूनही कुणीच दार उघडायला सिद्ध नसणे : त्याच वेळी मला एक पक्षी माझ्याकडे येतांना दिसला. मी पुष्कळ घाबरले. ‘मला काय करावे’, काही कळत नव्हते. मी इतरांच्या घरांची दारे वाजवून त्यांना सांगत होते, ‘मी मरेन. मला कृपया आत घ्या. तो पक्षी माझ्याकडे येत आहे’; परंतु कुणीच दार उघडायला सिद्ध (तयार) नव्हते.
१ ई. आपत्कालीन स्थितीत साधिकेने प.पू. डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज यांना हाका मारणे, साधिकेच्या एका मनाने तिला पक्षी मारणार असल्याचे सांगणे अन् दुसर्या मनाने भगवंताविना तिला पर्याय नसल्याचे सांगणे : अशा वेळी मी मनातून ‘प.पू. डॉक्टर’ आणि ‘प.पू. भक्तराज महाराज’ यांना हाका मारल्या आणि ‘तुम्हीच मला या स्थितीपासून वाचवा’, असे त्यांना सांगितले. त्याच वेळी माझे एक मन मला सांगत होते, ‘तो पक्षी तुझ्याकडेच येत आहे. या स्थितीत देव तरी काय करणार आहे ? आता तुझ्या हातात काही नाही. त्यामुळे तो पक्षी तुला मारून टाकणार.’ त्याच वेळी दुसरे मन सांगत होते, ‘कोणत्याही स्थितीत भगवंत तुला वाचवणार आहे. तू त्याला हाक मार. तू त्याला हाक मारून तरी बघ. तुझ्या हातात दुसरे काहीच नाही. तुझ्या हातात जे आहे, ते तरी तू कर.’
१ उ. पक्षी साधिकेच्या पाठीला चावा घेत असतांक्षणी तिने सर्व शक्तीनिशी प.पू. भक्तराज महाराज यांचा जयघोष करणे आणि त्याच क्षणी त्या पक्ष्याचा स्फोट होऊन तो पक्षी नष्ट होणे अन् त्या पक्ष्याने घेतलेला चाव्याची जखमही बरी होणे : त्या वेळी मनात असाही विचार आला, ‘आपण सर्व शक्तीनिशी प.पू. भक्तराज महाराज यांचा (बाबांचा) जयघोष करूया.’ त्या वेळी माझ्या मनातली भगवंतावरील श्रद्धा डळमळीत होती; परंतु माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नसल्याने मी सर्व शक्ती एकवटून प.पू. भक्तराज महाराज यांचा जयघोष करण्याचा प्रयत्न केला. तो पक्षी माझ्या जवळ येत होता. शेवटी तो पक्षी माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या पाठीला चावा घेतला. मीही त्याच क्षणी ‘प.पू. भक्तराज महाराजांचा विजय असो ऽऽ’ असे म्हणाले. पक्ष्याने चावा घेण्याची आणि मी जयघोष करायची वेळ एकच झाली. प.पू. भक्तराज महाराज यांचा जयघोष करता क्षणी त्या पक्ष्याचा त्याच ठिकाणी स्फोट झाला आणि तो नष्ट झाला. मला त्या पक्ष्याने घेतलेला चाव्याची जखमही आपोआपच बरी झाली. मी त्या संकटापासून वाचले.’
तिथेच माझे स्वप्न संपले आणि मला जाग आली.
२. स्वप्नाच्या माध्यमातून मिळालेली शिकवण
अ. भगवंताच्या नामामध्ये पुष्कळ सामर्थ्य आहे. ‘आपण भगवंताचे नाम किती तळमळीने घेतो’, याला महत्त्व आहे. आपण त्याचे नाम अंतःकरणापासून तळमळीने घेतले, तर तो नक्कीच आपल्या साहाय्याला धावून येणार आहे.
आ. आपत्काळात केवळ भगवंतच आपल्याला वाचवणार असून भगवंतावरील श्रद्धा दृढ करण्यासाठी देवाने मला स्वप्नाच्या माध्यमातून जाणीव करून दिली.
३. कृतज्ञता
हे स्वप्न संपून मला जाग आल्यावर मला ते दृश्य स्वप्नातील न वाटता, दृश्य स्वरूपातील सत्य वाटत होते. जेव्हा मी भानावर आले, तेव्हा माझ्याकडून प.पू. गुरुमाऊलींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली. ‘गुरुमाऊली, माझी श्रद्धा किती डळमळीत आहे ! माझी श्रद्धा वाढवण्यासाठी आपणच मला या स्वप्नाचा माध्यमातून दृष्टांत दिलात. गुरुमाऊली, संकटकाळात आपणच मला तारणार आहात. अन्य काहीच माझ्या उपयोगी येणार नाही.’
४. प्रार्थना
माझी अजूनही गुरूंवरील श्रद्धा पुष्कळ अल्प पडत आहे. गुरुदेव मला अनेक माध्यमे आणि प्रसंग यांमधून हे लक्षात आणून देत आहेत, तरीही मी उणी पडत आहे. मी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना करते, ‘हे गुरुमाऊली, तुम्हीच आम्हा सर्व साधकांची श्रद्धा वाढवा. ‘तुमच्याविना आम्हाला दुसर्या कुणाचाच आधार नाही’, याची जाणीव आम्हाला सतत राहू दे’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. कीर्ती प्रतीक जाधव, सनातन आश्रम, फोंडा, गोवा.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |