अयोध्या येथे झालेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण !

रामलला

१. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी केलेले सूक्ष्म परीक्षण

१ अ. अयोध्या येथे नवीन बांधलेल्या श्रीराममंदिरात ६५ टक्के श्रीरामतत्त्व आणि मंगलतेची स्पंदने जाणवणे : ‘अयोध्या येथील श्रीराममंदिरात २२.१.२०२४ या दिवशी श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली. समष्टीतील विविध जिवांचा श्रीरामाप्रती असलेला भाव आणि श्रद्धा यांमुळे श्री रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा चालू होण्यापूर्वीच श्रीराममंदिरात ६५ टक्के श्रीरामतत्त्व आणि मंगलता (भाव + आनंद) यांची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात जाणवत होती.

१ आ. देवी-देवता यांनी सूक्ष्मातून मार्ग बांधणे : अनेक देवी-देवता यांनी स्वर्ग ते श्रीराममंदिर यामध्ये सूक्ष्मातून एक मार्ग बांधला होता. त्या मार्गावरून अनेक दैवी जीव आणि देवी-देवता यांचे आवागमन चालू होते. (देवी-देवता श्रीराममंदिराकडे येत होते, तर ज्या दैवी जिवांना या कार्यक्रमामुळे मुक्ती मिळत होती, ते जीव स्वर्गाकडे जात होते.)

२. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे केलेले सूक्ष्म परीक्षण

श्री. निषाद देशमुख

२ अ. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री रामललासाठी छत्र घेऊन श्रीराममंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतांना केलेले सूक्ष्म परीक्षण

१. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मागील ११ दिवसांत केलेली तपःसाधना आणि विविध देवळांत जाऊन घेतलेले देवदर्शन यांमुळे त्यांच्या आध्यात्मिक तेजात वाढ होऊन त्यांच्याभोवती पिवळ्या रंगाची मोठी प्रभावळ कार्यरत झालेली दिसली.

२. या वेळी सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचा भाव जागृत झाल्यामुळे वायूमंडलातील भाव आणि चैतन्य यांच्यात वाढ झाली.

३. आकाशात श्रीराममंदिराच्या चारही बाजूंनी अनेक देवी-देवता सूक्ष्मातून हातात फुले घेऊन उपस्थित होत्या.

२ आ. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा संकल्प होतांनाचे सूक्ष्म परीक्षण

१. श्रीराममंदिराचे बांधकाम करतांना अनेक पवित्र नद्या आणि पवित्र ठिकाणे येथील जल अन् माती वापरली होती. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा संकल्प होतांना त्यांतील चैतन्य जागृत झाल्यामुळे वायूमंडलातील आपतत्त्व आणि तेजतत्त्व यांंत वाढ झाली.

२. प्राणप्रतिष्ठेचा प्रत्यक्ष विधी चालू होण्यापूर्वीच ब्रह्मांडातील श्रीरामतत्त्व मूर्तीकडे आकृष्ट होत होते.

३. पंतप्रधान मोदी यांच्यातील भावामुळे पूजाविधी करतांना त्यांच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी निळ्या रंगाची प्रभावळ दिसत होती.

४. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा संकल्प होतांना देवी-देवतांसह सूक्ष्मातून अनेक तेजस्वी राजे आणि श्रीराममंदिरासाठी संघर्ष केलेले अन् हुतात्मा झालेले अनेक सात्त्विक जीव उपस्थित होते.

२ इ. श्री रामललाच्या मूर्तीची अभिजित (म्हणजे विजयी) मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा होत असतांना केलेले सूक्ष्म परीक्षण

१. पंतप्रधान मोदी मंत्र पुटपुटत श्री रामललाच्या मूर्तीवर पुरोहितांनी सांगितल्याप्रमाणे उपचार करत होते. त्यांच्यातील भाव आणि मंत्रोच्चारणाची प्रत्यक्ष कृती यांमुळे श्रीरामतत्त्व श्री रामललाच्या मूर्तीकडे ५ टक्के अधिक प्रमाणात आकृष्ट होत होते.

२. मला सूक्ष्मातून ‘भगवान शिव, सूर्यदेवता, हनुमान, महर्षि वाल्मीकि आणि महर्षि विश्‍वामित्र, संत गोस्वामी तुलसीदास, राजा विक्रमादित्य अशा अनेक दिव्य विभूती सूक्ष्मातून हा सोहळा पहाण्यासाठी गर्भगृहात उपस्थित आहेत’, असे दिसले.

३. मला सूक्ष्मातून ‘ब्रह्मांडातील श्रीरामतत्त्व पाण्याच्या धारेप्रमाणे श्री रामललाच्या मूर्तीवर पडत असून जणू ब्रह्मांड गंगेतून श्री रामललाच्या मूर्तीवर अभिषेक होत आहे’, असे दृश्य दिसत होते.

४. ब्रह्मांडातून मूर्तीकडे येणारे श्रीरामतत्त्वाचे प्रमाण तिप्पट झाले होते. मला सूक्ष्मातून ‘तेजःपुंज प्रकाश मूर्तीत प्रवेश करत आहे’, असे दिसत होते.

५. श्री रामललाच्या मूर्तीकडे पाहिल्यावर मला सूक्ष्मातून तिथे शून्याकार पोकळी दिसली. या पोकळीने प्रथम ब्रह्मांडातून चैतन्य ग्रहण केले आणि त्यानंतर लगेच त्या पोकळीतून पूर्ण विश्‍वाकडे श्रीरामतत्त्व प्रक्षेपित होत होते. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतांना सूक्ष्मातून मूर्तीच्या ठिकाणी पोकळी दिसणे हे मूर्तीमधील निर्गुण तत्त्व सगुण होत असल्याचे प्रतीक आहे. ‘ते निर्गुणाचे सगुणात घनीकरण होण्याचा एक भाग आहे’, असे मला जाणवले.

६. पंतप्रधान मोदींनी श्री रामललाच्या चरणांशी तुळशी वाहिल्यावर वायूमंडलातील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली आणि श्री रामललाच्या मूर्तीची चंद्रनाडी कार्यरत झाली. त्यामुळे सूक्ष्म परीक्षण करतांना मला गारवा जाणवला.

७. पंतप्रधान मोदी यांनी श्री रामललाच्या मूर्तीच्या चरणी छत्र अर्पण केल्यावर श्री रामललाच्या मूर्तीची सूर्यनाडी कार्यरत झाली. त्यामुळे वायूमंडलातील शक्तीतत्त्वात वाढ होऊन वायूमंडलातील रज-तम अल्प झाले आणि सात्त्विकता वाढली.

८. पंतप्रधान मोदी, प.पू. सरसंघचालक मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर उपस्थित यांनी श्री रामललाच्या चरणांवर अक्षता अर्पण केल्यावर मूर्तीची सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

९. पंतप्रधान मोदी यांनी श्रीरामाची आरती केली, तेव्हा समष्टीसाठी श्रीरामतत्त्व अधिक आणि सगुण प्रमाणात वायूमंडलात प्रक्षेपित होत होते.

१०. प्राणप्रतिष्ठेचे विधी पूर्ण होईपर्यंत मला सूक्ष्मातून श्री रामललाच्या चरणांपाशी पूर्णवेळ लालसर भगव्या रंगाची छटा दिसत होती. हे हनुमानतत्त्वाचे सूक्ष्म प्रगटीकरण होते.

११. श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यावर गर्भगृहात मोठ्या प्रमाणात तेजतत्त्व कार्यरत झाले. त्यामुळे मला सूक्ष्म परीक्षण करतांना माझ्या सर्व कुंडलिनीचक्रांवर आल्हाददायक उष्णता जाणवत होती.

१२. श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा चालू असतांना मला दीर्घकाळ सूक्ष्म गंध येत होता. ही श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे ईश्‍वरी शक्ती सर्वत्र कार्यरत होत असल्याची अनुभूती होती.

१३. श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यावर श्री रामललाकडून मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत होते. या चैतन्याचा परिणाम केवळ सप्तलोकांपर्यंत मर्यादित नसून प्रत्यक्ष कालचक्रावरही होत होता. त्यामुळे ‘रामराज्य, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेचा काळ लवकर येण्यास साहाय्य होणार आहे’, असे मला जाणवले.

१४. या कार्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची साधना झाल्यामुळे श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होत असतांना प्रक्षेपित होणारे चैतन्य त्यांना ग्रहण करता आले. त्यामुळे मला त्यांचे चेहरे उजळल्यासारखे दिसत होते.’

(क्रमश:)

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२४, सकाळी ११.४५ ते दुपारी १.१५)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक